कपड्याची सात्त्विकता अवलंबून असणारे घटक आणि त्यांचे महत्त्व

कपडे निवडतांना आपल्या आवडी-निवडीपेक्षा सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून कोणत्या प्रकारचे कपडे निवडावे याविषयी या लेखात पाहू.

 

आपल्या वापरातील वस्तू सत्त्वप्रधान असण्याचे महत्त्व

‘प्रत्येक वस्तूला तिच्या गुणधर्माप्रमाणे चांगली किंवा वाईट स्पंदने असतात. आपल्या अवतीभोवती आणि वापरात असलेल्या अनेक वस्तूंच्या स्पंदनांचा आपल्यावर सतत परिणाम होत असल्यामुळे त्या वस्तू सत्त्वप्रधान असणे आवश्यक असते. अन्य कोणत्याही वस्तूंपेक्षा अंगावरच्या कपड्यांचा आणि आपला निकटचा संबंध असतो.

 

कापडाचा प्रकार, रंग, कापडावरील वेलवीण (नक्षी)
आणि कपड्याची शिलाई यांवर त्या कपड्याची सात्त्विकता अवलंबून असणे

सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून कपडे निवडतांना आपल्या आवडी-निवडीपेक्षा स्पंदनशास्त्राचा अभ्यास केल्यास आपल्याला अधिक आध्यात्मिक लाभ होतो. अध्यात्मशास्त्रातील नियमानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात. त्यानुसार कापडाचा प्रकार, रंग, कापडावरील वेलवीण आणि कपड्याची शिलाई यांवर त्या कपड्यातील स्पंदने अवलंबून असतात. हे घटक सत्त्वप्रधान असल्यास त्या कपड्यात सात्त्विक स्पंदने येऊन ते परिधान करणार्‍या व्यक्‍तीला सात्त्विकता आणि ईश्‍वरी चैतन्य यांचा लाभ होतो.’ – सनातनच्या साधक-चित्रकार सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

कपड्याचे प्रकार

अकृत्रिम कपडे

१. वल्कले

वृक्षाच्या सालीपासून जी बनवतात, ती वल्कले. प्रभु श्रीराम जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह वनवासाला निघतांना त्यांनी राजवेश त्यागून वल्कले परिधान केली होती, असा उल्लेख रामायणात आहे.

२. नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले कपडे

सुती, कौशेय (रेशमी), खादी आणि लोकरी या धाग्यांपासून बनवलेले कपडे.

नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेल्या कपड्यांचे महत्त्व

१. ‘कापूस आणि कौशेय नैसर्गिक असल्यामुळे त्यांच्यापासून बनवलेल्या कपड्यांचा स्पर्श त्वचेच्या आरोग्याला पोषक असतो.’ – ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)

२. ‘सूत आणि कौशेय नैसर्गिकरीत्या बनलेले असल्याने त्यांच्यापासून बनलेल्या वस्त्रांत ईश्‍वरी तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे अशी वस्त्रे धारण करणार्‍याला ईश्‍वरी तत्त्वाचा लाभ जास्त होतो.’ – एक अज्ञात शक्‍ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, फाल्गुन कृष्ण द्वितीया, कलियुग वर्ष ५११० (२५.३.२००८), पहाटे ३.५०)

३. कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या वस्त्रांच्या तुलनेत नैसर्गिक वस्त्रांमध्ये सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची, तसेच त्या धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने त्यांच्यावर वाईट शक्‍तींचे आक्रमण होण्याची शक्यता अल्प असते. यामुळेच नैसर्गिक वस्त्रे जास्त काळ शुद्ध आणि पवित्र रहातात.

