गोमयापासून बनवलेली अशास्त्रीय गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक नसणे, तर धर्मशास्त्रानुसार बनवलेली सनातन-निर्मित शास्त्रीय गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (‘सोशल मीडिया’वरून) गणेशोत्सवात ‘गोमय (गोबर) गणेशमूर्ती’ बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘गोमयापासून, म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्तीचे पूजन केल्यास लवकर शुभ फलप्राप्ती होते. माती आणि गोबर यांच्यापासून बनवलेल्या मूर्तीमध्ये पंचतत्त्व वास करते.’ खरेतर गोमय आणि गोमूत्र यांपासून बनवलेली गणेशमूर्ती अशास्त्रीय आहे. धर्मग्रंथामध्ये ‘मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीची स्थापना करावी’, असे सांगितले आहे. त्यामुळे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचीच स्थापना आणि पूजन केल्यास पूजकाला लाभ होईल. गोमयापासून बनवलेली अशास्त्रीय गणेशमूर्ती आणि मातीपासून बनवलेली शास्त्रीय गणेशमूर्ती यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ९.३.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

गोमयापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत गोमय गणेशमूर्ती, सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. गणेशमूर्तींच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. गोमय गणेशमूर्तीमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा असणे; पण सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती यांमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे

गोमय गणेशमूर्तीमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या. तेव्हा ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी त्या गणेशमूर्तीच्या संदर्भात ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा मोजतांना अनुक्रमे १२० आणि १५० अंशाचे कोन केले. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येत असल्याने त्या गणेशमूर्तीतील त्या दोन्ही नकारात्मक ऊर्जांची प्रभावळ मोजता आली नाही.

सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती यांमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. गोमय गणेशमूर्तीपेक्षा सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे, तर सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाच्या गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. चाचणीतील तिन्ही गणेशमूर्तींमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. त्यांच्यासाठी स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला. त्यामुळे त्यांची प्रभावळ मोजता आली. त्याची माहिती पुढे दिली आहे.

२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ इ १. गोमय गणेशमूर्तीपेक्षा सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्तीची एकूण प्रभावळ अधिक असणे, तर सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाच्या गणेशमूर्तीची एकूण प्रभावळ सर्वाधिक असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. चाचणीतील तिन्ही गणेशमूर्तींची एकूण प्रभावळ पुढीलप्रमाणे होती.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. गोमयापासून बनवलेली गणेशमूर्ती अशास्त्रीय असल्याने, तसेच तिच्यातून वातावरणात
नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक न ठरणे

गोमातेचे गोमूत्र आणि गोमय (शेण) सात्त्विक असते. गोमयाने भूमी सारवणे, गोमूत्राने वास्तूशुद्धी करणे हे अध्यात्मिकदृष्ट्या योग्य आहे; कारण त्यायोगे त्या भूमीतील आणि तेथील वातावरणातील नकारात्मक स्पंदनांचे उच्चाटन केले जाते. चाचणीतील ‘गोमय गणेशमूर्ती’ बनवण्यासाठी उपयोगात आणलेला ‘गोमय’ हा घटक सात्त्विक असल्याने त्या गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली; पण त्या गणेशमूर्तीमध्ये नकारात्मक स्पंदनेही आढळली. त्यामुळे गोमयापासून गणेशमूर्ती बनवल्यास पूजकाला तिचा लाभ होणार नाही. याचे कारण म्हणजे गोमयापासून गणेशमूर्ती बनवणे धर्मशास्त्रविसंगत आहे. अशा धर्मशास्त्रविसंगत गणेशमूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकर्षित होत नाही; म्हणूनही अशा गणेशमूर्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असतात. ‘धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती कशी असावी ?’, हे पुढे दिले आहे.

अध्यात्मशास्त्रानुसार, म्हणजेच मूर्तीशास्त्रानुसार गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. मूर्तीशास्त्रानुसार बनवलेल्या अशा गणेशमूर्तीमध्ये गणेशतत्त्व जास्तीतजास्त प्रमाणात आकर्षित होऊन त्याचा भाविकाला लाभ होऊ शकतो. अर्थातच अध्यात्मशास्त्रानुसार केलेली कुठलीही गोष्ट ही निसर्गाच्या जवळ जाणारी, म्हणजे पर्यावरणाला अनुकूल अशीच असते.

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली काढलेल्या शास्त्रविसंगत पर्यायांमुळे, म्हणजे ‘कागदाच्या लगद्याची गणेशमूर्ती (टीप), गोमय गणेशमूर्ती अशा अशास्त्रीय गणेशमूर्ती बनवण्यामुळे’ पर्यावरणाचे रक्षण तर होतच नाही, उलट शास्त्रविसंगत कृती केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे !

टीप : ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने वर्ष २०१७ मध्ये कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीची चाचणी केली असता, त्या गणेशमूर्तीमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळली होती. तसेच तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदने मुळीच नव्हती.

३ आ. चाचणीतील सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती
आणि सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती धर्मशास्त्रात
दिलेल्या गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असल्याने त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, तिची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवले आहे. त्यामुळे मूर्तीकाराने स्वतःच्या कल्पनेने बनवलेल्या एखाद्या देवतेच्या मूर्तीपेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या त्या देवतेच्या मूर्तीत त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. धर्मशास्त्रात एकाच देवतेची अनेक नावे आणि त्यानुरूप असणार्‍या रूपांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी उपासकांनी काळानुसार देवतेच्या कोणत्या रूपाची उपासना करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, ते केवळ अध्यात्मातील जाणकार, म्हणजे संतच सांगू शकतात. चाचणीतील सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाचे वर्णन आणि काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन यांनुसार बनवल्या आहेत. त्यामुळे चाचणीतील या दोन्ही गणेशमूर्तींमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली आणि त्यांची एकूण प्रभावळही अधिक होती.

३ आ १. सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती

ही मूर्ती शास्त्रानुसार, म्हणजे ऋषिमुनींनी सांगितलेल्या मूर्तीविज्ञानानुसार असल्यामुळे तिच्यातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक ठरते. अशा मूर्तीची पूजा आणि उपासना करणे उपासकाच्या दृष्टीने लाभदायक आहे.

३ आ २. सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती

ही मूर्ती साधक-मूर्तीकारांनी धर्मशास्त्रानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने बनवली आहे. ही मूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची स्पंदने प्रक्षेपित करते. त्यामुळे ही मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रमाणात लाभदायक ठरण्यासह तिच्यामध्ये उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अनुभूती देण्याची क्षमतासुद्धा आहे.

 

४. सनातन-निर्मित दोन मूर्तींपैकी रंगीत गणेशमूर्ती पूजनासाठी वापरणे अधिक योग्य !

सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती सगुण स्तरावरील सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते, तर पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची निर्गुण स्तरावरील सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते. सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाच्या गणेशमूर्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि तिची एकूण प्रभावळ सर्वाधिक होती, असे चाचणीतूनही दिसून आले. सनातन-निर्मित रंगीत गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित शास्त्रीय पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती या दोन्हीही मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असल्या, तरीही पांढर्‍या रंगाच्या गणेशमूर्तीतून प्रक्षेपित होणारी निर्गुण स्पंदने सर्वसाधारण व्यक्तीला पेलवणारी नसल्याने पूजनासाठी रंगीत गणेशमूर्ती वापरणे अधिक योग्य ठरते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.९.२०१८)

Leave a Comment