साधकांनो, संकटकाळात आपले आणि समष्टीचे रक्षण होण्यासाठी देवाकडे भक्ती, बुद्धी आणि शक्ती मागा !

‘आता स्थुलातील संकटकाळाला आरंभ झाला आहे. स्थुलातील संकटकाळात कार्य करतांना सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही स्तरांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आध्यात्मिक शक्तीसह मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक या स्तरांवरील शक्तींचीही आवश्यकता असते. यामुळे प्रतीदिन साधकांनी देवाला प्रार्थना करतांना भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांची मागणी करणे आवश्यक आहे. भक्तीमुळे सूक्ष्म स्तरावरील अडथळे न्यून होतात, तर बुद्धी आणि शक्ती यांमुळे स्थूल संकटापासून रक्षण होते आणि स्थुलातून आक्रमण झाल्यास प्रतिकार करायला आवश्यक बळ मिळते. त्यामुळे स्वतः संकटकाळात अडकल्यावर किंवा अन्य साधकांवर संकट असल्याचे कळल्यावर त्या संकटावर मात करण्यासाठी देवाकडे स्वतःला किंवा त्या साधकाला भक्ती, बुद्धी आणि शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करा.’

– श्री. निषाद देशमुख (स्वप्नात मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०१७, रात्री १०.२५)

 

संकटकाळात भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांच्या समन्वयाने कार्य करण्याचे महत्त्व !

श्री. निषाद देशमुख

१. भक्ती

‘भक्ती म्हणजे ईश्‍वराशी असलेले अखंड अनुसंधान. अखंड अनुसंधानामुळे जीव देवापासून विभक्त होत नाही. जो देवापासून विभक्त नाही, तो भक्त आणि जी अखंड अनुसंधानात रहायला शिकवते, ती भक्ती. संकटकाळात रज-तम गुणांच्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे जिवाला त्रास होतो. भक्तीमुळे जिवाला अनुसंधानाच्या माध्यमातून चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपित करता येते. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या समष्टीचे रज-तम गुणांपासून रक्षण होते.

२. बुद्धी

जोपर्यंत रोगाचे निदान, म्हणजे कोणत्या कारणामुळे ते रोग झाले आहेत, हे कळत नाही, तोपर्यंत त्याचा उपचार करता येत नाही. तसेच केवळ रोगाचे कारण शोधून उपयोग नसतो. त्यावर प्रभावी उपाययोजना काढणे आवश्यक असते. शोध, विश्‍लेषण आणि चिकित्सा हे बुद्धीचे कार्य आहे. बुद्धीमुळे संकटकाळात इतरांवर निर्भर न रहाता स्वावलंबीपणे संकटाचे निदान करणे आणि उपाययोजना काढणे शक्य होते. त्यामुळे स्वतःचे आणि समष्टीचे रक्षण करता येते.

३. शक्ती

बुद्धीतून संकटाचे कारण आणि उपाय शोधले, तरी शक्ती नसल्यावर संकटावर मात करता येत नाही. शक्ती असल्यावर स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करता येते. त्यामुळे संकटकाळात स्थुलातून रक्षण होण्यासाठी शक्ती असणेही आवश्यक असते.

४. भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांच्या समन्वयाने ईश्‍वरी शक्तीतून संकटावर मात होणे

ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या समतोलत्वाने कार्य केल्यावर त्यातून यश मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून त्रास होण्याचे प्रमाण अत्यल्प असते. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचे स्थूल प्रकटीकरण म्हणजे बुद्धी, भक्ती आणि शक्ती. संकटकाळात भक्ती, बुद्धी आणि शक्ती यांच्या समन्वयाने कार्य केल्यावर ईश्‍वरी शक्तीच्या साहाय्यने संकटावर मात करता येते. त्यामुळे काळानुसार अन्य प्रार्थनांसह भक्ती, बुद्धी आणि शक्ती मिळण्याची प्रार्थनाही देवाकडे करणे आवश्यक आहे.’

– श्री. निषाद देशमुख (स्वप्नात मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०१७, रात्री ११.११)

Leave a Comment