अमृतवाणी भाग – ३ या ग्रंथातील निवडक लिखाण

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये

पृथ्वीची उत्पत्ती

१. ॐकाराची निर्मिती, ॐकारातून प्रथम परमेश्‍वराची
आणि नंतर ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची उत्पत्ती होणे

पृथ्वीच्या उत्पत्ती अगोदर परमेश्‍वर ! या अवकाशामध्ये नुसती हवाच वहात होती. त्या हवेची प्रचंड वादळेही निर्माण होत होती. चक्रीवादळामध्ये हवा गोलाकार फिरायची. त्या गोलाकार हवेतून हं ऽ ऽ ऽ ऽ हं ऽ ऽ ऽ ॐ असा ध्वनी येत असे. भगवंताच्याही पूर्वी हवेतून ॐ निर्माण झाला आणि या ॐकाराच्या ध्वनीच्या घर्षणातून प्रथम परमेश्‍वराची उत्पत्ती झाली. या ॐकारातून प्रथम ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची उत्पत्ती झाली.

२, ब्रह्माने अग्नि, विष्णूने वायू आणि महेशाने पाणी निर्माण करणे

ब्रह्म हा ब्रह्मज्ञानी. ब्रह्म हा अग्नीचा स्वामी झाला. ब्रह्माने अग्नि निर्माण केला. वायु आधी होताच. वायूचा स्वामी विष्णु. या वायूत प्रथम विष्णुु निर्माण झाला, म्हणजे प्रकट झाला. मग ब्रह्म आणि महेश ! तेव्हा वायूचा स्वामी विष्णु, म्हणजे विष्णूनेच वायु निर्माण केला, असे म्हणायचे. ब्रह्माने अग्नि, विष्णूने वायू आणि महेशाने पाणी निर्माण केले. पाण्याचा स्वामी महेश.

३. सूर्याची आणि सप्तरंगांची उत्पत्ती

वायूचा ओंकार आहे. ओंकारातून अग्नि निर्माण केला. अग्नीपासून सूर्य. हा सूर्य प्रथम शांत अग्नि होता. दुसरे तेरा अग्नी शांत होते. हळूहळू त्या अग्नीत तेज निर्माण होऊ लागले. त्या विष्णूच्या वायूने त्याला हळूहळू प्रदीप्त केले. त्याचे शांतरूप तेज त्या वायूने भडकू लागले आणि मग तो प्रखर होऊ लागला. त्याच सूर्याला पुढे तेज येऊ लागले आणि ते तेज अवकाशात लांबवर जाऊ लागले अन् त्याच्या तेजाला रंग चढू लागले, ते सप्तरंग. सप्तरंग महेशाच्या पाण्याने झाले. त्यांच्या तेजात त्याला भडकवून त्याचे तेज वाढवले. त्याप्रमाणे महेशाने तो अती भडकू नये, त्याची आग होऊ नये; म्हणून त्यात आपले पाणी ओतून दिले आणि त्या पाण्यामुळे त्यात सप्तरंग आले, म्हणजे सूर्याच्या किरणात पाणीही आहे.

घरात अपशब्द बोलू नयेत !

घरातील दारे बंदिस्त केलेली असतात. त्यामुळे चांगले बोलणे किंवा बोललेले अपशब्द हे जरी बाहेर ऐकू गेले, म्हणजे बाहेर जरी त्याच्या (वार्‍याच्या) लहरी गेल्या, तरी त्याचे बीज घरातच पडते आणि रुजू होते. विशेषतः लहान मुलाशी बोलतांना अपशब्द वापरल्याने वेगवेगळे परिणाम होतात.

– पू. (सौ.) मंगला न. उपाध्ये (आनंदयात्रा, अमृतवाणी भाग ३)

मनुष्याचा मृत्यूनंतरचा प्रवास

१. स्वतःच्या मृत्यूनंतर मनुष्याने १० दिवस सवयीनुसार घरात वावरणे, घरातील मंडळींनी रागावून अस्पृश्यात टाकले आहे, असा त्याच्यावर आघात होणे आणि १० दिवस झालेल्या छळामुळे त्याला आत्म्याच्या प्रगतीची पहिली पायरी चढण्याची शक्ती मिळणे
मनुष्याच्या मृत्यूनंतर १० दिवस मनुष्य सवयीनुसार घरात वावरत असतो. त्याच्यावर एक मोठा आघात झालेला असतो; कारण त्याला वाटते, घरातील सार्‍या मंडळींनी आपल्यावर रागावून आपल्याला अस्पृश्यात टाकले आहे. पूर्वीची स्त्री जशी मासिक पाळीच्या वेळी कोपर्‍यात बसत असे, त्याप्रमाणे आपला सारा संसार गाठोडे बांधून वेगळा ठेवला आहे का ?, या भ्रमात तो असतो. असे असतांना राग असलेली ही सर्व मंडळी दुःख आणि रडारड का करत आहेत ?, याची त्यास काहीच उमज पडत नाही. ही मंडळी हाका मारूनही ओ देत नाहीत. ही सारी मंडळी बहिरी झाली आहेत का ? ती मंडळी आपले जेवणाचे ताट अस्पृश्यासारखे बाजूला आणून देतात, जणू आपणास अंधकारात टाकल्याने एक मिणमिणता दिवा लावतात. त्या प्रकाशाभोवती आपण फिरायचे. दुसरीकडे सारा अंधकार. काही उमगत नाही, या चाललेल्या छळात तो १० दिवस भरडून मनाच्या नव्हे, तर लिंगदेहाच्या प्रगतीची पहिली पायरी चढण्याची शक्ती मिळवतो.

२. मृत्यूनंतरच्या १० दिवसांत मनुष्याला नरकयातना होणे आणि मृत्यूसमयीचे विचार अघोरी असल्यास त्याचा आत्मा मृत्यूलोकातच फिरत रहाणे
मृृत्यूसमयी चिकटलेल्या त्या वैचारिक इच्छा पिंडाच्या माध्यमातून घेऊन कुटुंबियांंच्या कौटुंबिक प्रेमाच्या विकारातून तो मोकळा होतो आणि मृत्यूलोकात भगवंताने दिलेल्या नियमावलीच्या परीक्षेत मिळवलेल्या गुणवत्तेनुसार सप्तलोकांतील योग्य लोकात जाऊन आपले स्थान स्वीकारतो. या १० दिवसांत त्याला नरकयातना होतात. मृत्यूसमयी चिकटलेले विचार फार अघोरी असतील, तर पिसाटल्याप्रमाणे त्याचा आत्मा मृत्यूलोकातच फिरत रहातो; परंतु त्याचा संबंध प्रथम लोकाशी असतो. तेथील अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून असतात.

३. मृत्यूनंतर जीव सप्त लोकांत विसावल्यावर शरीर माध्यम सुटल्याने त्याची ॐकार भाषेत देवाण-घेवाण चालू होणे
सप्त लोकांतील आपल्या स्थानावर मनुष्य ज्या वेळी विसावतो, तेव्हा शरीर माध्यम सुटल्याने त्याची ॐकार भाषेत देवाण-घेवाण चालू होते. ॐकार हा वायुरूप आहे. मनुष्यदेहाचे माध्यम असतांना स्वतःच्या मुखातून वायूच्या आधारे तो ध्वनी काढू शकतो; परंतु मृत्यूनंतर सप्तलोक वायूविना आहेत. तेथे वाहकता नाही; म्हणून वायूरूपी ॐहा प्रत्येक सप्तलोकाच्या प्रवेशद्वारातच स्थिर होतो.

आघाताने ध्वनी निघतो. मृत्यूलोकात माध्यमातून स्वर निघतो, म्हणजे वाहकतेने ध्वनी निघतो. सप्तलोकांत आघाताने ध्वनी निघतो. गायक वाहकतेने ध्वनी प्रकट करतो आणि वाद्यावर जसा आवाज करून ध्वनी निर्माण होतो, तसेच सप्तलोकांत आघाताने ध्वनी उमटून आत्म्याला विचारांची देवाण-घेवाण करता येते.

ध्वनी तसा प्रतिध्वनी निघत असल्याने शहाण्या माणसाने मूर्खांच्या नादी लागू नये, असे म्हणतात !
ध्वनी तसा प्रतिध्वनी, नाद तसा प्रतिनाद, विधान तसे प्रतिविधान, असे केल्याने नादाचे प्रतिध्वनी मनात रेंगाळून अंतर्मनात जाऊन स्थिरावतात. नाद मंजुळ, आवाज शहाणपणाचा आणि बुद्धीवादी असेल, तर हे स्थिरावलेले अंतर्मनाचे बोल बाहेरील मनाचे शुद्धीकरण निश्‍चितच करत असतात. नाद निर्बुद्ध माणसाचे असतील, तर हे नाद, या नादाचा प्रतिध्वनी आपल्या मनाच्या घंटेवर टोला हाणून प्रतिध्वनी देण्याची आवश्यकता नसते; कारण प्रतिध्वनीही आपल्याच शरिरात निर्बुद्ध होऊन अंतर्मनात स्थिरावून जातो आणि मग संपूर्ण अंतर्मन बिघडून शरीर अशुद्ध बनते.

म्हणून म्हटले आहे, शहाण्या माणसाने मूर्खांच्या नादी लागू नये. निर्बुद्ध माणसाच्या बुद्धीवादाने प्रतिध्वनीसाठी आपल्या मनाच्या घंटेवर टोला वाजवू देऊच नये; कारण त्या टोल्यातून आलेल्या निर्बुद्ध लहरी आपल्या शरिरात अंतर्मनात स्थिरावून वादविवादाने संपूर्ण शरीरच अशुद्ध होते.             (क्रमश:)

– पू. (सौ.) मंगला न. उपाध्ये (आनंदयात्रा, अमृतवाणी भाग ३)

Leave a Comment