२ अ. सुती कपडे

१. ‘सुती कपड्यांमुळे त्वचेवरील घाम लगेचच शोषला जाऊन त्वचा चिकट होत नाही, तसेच ती निरोगी आणि तुकतुकीत रहाते.’ – ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)

२. ‘झाडावरील कापसात ईश्‍वरी निर्गुण लहरी आकृष्ट झालेल्या असतात. त्यामुळे सुती वस्त्र घातल्यावर चांगले वाटते आणि घालणार्‍याची सात्त्विकता वाढते.’ – एक अज्ञात शक्‍ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, फाल्गुन कृष्ण द्वितीया, कलियुग वर्ष ५११० (२५.३.२००८, पहाटे ३.५०)

सुती वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

सुती वस्त्राची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

 

सुती कपड्यांमध्ये वाईट शक्‍तींच्या आक्रमणांना (हल्ल्यांना) प्रतिकार करण्याची क्षमता जास्त असण्याच्या संदर्भातील अनुभूती

कृत्रिम धाग्यांनी बनवलेल्या कपड्यांवर मुंग्यांचे पुंजके येणे आणि सुती कपडे नैसर्गिक असून त्यात ईश्‍वरी तत्त्व जास्त असल्याने त्यांवर १-२ मुंग्याच असणे, यावरून सुती कपड्यांचे महत्त्व लक्षात येणे : ‘२५.६.२००८ या दिवशी आश्रमातील खोलीत कपडे वाळत घातलेल्या दोरीवर मुंग्या आल्या होत्या. तिथे कृत्रिम धाग्यांनी बनवलेल्या कपड्यांवर मुंग्यांचे पुंजके दिसत होते. तिथेच सुती कपडेही वाळत घातले होते. त्यांवर १-२ मुंग्याच होत्या. सुती कापड नैसर्गिक असते, तसेच त्यात ईश्‍वरी तत्त्व जास्त असल्याने, कापडातून ते प्रक्षेपित होऊन प्रतिकार झाल्यामुळे, सुती कपड्यांवर केवळ १-२ मुंग्या आल्या. असे सतत दोन दिवस झाले. तेव्हा सुती कपड्यांचे महत्त्व लक्षात आले.’ – सौ. रंजना, गोवा.

(मनुष्यप्राणी सोडून अन्य प्राण्यांची साधना इत्यादी नसल्याने वाईट शक्‍तींना त्यांच्यावर नियंत्रण (ताबा) मिळवणे सोपे असते. मनुष्याच्या सहज जवळ जाऊ शकणार्‍या मुंग्या, झुरळ, पाल, मांजर, कुत्रा यांसारख्या प्राण्यांच्या माध्यमातून वाईट शक्‍ती मनुष्यावर, तसेच त्याच्या संपर्कात येणार्‍या वस्तूंवर काळी शक्‍ती प्रक्षेपित करतात. वरील अनुभूतीतील प्रसंगात वर्णिलेला मुंग्यांचे आक्रमण, हे वाईट शक्‍तींचे आक्रमण होते. – संकलक)

२ आ. कौशेय (रेशमी) कपडे

१. ‘कौशेय वस्त्रांचा स्पर्श मऊ असतो. त्यामुळे त्वचेवरील अनावश्यक केसांचे वस्त्राशी घर्षण होऊन ते गळून पडतात. कौशेय वस्त्रांच्या स्पर्शामुळे त्वचा मऊ होण्यास साहाय्य होते.

२. कौशेय धाग्यांमध्ये देवतांच्या सूक्ष्मतम लहरी आकृष्ट होतात. त्यामुळे कौशेय वस्त्रे घालणार्‍या व्यक्‍तीला देवतांच्या लहरी ग्रहण करता येतात.’ – ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)

३. ‘कौशेयाचा किडा झाडातील अर्क शोषून घेऊन स्वतःच्या लाळेपासून धागा बनवतो. त्या धाग्याला चकाकी आणि मऊपणा येतो. कौशेयाच्या धाग्यात स्वर्गलोकातील देवतांची तत्त्वे आकर्षिली जातात.’ – एक अज्ञात शक्‍ती (सौ. रंजना गौतम गडेकर यांच्या माध्यमातून, फाल्गुन कृष्ण द्वितीया, कलियुग वर्ष ५११० (२५.३.२००८, पहाटे ३.५०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment