सनातनच्या साधकाने केलेल्या मार्गदर्शनामुळे कुलदेवीचे नाव कळणे आणि कुलदेवीचे दर्शन घेतल्याने आनंद मिळणे

 

१. अडीच वर्षे नोकरीच्या शोधात राहून, तसेच ग्रहशांती, पूजा आदी करूनही
यश न मिळणे आणि एका साधकाने ‘कुलदेवतेचा कोप आणि पितृदोष’ असल्याचे सांगणे

‘मी रासायनिक अभियंता असून एप्रिल २०१३ मध्ये अकोला येथे स्थित होतो. येेथील एका ‘केमिकल कंपनी’तील माझी नोकरी गेली. त्यामुळे नंतर अडीच वर्षे मी नोकरीच्या शोधात होतो. त्या काळात बर्‍याच मुलाखतीनंतरही मला यश येत नव्हते. अनेक ज्योतिषी, देवतांच्या पोथ्या, कुलदेवतेचा जप, तसेच ग्रहशांती, पूजा इत्यादी करूनही यश मिळत नव्हते. नोकरीतील अडथळे दूर होण्यासाठी माझी पत्नी सौ. अंजली हिने श्री गणपति अथर्वशीर्ष प्रतिदिन १०० वेळा, याप्रमाणे १० दिवस म्हटले. विघ्नहर्त्याने त्याच सुमारास आमच्या इमारतीमध्ये रहाणार्‍या एका साधकाशी माझी भेट घडवली. मी त्यांना माझ्या नोकरीविषयी सांगितले असता त्यांनी ‘कुलदेवतेचा कोप आणि पितृदोष’ असल्याचे सांगितले. यासाठी कुलदेवता आणि श्री दत्त यांचा अधिकाधिक जप करण्यास सांगितले. आम्ही कुलदेवी श्री एकवीरादेवीची ११ शुक्रवारी ओटी भरण्याचे ठरवले. अडचणी येऊनही खंड न पडता देवीने हे सर्व आमच्याकडून करवून घेतले.

 

२. कुलदेवता ‘श्री रेणुकादेवी’ असल्याचे कळल्यावर पहिल्यांदाच
कुलदेवीचे दर्शन घ्यायला जाणे आणि दर्शन घेतल्याने उभयतांचे मन गहिवरून येेणे

कुलदेवतेचा नामजप करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्या साधकाने ‘‘तुमची कुलदेवी श्री एकवीरादेवी आहे का ?’’, याची निश्‍चिती करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला तोपर्यंत ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा जप करण्यास सांगितले. २ दिवसांनंतर आमची कुलदेवी ‘श्री रेणुकादेवी’ असल्याचे माझ्या काकूंच्या ध्यानात आले आणि त्यांनी आम्हाला तसे कळवले. २ दिवसांनंतर मी आणि माझे कुटुंबीय माहूरला देवीच्या दर्शनाला गेलो. पहिल्यांदाच आपल्या कुलदेवीचे दर्शन घेतल्याने आम्हा उभयतांचे मन गहिवरून आले आणि अतिशय आनंद झाला.

 

३. अध्यात्म जाणून घेण्याची ओढ निर्माण होणे
आणि सनातन संस्थेशी जोडले गेल्याने कृतज्ञता वाटणे

साधकाच्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच आम्हाला गेल्या २ – ३ पिढ्यांना ठाऊक नसलेल्या कुलदेवीचा शोध लागला. त्यांच्या सत्संगातून आम्हाला अध्यात्माचे शास्त्र कळलेे. वेळोवेळी हे शास्त्र समजून ते अवगत करण्याची गोडीच माझ्यात निर्माण झाली. आम्हाला श्री कुलदेवी आणि श्री दत्तात्रेय यांचे महत्त्व कळले. हे मी माझ्या नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना सांगितल्याने त्यांनाही याचा लाभ झाला. आम्ही मागील जन्मी जे काही पुण्य केले, त्यामुळेच सनातन संस्थेशी जोडले गेलो. संतांच्या भेटी घडल्या. त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे प.पू. गुरुदेवांसारखे गुरु लाभले. रेणुकादेवीनेच आम्हाला गुरुभेटीचा योग आणून दिला.

प.पू. गुरुदेवांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो, हीच पुन्हा त्यांच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. आणि सौ. अडगांवकर, रोहा, जि. रायगड.

Leave a Comment