गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।

१. ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्यांना `परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात’, याची खात्री पटणे

`गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् । ।’, याचा अर्थ शिष्याचे परममंगल केवळ गुरुकृपेनेच होते. ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले साधक व शिष्य यांनी प्रत्यक्ष गुरुकृपा अनुभवलेली असल्याने त्यांना गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व पटलेले असते. त्यामुळे त्यांना `आपल्या गुरूंसाठी काय करू आणि किती करू’, असे वाटत असते. गुरुकृपेचे वर्णन अन् महत्त्व हे शब्दातीत असल्यामुळे ते शब्दांतून व्यक्‍त करणे अशक्यच असते. तरीही शिष्यांना गुरूंच्या आलेल्या अनुभूती, गुरूंनी केलेली कृपा, त्यांचे हास्य, त्यांनी आपल्याशी केलेली मधुरवचने, मार्गदर्शन इत्यादींचे नित्य स्मरण शिष्याकडून होत असते व तो गुरूंच्या आठवणीतच सतत रममाण होत असतो. त्याला आता खर्‍या अर्थाने गुरूंचे वेड लागलेले असते. अंतर्यामी गुरूंचे महत्त्व पटलेले असल्याने आणि उत्तरोत्तर गुरूंची ओढ वाढत गेल्याने त्याला आता गुरूंशिवाय चैन पडत नाही. आपले परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात याची खात्री पटल्याने तो पूर्णपणे गुरूंना समर्पित होतो आणि गुरुही त्याला जवळ घेतात.

 

२. साधनेत प्रगती होत गेल्यावर `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला
आहे’, याची अनुभूती सातत्याने आल्याने आणि गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याचे पटल्याने
शिष्य फक्‍त गुरुभक्‍ती अन् गुरुसेवा यांत रममाण होणे

खरेतर साधकाने अध्यात्माच्या शाळेत प्रवेश केल्यापासूनच गुरु त्याची साधना करवून घेत असतात; परंतु साधकाला त्याची जाणीव नसते. साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते. `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे’, याची त्याला खात्री पटते. गुरुकृपा सातत्याने मिळवण्यासाठी तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्‍न करतो. शिष्य झाल्यावर गुरुच त्याच्याकडून योग्य प्रकारे साधना करवून घेऊन त्याची साधनेत प्रगती करून घेतात. या स्थितीला `गुरूंचे आज्ञापालन करणे’, हा एकच ध्यास शिष्याला लागलेला असतो. `आपली प्रगती गुरूंच्या संकल्पाने होत आहे आणि तेच सर्वकाही आपल्याकडून करवून घेत आहेत’, अशी अनुभूती सातत्याने घेतल्याने शिष्याचा गुरूंप्रती कृतज्ञताभाव अन् शरणागतभाव वाढू लागतो. आता त्याला देवतांची भक्‍तीही करावी लागत नाही. गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याने आता तो फक्‍त गुरुभक्‍ती आणि गुरुसेवा यांत रममाण होतो.

 

३. गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू आणि किती करू’, असे वाटत असणे, त्यांना आपल्या शिष्याच्या प्रगतीची ओढ वाटत असणे अन् ते त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी अधीर असणे

शिष्याला गुरूंचा काही महिन्यांचा अथवा काही वर्षांचा सहवास लाभला, तरी तो गुरूंसाठी वेडा होतो. ज्या गुरूंनी अनेक जन्मांपासून त्याचे बोट धरून ठेवले आहे आणि ते त्याला प्रत्येक जन्मात साधनेचे मार्गदर्शन करून पुढे पुढे घेऊन जातात, त्यांना आपल्या शिष्याचे किती वेड असेल ! गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू आणि किती करू’, असे वाटत असते. त्यांचे प्रेमही शिष्याला भरभरून मिळत असते. त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी ते अधीर असतात. शिष्याला जेव्हा गुरुचरणांची आणि त्यांच्या चरणी स्थान प्राप्त करण्याची ओढ लागते आणि ती वाढत जाते, त्या वेळी गुरुच त्याला आत्मज्ञान देतात अन् त्यानंतर स्वत:मध्ये सामावून घेतात. खरेतर हे सर्व गुरूंनीच केलेले असते. त्यासाठी शिष्याला काहीही प्रयत्‍न करावे लागत नाहीत. जसे आपण काशीला जाणार्‍या आगगाडीत बसलो की, आपणही काही न करता काशीला पोहोचतो, त्याप्रमाणे एकदा आपण गुरुकृपेच्या गाडीत बसलो की, आपोआपच गुरु आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतात. त्यासाठी शिष्याला काहीही करावे लागत नाही. हे अनुभवल्यामुळेच शिष्याला गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व माहीत असते आणि तो गुरुचरणी सतत लीन असतो.’

– ईश्‍वर (सौ. राजश्री अरुण खोल्लम यांच्या माध्यमातून, २४.७.२००७, सायं.५ वाजता)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरुकृपायोग’

Leave a Comment