श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी केलेले धर्मप्रसाराचे कार्य !

श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी वर्ष १९१२ मध्ये माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमी) या दिवशी पालघर, जिल्हा ठाणे येथे संजीवन समाधी घेतली. त्यानंतर माझे पणजोबा श्री. लक्ष्मण पाठक यांनी ९६ वर्षांपूर्वी उपासनेसाठी मालाड, मुंबई येथे स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली.

श्री. पाठक यांच्या घरातील श्री पद्मनाभ स्वामींची नयनमनोहर मूर्ती

 

१. श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी अनेक स्तोत्रे, आरत्या आणि भजने रचणे

‘श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज हे नारदमुनींचे कलियुगातील अवतार आहेत. श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी भारतभर भ्रमण करून धर्मप्रसाराचे कार्य केले. त्यांनी अनेक जणांना शाकाहार करण्यास उद्युक्त केले. त्यांनी अनेक जणांना व्यसनमुक्त करून साधनामार्गाला लावले. पांचाळ ज्ञातीबांधवांपैकी अनेक जणांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांनी अनेक स्तोत्रे, आरत्या आणि भजने रचली आहेत. पद्मनाभ स्वामी संप्रदायातील सर्वजण त्याच आरत्या, स्तोत्रे आणि विधींमधील मंत्र म्हणतात. त्यांनी अनेक ठिकाणी कीर्तने, प्रवचने आणि धार्मिक विधी करून लोकोद्धाराचे कार्य केले. ते गुरुमंत्र देत असत, तसेच दीक्षा देऊन गुरुगृहीची नावे ठेवत, उदा. यदूर्वेदस्वामी इत्यादी. त्यांनी १६ धर्मप्रसारक नेमून प्रसार केला. या धर्मप्रसारकांना ‘१६ भारतीय’ असे म्हणत.

 

२. पद्मनाभस्वामींच्या सत्संगात जाऊ लागल्यानंतर पणजोबांमध्ये
आमूलाग्र पालट झाल्याने पद्मनाभस्वामींनी त्यांचे नाव पालटून त्यांना धर्मप्रसारक म्हणून नेमणे

माझेे पणजोबा श्री. लक्ष्मण पाठक हे पूर्वी मांसाहारी होते. ते लोकांना दमदाटी करत. पद्मनाभस्वामींच्या सत्संगात जाऊ लागल्यानंतर त्यांच्यात आमूलाग्र पालट झाला. त्यामुळे पद्मनाभस्वामींनी पणजोबांना दीक्षा देऊन त्यांचे ‘यदूर्वेदस्वामी’ असे नाव ठेवले. आमचे पूर्वीचे आडनाव पालटून पाठक ठेवले. पुढे पद्मनाभस्वामींनी नेमलेल्या १६ भारतियांंमध्ये आमचे पणजोबा श्री. लक्ष्मण पाठक (यदूर्वेदस्वामी) हेही धर्मप्रसारक होते.

 

३. पणजोबांनी श्री पद्मनाभ स्वामींची मूूर्ती बनवून घेऊन घरी मूर्तीची स्थापना
करणे आणि मूर्ती पहाणार्‍या व्यक्तीला ‘प्रत्यक्ष पद्मनाभ स्वामी उभे आहेत’, अशी अनुभूती येणे

श्री पद्मनाभ स्वामींची उपासना घराण्यात चालू रहावी, यासाठी पणजोबांनी मुंबईतील मालाड येथील घरात त्यांच्या मूर्तीची स्थापना केली. त्यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमी शके १८४३ (२०.२.१९२१) या दिवशी घरातील एका खोलीत मंदिराची स्थापना केली. ‘स्वामींसारखी हुबेहूब मूर्ती असावी’, या भावाने त्यांनी त्या काळी जोधपूर, राजस्थान येथील सुप्रसिद्ध मूर्तीकारांकडून संगमरवरी मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीचे वजन २०० किलो आहे. मूर्ती पहाणार्‍या व्यक्तीला ‘प्रत्यक्ष पद्मनाभ स्वामी उभे आहेत’, अशी अनुभूती येते.

 

४. मूर्तीत चैतन्य असणेे

एका संतांनी सांगितले, ‘‘या मूर्तीला आठ तपे पूर्ण झाल्याने तिच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे.’’ गेली ९६ वर्षे गुढीपाडवा, श्रावणी विधी, नवरात्र, तुलसी विवाह आणि पद्मनाभ जयंती हे सण नियमितपणे साजरे केले जातात.’

– श्री. बळवंत पाठक, सनातन संकुल, देवद, पनवेल (२५.८.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment