इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्‍याचा वृत्तांत

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

‘ज्या ठिकाणी समुद्रमंथन घडले, तो भूभाग म्हणजे आताचा इंडोनेशिया ! समुद्रमंथनाचा रवी बनलेला सुमेरू पर्वतही याच भागात आहे. जगातील सर्वांत मोठे द्वीपराष्ट्र म्हणजे इंडोनेशिया होय. १७ सहस्रांहून अधिक द्वीप असलेले हे राष्ट्र हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यामध्ये १ सहस्र ७०० मैल क्षेत्रात पसरलेले आहे. त्याच्या पूर्वेकडून पश्‍चिमेकडे जागतिक स्तरावरील १३९ घातक ज्वालामुखी आहेत. प्रत्येक ज्वालामुखीला लाखो वर्षांचा इतिहास आहे. १५ व्या शतकापर्यंत इंडोनेशियात श्रीविजय, मातरम्, शैलेंद्र, संजया, मजपाहित यांसारखे हिंदु राजांचे राज्य होते. जावा बेटावर ‘जावानीस्’, बाली द्वीपावर ‘बालीनीस्’ या भाषा जरी असल्या, तरी पूर्वी सर्व लोक संस्कृत भाषेला मातृभाषा मानायचे. त्यानंतर मुसलमानांच्या आक्रमणामुळे येथील भाषा आणि संस्कृती पालटली, तरीही येथील नागरिक आधी हिंदु होते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात हिंदु धर्मातील विविध पैलू आढळतात. अशा प्रकारे एकेकाळी जगभर पसरलेल्या हिंदु संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी साधक सध्या इंडोनेशियाच्या दौर्‍यावर आहेत.

 

इंडोनेशियामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा सण !

इंडोनेशिया येथे ‘न्येपी’ या नावाने साजरा करण्यात येणार्‍या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत सहभागी हिंदू
इंडोनेशिया येथे गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत सहभागी हिंदु धर्माभिमानी श्री. गोपालन् (क्र. ३) आणि अन्य धर्मप्रेमी

‘इंडोनेशियातील स्थानिक पंचांगानुसार १७ मार्च या दिवशी येथे गुढीपाडवा हा सण ‘न्येपी’ या नावाने साजरा करण्यात येतो. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार विशेषत: बाली बेटावरील हिंदूंकडून साजरा होणारा हा सण ‘शांतता दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त इंडोनेशिया सरकारकडून बाली येथे सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात येते, याविषयी इंडोनेशियाच्या दूरसंचार मंत्रालयाने सांगितले, ‘‘बालीमधील हिंदु धार्मिक नेत्यांनी १७ मार्चला सकाळी ६ वाजल्यापासून २४ घंट्यांसाठी ‘इंटरनेट’ सेवा बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे धार्मिक नेत्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व दूरसंचार आस्थापनांना तसा आदेश दिला. तथापि अती महत्त्वाच्या ठिकाणी मात्र ‘ब्रॉडबॅण्ड’ सेवा चालू राहील.’’

 

इंडोनेशियात गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची पद्धत

१. इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात; मात्र हे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गुढीपाडव्याचा सण नववर्षारंभ म्हणून ‘न्येपी’ या नावाने साजरा केला जातो.

२. येथे गुढीपाडवा हा ‘शांतता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर या सणाविषयीचा आदर म्हणून यंदा सरकारने येथील सर्व दूरसंचार सेवा देणार्‍या आस्थापनांना बाली बेटात भ्रमणभाष इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा आदेश दिला. एवढेच नव्हे, तर सरकारने यंदा बाली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळही दिवसभर बंद ठेवले होते. गुढीपाडव्यानिमित्त येथील सर्व दुकाने आणि पर्यटनस्थळे बंद ठेवली जातात. तथापि सार्वजनिक सेवांमध्ये रुग्णालये चालू असतात.

३. गुढीपाडव्याच्या दिवशी बाली द्वीपात सर्वकाही शांत असते. त्याचे कारण म्हणजे गुढीपाडवा हा ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा दिवस ! तेथील लोकांकडून कळाले की, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वेळी जशी शांतता होती, तशी शांतता रहाण्यासाठी येथे प्रार्थना करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत ‘न्येपी’ हा दिवस आत्मचिंतनासाठी राखून ठेवला आहे आणि म्हणूनच या प्रयत्नांमध्ये व्यत्यय आणणारी कोणतीही गोष्ट तेथे प्रतिबंधित आहे.

४. या दिवशी अग्नी प्रज्वलित करणे, मनोरंजन करणे, प्रवास करणे, इतरांशी बोलणे इत्यादी गोष्टींवर निर्बंध असतात. या निर्बंधांचा परिणाम म्हणजे बालीमधील रहदारीचे रस्ते सामान्यतः रिकामे होतात. या दिवशी बहुतांश हिंदू जेवणही घेत नाही, तसेच इतरांशी अनावश्यक बोलत नाहीत. या दिवशी संपूर्ण ‘ब्लॅकआऊट’ (काळोख) असतो, म्हणजे घरातील आणि रस्त्यावरील सर्व दिवे बंद असतात. दूरचित्रवाहिनी आणि रेडिओ लावले जात नाहीत. थोड्या काही हालचालीही घरातच अगदी आत असतात. घराबाहेर फक्त पारंपरिक सुरक्षेच्या दृष्टीने नेमलेल्या व्यक्ती असतात. या व्यक्ती ‘सर्वांकडून हे निर्बंध पाळले जात आहेत ना’, हे पहाण्यासाठी रस्त्यांवर गस्त घालत असतात.

५. ‘या दिवशी अनिष्ट शक्ती पृथ्वीच्या जवळ येत असतात’, अशी लोकांची धारणा आहे. ‘या अनिष्ट शक्तींना आपण दिसू नये, तसेच येथील सर्व लोक निघून गेले आहेत, असे त्यांना वाटावे’, याकरता सर्वत्र काळोख केला जातो. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पूजा केली जाते. अनिष्ट शक्तींच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्या प्रतिमेचे दहन करण्यात येते.’

– श्री. विनायक शानभाग, सुराबाया, इंडोनेशिया.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment