देवतांच्या नावाचा उल्लेख असलेली अर्थहीन गाणी, म्हणजे एक प्रकारे देवतांचे विडंबनच !

‘सध्या समाजात प्रचलीत असलेली काही भावगीते आणि भक्तीगीते, उदा. ‘राधा कृष्णावरी भाळली’, ‘हरीची राधा ही बावरी’, ‘विसरू नको श्रीरामा मला’ आदी राधा-कृष्ण अन् श्रीराम यांच्यावर आधारित आहेत. वरकरणी पाहिल्यास ‘या गाण्यांमध्ये राधा-कृष्ण आणि श्रीराम यांचा उल्लेख आहे, म्हणजे ती भक्तीगीते आहेत’, असे वाटते; परंतु गीतांच्या भावार्थाचा बारकाईने अभ्यास केल्यास या गीतांमध्ये भगवंताप्रतीच्या भावाचा अभावच दिसून येतो. ही गाणी वास्तविकतेचे विडंबन करत असल्याचे आढळते.

 

गीतांतील देवतांचे विडंबन

अ. ‘हरीची राधा ही बावरी’ या गाण्यातून कृष्ण आणि राधा यांच्या उच्च आध्यात्मिक प्रीतीला व्यावहारिक उथळ प्रेमाच्या स्तरावर (निम्न स्तरावर) आणले आहे.

आ. ‘राधा कृष्णावरी भाळली’ हे अतिशय जुने नावाजलेले भावगीत आहे. येथेही गाण्याच्या शब्दांचा अर्थ वास्तविकतेचे विडंबन करणाराच आहेे.

इ. ‘विसरू नको श्रीरामा मला’ हे गीत मुळात प्रभु श्रीरामचंद्रांना उद्देशून नाहीच. चित्रपटातील अभिनेत्याचे नाव ‘श्रीराम’ आहे. त्याला उद्देशून अभिनेत्री हे गीत म्हणते. त्यामुळे अशा गाण्यांना ‘भक्तीगीत’ असे संबोधले जाऊ शकत नाही.

 

गीतांत देवतांचा उल्लेख असला, तरी त्यांत
व्यावहारिक प्रेमाचे उथळ प्रदर्शन असल्याने त्यातून देवतांचे विडंबन होणे

बर्‍याच भावगीतांत देवतांचा उल्लेख असल्याने वरकरणी ती ‘भावगीते’ अथवा ‘भक्तीगीते’ वाटत असली, तरी त्यांत व्यावहारिक प्रेमाचे उथळ प्रदर्शन असते. त्यामुळे ही कथित भावगीते अथवा भक्तीगीते यांचा गायक अन् श्रोते यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही. उलट अशा प्रकारच्या गीतांमुळे देवतांचे विडंबन होते.

 

संतांनी रचलेल्या गीतांत भगवंताप्रतीची भक्ती आणि
व्याकुळता असल्याने गायक अन् श्रोते यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

संतांनी रचलेल्या देवतांविषयीच्या गीतरचनांचा अभ्यास केल्यास त्यांच्या प्रत्येक वाक्यातून भगवंताप्रतीची भक्ती आणि व्याकुळता जाणवते, उदा. संत मीराबाईंनी रचलेली ‘मेरे तो गिरिधर गोपाल’ अन् ‘पायोजी मैंने रामरतन धन पायो’ ही भजने, संत सुरदास यांनी रचलेले ‘वो काला एक बांसुरीवाला’, हे भजन इत्यादी. या भजनांमुळे गायक आणि श्रोते यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्यांना ‘भावजागृती होणे, आनंद जाणवणे, शांती अनुभवणे’, अशा आध्यात्मिक अनुभूती येतात.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment