मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती करणारे भक्तशिरोमणि संत नामदेव महाराज ! त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंढरपूर येथील त्यांच्या वाड्यांतील विठ्ठलाच्या मूर्तींचे भावपूर्ण दर्शन घेऊया. खूप लहान असतांना संत नामदेव यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले ‘आज तू देवाला प्रसाद दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही, तर देवापुढे वाट बघत बसले की, केव्हा हा खाईल ! बाल नामदेवाच्या भोळ्या भावाला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’, या ओवीतून संत नामदेव यांच्या भक्तीभावाचा स्तर लक्षात येतो. एकदा एका कुत्र्याने पोळी पळवली. त्याला ती कोरडी खावी लागू नये, म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे गेले. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असणार्‍या संत नामदेवांना त्या कुत्र्यातही विठ्ठलाचे दर्शन झाले होते.

संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना (अनुमाने १२५ पदे) केली. त्यातील साधारण ६२ अभंग ‘नामदेवजी की मुखबानी’ या शीख पंथाच्या ‘गुरुग्रंथ साहेब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी आणि तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्‍वर यांचे चरित्र सांगितले आहे.


शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥

संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥
नामा म्हणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊनियां करीं सुदर्शन ॥४॥

भावार्थ : ८४ लक्ष योनींनंतर जिवाला मनुष्यजन्म मिळतो, पण त्या वेळी चुका झाल्या की, पुन्हा फेरा पडतो. त्यामुळे या जन्मातच आत्मारामाची (ईश्‍वराची) ओळख करून घ्या ! संसारात रमण्यापेक्षा त्यात असूनही नसावे आणि सतत नामजप करावा. भक्ताच्या द्वारी त्याचा उद्धार करण्यासाठी विठ्ठल उभाच आहे.

दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥

भक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरंतर वळगणें ॥३॥
नामा म्हणे मना धरीं तूं विश्‍वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥

भावार्थ : हे मना, जरी तू दाही दिशा धावलास, तरी जन्म-मृत्यूचे फेरे काळाच्या अंतीही तुला सुटणार नाहीत. विठ्ठलाच्या नामावर दृढ श्रद्धा ठेव ! हेच नाम संसाररूपी मृगजळ नष्ट करून भक्ती, मुक्ती आणि सिद्धी हे निरंतर तुझ्यापुढे हात जोडून उभ्या रहातील. तू विश्‍वास ठेव, मग तुला गर्भवास (पुनर्जन्म) नाही.

 

संत नामदेव यांची भक्ती !

संत ज्ञानेश्‍वर आणि संत नामदेव हे एकदा एकत्र तीर्थयात्रेला निघाले. काशी, गया, प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते औंढा नागनाथ या ठिकाणी आले. ते शंकराचे स्थान होते. इतर ठिकाणांप्रमाणेच याही ठिकाणी कीर्तन करून आपली सेवा ईश्‍वरचरणी अर्पण करायची, असे त्यांनी ठरवले.

महादेवाला वंदन करून संत नामदेव यांनी कीर्तनास प्रारंभ केला. कीर्तनाला पुष्कळ लोक आले होते. ते कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले. इतक्यात लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. लोकांची दृष्टी मागे वळली. कीर्तन थांबले. दारातून काही विरोधक आत आले. ते विरोधक रागावून संत नामदेव यांना म्हणाले, ‘हा कैलासपती उमारमण आहे. यांना हरिकीर्तन प्रिय नाही. तुम्ही पंढरपुरात जा आणि तेथे भले नाचा !’’

विरोधकांचे हे बोलणे ऐकून श्रोते म्हणाले की, विठ्ठल काय आणि शंकर काय, या दोघांत भेद नाही. शंकरासमोर कीर्तन करू नये, असे कुठे सांगितले आहे ? हे ऐकून विरोधक अधिकच चिडले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही अभिमानाचा ताठा धरून आम्हाला ज्ञान शिकवता काय ? तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर व्यर्थ मार खाल.’’ सर्व शांतपणे तसेच उभे राहिले. तेथून कोणीच हलावयास सिद्ध होईना. ते पाहून विरोधकांनी ठरवले की, ‘या नामदेवालाच इथून हालवले पाहिजे.’ ते विरोधक संत नामदेव यांना म्हणाले, ‘‘तुझ्या कीर्तनामुळे देवळात येण्याची वाट बंद झाली. तू देवळाच्या मागे जा आणि भले कीर्तन कर.’’

हे ऐकून संत नामदेव यांनी विरोधकांना साष्टांग नमस्कार केला आणि ते देवळाच्या मागच्या बाजूस आले अन् तेथे कीर्तन करू लागले. भगवंताच्या कीर्तनात खंड पडल्याने सद्गदित अंत:करणाने त्यांनी पांडुरंगाचा धावा चालू केला.

त्यांच्या विठ्ठलनामातील तळमळ इतकी वाढली की, त्यांची आर्ततेची हाक भगवंताला ऐकू गेली. पूर्व दिशेला तोंड असलेले शंकराचे देऊळ नामदेवाच्या समोर येऊन उभे ठाकले. हा चमत्कार पाहून जमलेले सर्व श्रोते अचंबित झाले. ‘कैलासपती नामदेवांस पावन झाले’, असे सर्व म्हणू लागले.

तितक्यात शंकराची पूजा आटोपून विरोधक देवळाबाहेर आले, तो पुन्हा नामदेवांचे कीर्तन समोर चालूच ! काहीतरी गडबड आहे, हे त्यांच्या लक्षात आले. भगवंताने साक्षात देऊळ फिरवले, हे कळल्यावर विरोधक लज्जित झाले. परमेश्‍वराचा प्रिय भक्त कोण, हे परमेश्‍वराने स्वत:च दाखवून दिले. खेद झालेले विरोधक कीर्तनास बसले. फिरलेले देऊळ मात्र आजतागायत तसेच आहे.

श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे संत नामदेवांच्या वाड्यात असलेल्या गोपाळकृष्ण मंदिरातील भाव जागृत करणारी मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती !
पंढरपूरजवळ असलेल्या श्रीक्षेत्र गोपाळपूर येथील संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या अस्तित्वाने पावन झालेला संत नामदेवांचा वाडा !

संत नामदेवांनी समाधी घेतलेली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील हीच ती नामदेव पायरी ! आपला अहं कधीच वाढू नये, म्हणून संत नामदेव भगवंताच्या चरणीच विलीन झाले.

भक्तीच्या या अनुपमेय उदाहरणाची साक्ष देणार्‍या वस्तूंचे भावपूर्ण दर्शन घेऊया आणि
आपल्या अंतरात भगवंताविषयीची भक्ती वृद्धींगत होण्यासाठी शरणागत भावाने प्रार्थना करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment