चिनी ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी

पुणे येथील १२० हून अधिक रणरागिणींची आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी

पुणे : भारत आणि चीन सीमेवर अनेक दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली असून चीनने सीमेवर रणगाडे आणून त्यांचा सरावही चालू केला. कुरापतखोर अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालू ठेवण्यासमवेत आता सिक्कीममध्येही घुसखोरी करत डोकलाम हा चीनचा भूभाग असल्याचे चीन सांगत आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ‘ड्रॅगन’ भारताच्या घराघरांत पोहोचवत आहे. चिनी ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी देशवासियांनीही चिनी वस्तू आणि चिनी राख्या यांवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. केंद्र शासनाने चीनशी असलेल्या व्यापारविषयक धोरणांवर पुनर्विचार करून चीनची आर्थिक नाकेबंदी करावी, अशा प्रखर मागण्या हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या. येथील मंडई भागातील लोकमान्य टिळक पुतळा चौकात २३ जुलै या दिवशी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी धर्माभिमानी सौ. प्रतिमा पासलकर, धर्मप्रेमी अधिवक्त्या ललिता नारगोलकर, सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांच्यासह १२० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी महिला उपस्थित होत्या. या वेळी राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला अनेक युवक, युवती आणि महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चिनी उत्पादने आणि राख्या यांवर बहिष्कार
घालून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडूया ! – डॉ. ज्योती काळे

स्वदेशी चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही विदेशी मालाची होळी केली होती; पण आज चिनी वस्तूंनी प्रत्येक घराघरात स्थान मिळवले आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनाचे पावित्र्य चिनी राख्या बांधून नष्ट करायला नको. भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करून चिनी उत्पादने आणि राख्या यांवर बहिष्कार घालून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडूया.

देशाला महासत्ता, म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी चिनी
वस्तू न वापरण्याचा निश्‍चय करायला हवा ! – सौ. राजश्री तिवारी

प्रत्येकाला स्वराष्ट्र, स्वभाषा आणि स्वधर्माचा जाज्वल्य अभिमान असायला हवा, तसेच या देशाला महासत्ता, म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी चिनी वस्तू न वापरण्याचा प्रत्येकाने निश्‍चय करायला हवा.

केंद्र शासनाने चिनी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालावेत ! – कु. क्रांती पेटकर

पाकिस्तानला आतंकवादी कारवाया करण्यासाठी चीन पाठिंबा देत आहे. अशा घातकी चीनच्या वस्तू घेऊन आपण एकप्रकारे शत्रूलाच साहाय्य करतो आहोत. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने चिनी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालावेत.

क्षणचित्रे

१. वाकड येथील श्री. रमेश देवामन येवले हे आंदोलनाचा विषय समजल्यावर आंदोलनाला थांबले. २ महिला आणि एक युवती या आंदोलनाला ५ मिनिटे थांबणार होत्या. प्रत्यक्षात त्या आंदोलन संपेपर्यंत थांबल्या. ‘यापुढे प्रत्येकच उपक्रमाला आम्हाला बोलवा’, असे त्यांनी सांगितले.

२. साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. गोगावले यांनी आंदोलनातील सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याच्या ४ बाटल्या आणि २ गोळ्यांची पाकिटे अर्पण म्हणून दिली.

३. पाऊस पडत असूनही रणरागिणींनी उत्स्फूर्त घोषणा देत आंदोलनात सहभाग दर्शवला.

४. आंदोलन संपल्यानंतर आकाशात काही काळ इंद्रधनुष्य दिसले.

५. या वेळी एका व्यक्तीने आंदोलन पाहून ‘सनातन बेकार आणि जातीयवादी आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (सनातन जातीयवादी असल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे. सनातन संस्थेत वेगवेगळ्या जातींचे साधक असून सर्वजण एकोप्याने सेवा करतात. उलट जात्यंधच ब्राह्मणद्वेषापोटी जातीजातींमध्ये फूट पाडून जातीयवाद पसरवत आहेत, हेच आतापर्यंतच्या अनेक उदाहरणांवरून उघड झाले आहे. सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य जाणून न घेताच तिला बेकार आणि जातीयवादी संबोधणे हास्यास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment