नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज (वय ८६ वर्षे) यांचा देहत्याग

परिचय

प.पू. काणे महाराज यांचा जन्म वर्ष १९३२ मध्ये होळीपौर्णिमेच्या दिवशी झाला. त्यांनी आयुर्वेद शाखेतील पदवी (बी.ए.एम्.एस्.) प्राप्त केली होती. ठाणे जिल्ह्यात त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर शासकीय चाकरी केली होती. ते स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने स्वयंसेवक होते. संघाचे संस्थापक पू. डॉ. हेडगेवार आणि पू. गोळवलकरगुरुजी यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. प.पू. काणे महाराज यांनी आध्यात्मिक आणि राजकीय विषयावर विपुल लेखन केले. त्यांचा प्रस्थानत्रयी, भगवद्गीतेचे शांकरभाष्य, ब्राह्मसूत्र आणि सर्व उपनिषदे यांचा सांगोपांग अभ्यास होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. काणे महाराज (डावीकडे) (वर्ष १९९३)
देहत्यागानंतरचे प.पू. काणे महाराज यांचे छायाचित्र

पुणे – येथील खेड तालुक्यातील नारायणगावातील प.पू. काणे महाराज (वय ८६ वर्षे) यांनी २२ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देहत्याग केला.

प.पू. काणे महाराज हे इंदूर येथील थोर संत तथा सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. शशिकांत ठुसे यांच्या नारायणगाव येथील घरी रहात असत आणि श्री. ठुसे हे त्यांच्या शेतातील घरात रहातात. गेल्या २ मासांपासून त्यांनी अन्न-पाणी घेणे कमी केले होते. १७.१०.२०१७ या दिवशी प.पू. काणे महाराज श्री. ठुसे यांच्या शेतातील घरात रहाण्यासाठी आले आणि त्यांनी श्री. ठुसे यांना सांगितले, ‘‘आता मी देहत्याग करणार. माझी समाधी बांधू नका. तेथे पिंपळाचे झाड लावा.’’ तेव्हापासून म्हणजे ६ दिवस त्यांनी अन्न-पाणी वर्ज्य केले होते. २२.१०.२०१७ या दिवशी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी देहत्याग केला. त्यांच्यावर नारायणगावमधील मनोहरबागेमध्ये २२ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भक्त श्री. शामदादा कोल्हे यांनी त्यांना अग्नी दिला. या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे चिरंजीव श्री. सुशील कसरेकर यांच्यासह १५० हून अधिक भक्त उपस्थित होते. प.पू. काणे महाराज यांच्या देहत्यागाच्या १४ व्या दिवशी, म्हणजेच ४ नोव्हेंबरला भंडारा आयोजित करण्यात आला आहे.

 

प.पू. काणे महाराज यांचे आध्यात्मिक गुरु

सज्जनगड येथील श्री भगवान श्रीधरस्वामी, श्री दत्त चिलेमहाराज, पू. अमलानंद, अमरावती येथील पू. अण्णा महाराज जोशी, स्वामी स्वरूपानंद, प.पू. भक्तराज महाराज आणि आळंदी येथील आनंदाश्रमस्वामी (सुरेगाव)

 

प.पू. काणे महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार होत असतांना आलेली अनुभूती

‘प.पू. काणे महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी चालू झाल्यावर वातावरण शांत होते. त्या वेळी मंद सुगंध येत होता. प.पू. काणे महाराज यांचा तोंडवळा शांत आणि तेजोमय वाटत होता. या वेळी आध्यात्मिक उपायही होत आहे, असे जाणवत होते.’

– श्री. महेंद्रकुमार भावसार, राजगुरुनगर, जिल्हा पुणे.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प.पू. काणे महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

‘१९८७ या वर्षी प.पू. भक्तराज महाराज जीवनात येण्याआधी काही संतांनी मला अध्यात्मशास्त्र शिकवले. त्यांतील एक प्रमुख म्हणजे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील प.पू. काणे महाराज ! वर्ष १९८९ ते १९९३ या काळात ते अनेकदा आमच्या घरी राहिले. त्यांनी अध्यात्माची बरीच तात्त्विक माहिती दिली. ती सनातनच्या ग्रंथांत दिली आहे.

त्यांचे आमच्या घरच्या वास्तव्यामुळे ‘संत बोलतात, वागतात कसे ? संतांबरोबर कसे वागायचे ?’ इत्यादी अनेक गोष्टी मला शिकता आल्या, म्हणजे एक प्रकारे साधनेचा पायाच त्यांनी घातला. आता तर ‘संत देहत्याग कसा करतात’, हेही त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून शिकवले.

‘प.पू. काणे महाराज यांची कृपा माझ्यावर आणि सनातनवर अखंड राहो’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment