मध्यमवयीन महिलांचा शबरीमाला देवस्थानातील प्रवेश धर्मसंमत आहे का ? – श्री. बी. रामभट पटवर्धन

 shabarimala_temple

 

१. धर्म किंवा कायदा विश्‍वशांतीसाठी
आणि समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे आताच्या
युवावर्गाच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट !

ram_bhat_sulya_karnatak_2013
श्री. बी. रामभट पटवर्धन

अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्‍वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धर्मशिक्षणापासून वंचित राहिलेल्यांनी धर्मपालन का करायचे ?, हे जिज्ञासेने जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती स्वागतार्ह गोष्ट म्हणावी लागेल; परंतु आपल्यालाच बुद्धी आहे आणि आपल्यालाच सर्व समजते, अशा अहंभावाने विरोधासाठी विरोध म्हणून लढा दिल्यास त्याला स्वेच्छाचार अथवा उद्धटपणा हे शब्दच चपखल बसतील.

 

२. ही प्रवृत्ती वाढण्यास डाव्या विचारसरणीतील नास्तिकवादी, हिंदुद्वेष्टे,
तसेच राजकारणी यांनी हिंदु धर्माविषयी केलेला अपप्रचारच कारणीभूत !

     ही प्रवृत्ती वाढण्यास वाट चुकलेल्या निष्पाप मनावर डाव्या विचारसरणीतील नास्तिकवादी, तसेच शिक्षणासारख्या उच्च क्षेत्रात वरिष्ठ पदे भूषवणारे तथाकथित विचारवादी, हिंदुद्वेष्टे आणि आजचे नीच राजकारणी हिंदु धर्माविषयी करत असलेला अपप्रचारच कारणीभूत आहे. त्यांच्याकडून विशेषत्वाने हिंदूंच्या श्रद्धास्थानांविरुद्ध टीका होणे आणि अपप्रचार करणे, हे खंडणीय आहे.

 

३. शबरीमाला येथील श्री अय्यप्पस्वामींच्या जागृत देवस्थानात
१० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश नसणे,
हे अनेक वर्षांपासून चालत आले असून याला तात्त्विक, आध्यात्मिक आणि धर्मशास्त्रीय पार्श्‍वभूमी असणे

     केरळमधील इतिहासप्रसिद्ध शबरीमाला येथील श्री अय्यप्पस्वामींच्या जागृत देवस्थानात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश नसणे, हे अनेक वर्षांपासून चालत आले आहे. त्याचप्रमाणे धर्मस्थळ येथील श्री अण्णप्पस्वामी डोंगरासारख्या जागृत ठिकाणीही महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. मुसलमान महिलांनाही मशिदीत प्रवेश नसतो. आमचा समाज पुरुषप्रधान असल्याच्या एकमेव कारणावरून हे बंधन घालण्यात आलेले नाही. उलट यामागे तात्त्विक, आध्यात्मिक आणि धर्मशास्त्रीय पार्श्‍वभूमी आहे. श्रद्धा हा वैज्ञानिक प्रयोगशाळेत होणार्‍या प्रयोगातून सिद्ध होणारा विषय नाही. ही पार्श्‍वभूमी समजून घेण्याचे कष्ट आजची युवा पिढी घेत नाही. उलट संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन केले नाही, तरी संविधानिक हक्क मागण्याचे प्रयत्न चालले आहेत. शास्त्रीय पार्श्‍वभूमीचे महत्त्व राहू दे, आधी आपण भौतिक पार्श्‍वभूमीच जाणून घेऊया.

 

४. देशाचे संविधान हे सुसूत्र राज्यकारभारासाठी असते;
परंतु ते परमात्म्याचे गुणधर्म असलेल्या सनातन धर्मावर आघात करणारे असू नये !

     आम्ही पुरुषांपेक्षा कशातही न्यून नाही, असे आजच्या महिलांनी संवैधानिक समानतेच्या दृष्टीने सांगितले, तरी प्रकृतीने स्त्री-पुरुषांची शरीररचना विश्‍वाच्या सृष्टीनियमांना अनुसरूनच वेगवेगळी केली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आपापल्या देहप्रकृतीनुसार आपापली कर्तव्ये समर्पकपणे करून विश्‍वात सुख-शांती स्थापित करावी, हा परमात्म्याचा संकल्प आहे. ही गोष्ट देशाचे संविधान कधीच पालटू शकत नाही. देशाचे संविधान हे सुसूत्र राज्यकारभारासाठी असते; परंतु ते परमात्म्याचे गुणधर्म असलेल्या सनातन धर्मावर आघात करणारे असू नये. संविधानात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक पालट करण्यात आले आहेत; परंतु सनातन धर्मात एकही पालट झालेला नाही.

 

५. शबरीमाला अय्यप्पस्वामी देवालयात जाण्यापूर्वी
तीर्थयात्रींना कराव्या लागणार्‍या मंडलपूर्ती या कठोर व्रताचे पालन महिला करू शकत नसणे

     केरळ राज्यातील शबरीमाला अय्यप्पस्वामी देवालय भयंकर जंगली प्राण्यांचा संचार असणार्‍या घनदाट अशा अरण्यात आहे. या देवालयात जाऊन आल्याचे पूर्णफळ मिळावे; म्हणून तीर्थयात्रींना मंडलपूर्ती या कठोर व्रताचे (४८ दिवस) पालन करावे लागते. या अवधीत डोक्याला तेल लावू नये, पायात चप्पल घालू नये, प्रतिदिन ब्राह्ममुहूर्तावर उठून कडाक्याच्या थंडीचा विचार न करता गार पाण्याने अंघोळ करावी, संध्याकाळी असेच व्रतपालन करून मितआहार घेऊन श्री अय्यप्पाच्या अनुसंधानात राहून सात्त्विकता वाढवायची असते. यात्रेच्या शेवटी काट्याकुट्यांच्या घनदाट जंगलाच्या वाटेने सुमारे ५० कि.मी. अंतर आपले गाठोडे डोक्यावर घेऊन पायी चालत जावे लागते. आवश्यकता भासल्यास अरण्यातच रात्रीचा मुक्काम करावा लागतो. तेथे पोचण्यास रांगेत अनेक घंटे थांबून कठीण अशा १८ पायर्‍या चढायच्या असतात. महिलांचे कोमल शरीर हे सर्व पेलू शकेल का ? निसर्गनियमाप्रमाणे महिलांना मासिक पाळी असल्याने ४८ दिवसांचे व्रत त्या अडथळ्यांविना पार पाडू शकणार नाहीत. त्या काळात तिच्या शरिरातील हार्मोन्स पालटाने तिच्यात रज-तम वाढून सात्त्विकता न्यून होते. त्यामुळे तिच्या वागण्यात चढ-उतार होऊन मनाची एकाग्रता रहाणार नाही. अशा स्थितीत कोमल शरिराची महिला पुरुषाशी बरोबरी करून हे कठोर व्रत पाळू शकेल का ?, याविषयी अवलोकन करणे योग्य होईल. एवढेच नव्हे, तर यात्रा करतांना ती अपहृत झाली, तिच्यावर बलात्कार झाला तर ?, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आधी तिनेच शोधली पाहिजेत.

 

६. पूर्वपुण्याईमुळे मिळालेल्या मनुष्यजन्मात अधोगतीकडे न
जाता मानवाने स्वतःच स्वतःचा उद्धार करून घेणे आवश्यक !

      उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
      आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्‍लोक ५

अर्थ : स्वतःच स्वतःचा संसारसमुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.
    मनुष्यजन्म सहजतेने मिळत नाही; म्हणून आत्मोद्धाराकडे आपले मन केंद्रित करावे. धार्मिक श्रद्धास्थाने अपवित्र करून आपणच आपल्यासाठी खड्डा खणून घेऊ नये.

 

७. पुण्यक्षेत्रात केलेली पापे वज्रलेपाप्रमाणे
दृढ होऊन जन्मजन्मांतरापर्यंत बाधत असणे

      अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति ।
      पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति ॥

अर्थ : वेगवेगळ्या ठिकाणी केलेली पापे पुण्यक्षेत्राच्या दर्शनाने नष्ट होतात; परंतु पुण्यक्षेत्रात केलेली पापे वज्रलेपाप्रमाणे दृढ होऊन जन्मजन्मांतरापर्यंत बाधतात.

 

८. पापाचा परिहार करण्याऐवजी पुण्यक्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करून
तिथल्या पावित्र्याचा नाश करून पापसंचय करणे कितपत योग्य आहे ?

    शबरीमाला यात्रा करण्याची इच्छा करणार्‍या महिलांनी ऋतूचक्र थोड्या काळासाठी पुढे ढकलून (औषधांच्या साहाय्याने) यात्रा का करू नये ?, असा प्रश्‍न बुद्धीप्रामाण्यवादी करतील. हे सर्व अनिवार्य प्रसंगासाठीच असते. प्रकृतीच्या (निसर्गाच्या) नियमांविरुद्ध केलेले आचरण मनुष्याच्या शरीरस्वास्थ्यावर तीव्र आघात करते. हट्टाने असे आचरण करणार्‍या महिलांमध्ये ऋतूचक्राची अनियमितता निर्माण होणे, रक्तस्राव अधिक होणे, पाळी बंद होणे, शरिरात भयंकर वेदना होणे, सृजनशक्तीला बाधा येणे, असे दुष्परिणाम होतात, असे म्हणतात. काही झाले, तरी भगवंताने निर्मिलेल्या प्रकृतीदत्त नियमांविरुद्ध उभे ठाकणे, हा घोर दैवापराध आहे. त्या अपराधाच्या परिहारासाठी बुद्धीप्रामाण्यवादी कधीही डोके पिकवत नाहीत. जागृत क्षेत्री यात्रेला जाणे, म्हणजे पिकनिकला जाणे नव्हे. पापाचा परिहार करण्याऐवजी पुण्यक्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करून तिथल्या पावित्र्याचा नाश करून पापसंचय करणे कितपत योग्य आहे ?, याविषयी संबंधितांनी गंभीर चिंतन करणे आवश्यक आहे.

– श्री. बी. रामभट पटवर्धन, सुळ्या (२२.१.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात