सनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो ! – धर्मप्रेमी सौ. स्नेहा अग्रवाल

खोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.

मला सनातन धर्माविषयी अधिकाधिक माहिती घेण्याची आवड आहे. मी सनातनच्या आश्रमांविषयी पुष्कळ ऐकले होते. आमचे कुटुंब सनातन प्रभातचे नियमित वाचक आहे. मला उत्सुकता वाटायची, एवढ्या सुंदर नियतकालिकाचे एवढे सुंदर कार्य करणारे साधक आणि त्या नियतकालिकाचे कार्यस्थळ कसे असेल ? तेथील साधक भक्तीमध्ये लीन होऊन कशा प्रकारे कार्य करत असतील ? ईश्‍वरकृपेने मला श्री. नरेंद्र सुर्वे यांचे नाव आठवले आणि मी त्यांच्याजवळ आश्रमदर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनीही अतिशय आनंदाने आमच्या आश्रमदर्शनाची व्यवस्था केली.

१. आश्रमातील सात्त्विक वातावरण आणि साधकांचे वागणे पाहून मन प्रफुल्लित होणे

१२.१.२०१७ या दिवशी आम्ही सनातनच्या देवद आश्रमात आलो. आम्ही आश्रमाच्या परिसरात प्रवेश करताच मनाला एक वेगळ्या प्रकारची सुखद संवेदना जाणवली. तेथील साधक एवढे शांत आणि सात्त्विक वाटले की, त्यांचे वागणे पाहून मन प्रफुल्लित झाले. त्यांची सहकार्याची भावना पाहून मन भारावून गेले. एका साधिकेने आम्हाला पूर्ण आश्रम दाखवला. तेथील साधकांचे बोलणे आणि त्यांच्या तोंडवळ्यावर झळकणारे तेज पाहून आम्हाला साक्षात् ईश्‍वराचेच दर्शन झाले. तेथील सगळे जण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वतःला परमात्म्याच्या चरणी समर्पित करत आहेत आणि त्या माध्यमातून सर्वांनाच श्रीकृष्णचरणी कर्म अर्पण करण्याची शिकवण देत आहेत. ते सर्व कर्मे धर्मासाठीच करत आहेत.

२. आश्रमातील साधकांची तळमळ पाहून ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढणे

आश्रमातील सात्त्विक वातावरण, तेथे केले जाणारे सात्त्विक वस्तूंचे उत्पादन आणि ग्रंथ पाहून त्या सर्वांमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व जाणवले. आजच्या या तामसिक आणि धावपळीच्या जीवनात दुर्मिळ अशी सात्त्विकता आणि शांती यांचा मी प्रथमच अनुभव घेतला. आश्रमातील सर्व साधकांची तळमळ पाहून आमच्यातही ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढली.

मी आश्रमातील सर्वांचे यासाठी आभार मानते. आश्रम पाहिल्याने मी स्वतःला धन्य समजते. श्री. नरेंद्र सुर्वे यांचे विशेष आभार मानते. दादा त्यांच्या नावाप्रमाणेच कार्य करत आहेत. या कलियुगात धर्मसंस्थापनेसाठी ते जे कार्य करत आहेत, त्यामध्ये ते यशस्वी होवोत, अशी प्रार्थना करते.

– सौ. स्नेहा भरत अग्रवाल आणि कुटुंबीय, खोपोली (१२.१.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment