स्वयंसूचनेच्या संदर्भात टाळावयाच्या चुका

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेत स्वयंसूचना तयार करणे व स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे, हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. यांपैकी एका टप्प्यात जरी चूक झाली, तरी प्रक्रियेचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. त्यामुळे प्रक्रिया अमलात आणूनही माझ्यातील स्वभावदोष का दूर होत नाहीत, असे वाटून नैराश्य येऊ शकते. असे होऊ नये, यासाठी स्वयंसूचनेच्या संदर्भात पुढील चुका टाळाव्यात.

 

१. स्वयंसूचना देणे टाळून वृत्तीच्या स्तराऐवजी
केवळ कृतीच्या स्तरावर बदल करण्याचा प्रयत्न करणे

काही जण अयोग्य कृतीस कारणीभूत असलेल्या स्वभावदोषावर स्वयंसूचना देण्याऐवजी तक्त्यात योग्य कृती लिहून फक्त कृतीच्या स्तरावर बदल करण्याचा प्रयत्न करतात. केवळ कृती बदलल्याने वृत्तीत लवकर परिवर्तन होत नाही. अयोग्य कृती होण्यास कारणीभूत असलेल्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्यामुळे चित्तावरील अयोग्य संस्कारांच्या जागी योग्य संस्कार निर्माण होतो व वृत्तीतच सकारात्मक बदल होतो. आजाराची लक्षणे कमी करण्यापेक्षा आजाराचे मूळ कारण दूर केल्यास त्याची लक्षणे आपोआपच कमी होतात, हेच तत्त्व स्वयंसूचनेच्या संदर्भातही लागू होते.

 

२. स्वभावदोष-निर्मूलन तक्त्यातील योग्य कृती व
योग्य प्रतिक्रिया यांसाठी द्यावयाच्या स्वयंसूचनेचा रकाना न लिहिणे

बरेच जण तक्त्यात फक्त अयोग्य कृती किंवा अयोग्य प्रतिक्रिया लिहितात. त्यांच्या संदर्भात योग्य कृती किंवा योग्य प्रतिक्रिया कोणती असायला हवी, याबाबत तक्त्यातील स्वयंसूचनेच्या रकान्यात स्वयंसूचना लिहीत नाहीत. त्यामुळे व्यक्तीत अपेक्षित सुधारणा दिसत नाही. अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात योग्य कृती व्हावी किंवा योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी स्वयंसूचना लिहिणे, म्हणजे एक प्रकारे आपल्याकडून झालेल्या चुकीबाबत स्वतःच स्वतःच्या मनाला दिलेली सूचना असते. त्यामुळे अयोग्य संस्काराच्या जागी योग्य संस्कार निर्माण होऊन स्वभावदोष दूर होण्यास मदत होते.

 

३. स्वभावदोष-निर्मूलन तक्त्यात अयोग्य कृती व
अयोग्य प्रतिक्रिया यांची नोंद करून स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे टाळणे

एका स्वभावदोषामुळे अनेक प्रसंगांमध्ये वारंवार अयोग्य कृती होतात आणि / किंवा अयोग्य प्रतिक्रिया येतात. असे असतांना एका प्रसंगावरून स्वयंसूचना दिल्यामुळे स्वभावदोष कसा दूर होईल, असा विचार करून काही व्यक्ती स्वभावदोष-निर्मूलन तक्ता लिहितात; पण स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे मात्र टाळतात.

येथे प्रसंग व वेळ या घटकांपेक्षा आपल्याकडून होणारी अयोग्य कृती वा अयोग्य प्रतिक्रिया आणि तिच्याशी निगडित असलेला स्वभावदोष हा प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, हे लक्षात घ्यावे. स्वयंसूचनेद्वारे एखाद्या प्रसंगाच्या माध्यमातून अयोग्य कृती वा अयोग्य प्रतिक्रिया यांना कारणीभूत असलेल्या स्वभावदोषापर्यंत पोहोचून चित्तावर अयोग्य संस्काराच्या जागी योग्य संस्कार निर्माण होतो. त्यामुळे स्वभावदोष दूर झाल्यानंतर त्याच्याशी निगडित असणार्‍या बर्‍याच प्रसंगांमध्ये आपल्याकडून योग्यच कृती होतात व योग्यच प्रतिक्रिया व्यक्त होतात किंवा मनात उमटतात. त्यामुळे स्वयंसूचनेची अभ्याससत्रे करणे आवश्यक आहे.

 

४. अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया यांच्या मुळाशी
असलेला योग्य स्वभावदोष शोधून त्यावर स्वयंसूचना न देणे

बरेच जण अयोग्य कृती व अयोग्य प्रतिक्रिया यांच्यामागे लक्षात आलेल्या ढोबळ स्वभावदोषावर सूचना देतात. त्या ढोबळ स्वभावदोषाच्या मुळाशी नेमका कोणता स्वभावदोष आहे, तो शोधून काढत नाहीत, उदा. विशिष्ट जबाबदारी असलेल्या साधकाकडून चूक झाल्यास दुसरा साधक सेवा करील, असे गृहीत धरल्यामुळे विशिष्ट सेवा केली नाही, अशी चूक एका साधकाने स्वभावदोष-निर्मूलन तक्त्यात लिहिली; परंतु प्रत्यक्षात विशिष्ट सेवा पूर्ण करणे ही स्वतःची जबाबदारी असल्याची जाणीव नसल्याने त्या साधकाने दुसरा साधक ती सेवा करील, असे गृहीत धरले. या प्रसंगात जबाबदारीची जाणीव नसणे किंवा बेजबाबदारपणा हा मूळ स्वभावदोष असल्यामुळे तो दूर करण्यासाठी स्वयंसूचना देणे आवश्यक आहे. यावरून आपल्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीच्या मुळाशी जाऊन नेमका स्वभावदोष शोधून त्यावर विशिष्ट स्वयंसूचना
तयार करणे आवश्यक आहे, हे लक्षात येईल.

 

५. प्रसंगानुरूप विशिष्ट स्वयंसूचना न देणे

एखाद्या स्वभावदोषाचे अनेक प्रसंगांमधून प्रकटीकरण होत असते. त्यामुळे एका प्रसंगावर आधारित स्वयंसूचना दिल्यास त्याच स्वभावदोषामुळे इतर प्रसंगांमध्ये आपल्याकडून झालेल्या अयोग्य कृृती किंवा मनात उमटलेल्या अथवा व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया यांच्यात सुधारणा कशी होईल, असा विचार करून काही जण सर्वसामान्य सूचना देतात. प्रसंगानुरूप स्वयंसूचना दिल्यास विशिष्ट प्रसंगात आपल्याकडून झालेली अयोग्य कृती किंवा मनात उमटलेली अथवा आपल्याकडून व्यक्त झालेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्यात प्रसंगानुरूप अपेक्षित बदल करण्यासाठी संबंधित योग्य कृती किंवा योग्य प्रतिक्रिया यांचा संस्कार चित्तावर निर्माण करून स्वभावदोषात टप्प्याटप्प्याने सुधारणा करणे सोपे होते.

 

६. योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी स्वयंसूचना
देण्याऐवजी प्रतिक्रिया येऊ नये, यासाठी स्वयंसूचना देणे

प्रसंगात योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी स्वयंसूचना देण्याऐवजी एका व्यक्तीने स्वभावदोषाच्या संदर्भात प्रतिक्रिया येऊ नये, यासाठी स्वयंसूचना दिल्या. अयोग्य प्रतिक्रियेच्या जागी योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी आवश्यक मुद्यांचा अंतर्भाव स्वयंसूचनेत केला नसल्यामुळे अनेक दिवस स्वयंसूचना देऊनही तिच्या स्वभावदोषात काही फरक पडला नाही. स्वयंसूचना योग्य असल्यास व ती योग्य पद्धतीने नियमितपणे दिल्यासच स्वभावदोष लवकर दूर होण्यास मदत होते.

 

७. एका वेळी एका स्वभावदोषाच्या एकापेक्षा
अधिक अभिव्यक्तींचा अंतर्भाव एका स्वयंसूचनेत करणे

प्रसंगानुरूप सूचना द्यावी, असे सांगितल्यानंतर काही जण एखाद्या स्वभावदोषामुळे घडणार्‍या एकापेक्षा अधिक अयोग्य कृती वा मनात येणार्‍या किंवा व्यक्त होणार्‍या एकापेक्षा अधिक अयोग्य प्रतिक्रिया यांचा अंतर्भाव एकाच स्वयंसूचनेत करतात. एकाच वेळी एकापेक्षा अधिक अयोग्य कृती वा अयोग्य प्रतिक्रिया यांच्यात सुधारणा करण्यास चित्ताकडून विरोध होतो. त्यामुळे स्वभावदोषात अपेक्षित सुधारणा दिसत नाही.

मोळीतील सर्व लाकडे एकाच वेळी तोडण्यापेक्षा मोळीतील एकेक लाकूड तोडणे तुलनेने सोपे असते, हेच तत्त्व प्रसंगानुरूप एकेका अभिव्यक्तीशी संबंधित स्वयंसूचना तयार करण्याबाबतही लागू होते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ `स्वभावदोष-निर्मूलन : खंड २’

Leave a Comment