प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन

कु. स्वाती गायकवाड

१. शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचे महत्त्व

‘देवाला सर्व ज्ञात असते आणि येते. त्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्यास देवाजवळ लवकर जाऊ शकतो.

२. देवावर श्रद्धा असेल, तर परिस्थितीशी लढता येते !

आपल्यात तळमळ असेल, तर देव परिस्थितीत पालट करतो. देवाच्या कृपेविना आपण काही करू शकत नाही. हे अंतिम सत्य आहे. देवावर श्रद्धा असेल, तरच परिस्थितीशी आपण लढू शकतो; कारण श्रद्धेनेच ठामपणा येतो.

३. हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी प्रत्येक क्षण सेवा आणि साधना यांसाठी द्यावा !

राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी चार लक्ष हिंदू मिळाले, तर हिंदु राष्ट्र लवकर येईल. ‘मी एकटा काय करणार ?’, या विचारापेक्षा ‘मी काय करू शकतो ? प्रत्येक क्षण सेवा आणि साधना यांसाठी कसा देऊ शकतो ?’, असा विचार करून कृती करायला हवी. वर्ष २०१८ पासून महायुद्धाला आरंभ होईल. त्यापूर्वी अधिकाधिक साधना करून प्रगती करू अन् सात्त्विक होऊ. त्यामुळे देवालाच वाटेल, ‘तुम्हाला (साधना करणार्‍यांना) हिंदु राष्ट्रात ठेवावे !’

४. जेव्हा आपण इतरांना दुखावेल, असे बोलतो, तेव्हा आपण देवालाच दुखावत असतो.

५. स्थिरता

मनात विचार नसणे, म्हणजे स्थिरता. स्थिरता हा भावाच्या पुढचा टप्पा आहे.

६. साधकांची प्रगती होणे आणि त्यांनी आनंदी होणे, यातच माझा आनंद सामावला आहे.

७. मन नष्ट करण्याचे महत्त्व

मन आहे तोपर्यंत विचार येतच रहाणार. मनामुळेच साधनेत चढ-उतार येत असतात; म्हणून मनच नष्ट करायला हवे, मनोलय करायला हवा.

८. ‘आपली साधना चांगली चालू आहे’, या विचारापेक्षा ‘मी साधनेत न्यून पडत आहे’, हा विचारच आपल्याला साधनेत पुढे घेऊन जातो.

९. मनाला स्वभावदोेष आणि अहं यांच्याशी लढायला शक्ती मिळावी; म्हणून स्वयंसूचना घ्यायला हव्यात.

१०. आपण परिस्थिती पालटू शकत नाही; पण स्वतःचे मन पालटू शकतो.

११. गुरुकृपेने प्रारब्ध नष्ट होते; पण गुरुकृपा होण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.

१२. सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व

नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावेे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो.

१३. साधनेत स्थिर होण्यासाठी ६०
टक्के आध्यात्मिक पातळी गाठीपर्यंत प्रयत्न करत रहावे !

सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांपैकी ज्याची तीव्रता अधिक असते, त्यानुसार आपल्याकडून कृती होत असतात. ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतरच रज-तमाचे प्रमाण कमी झाल्यामुळे, म्हणजेच सत्त्वगुणातच स्थिर रहाता येण्यामुळे साधनेत स्थिरता यायला आरंभ होतो. त्यामुळे ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठीपर्यंत प्रयत्न करत रहायचे.

१४. आपत्काळाचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व

साधनेसाठी अनुकूल परिस्थिती असतांना जेवढी प्रगती होते, त्या तुलनेत प्रतिकूल परिस्थिती असतांना अधिक वेगाने प्रगती होते. संपत्काळातील ३० ते ४० वर्षांची साधना आपत्काळातील ९ – १० वर्षे केलेल्या साधनेइतकी असते.’

साधनेला विरोध करणार्‍या पतीच्या बोलण्याला साधिकेने ठामपणे दिलेले उत्तर !

‘एका साधिकेच्या पतीचा त्यांच्या साधनेला विरोध होता. ‘सनातनने तुझ्यावर मोहिनी घातली आहे’, असे ते म्हणायचे. तेव्हा त्या साधिका उत्तर द्यायच्या, ‘‘ही मोहिनी जर देवाने घातली आहे, तर मला देवाच्या मोहिनीत रहायला आवडेल !’’

१. चूक झाल्यावर खंत वाटली, तरच पुढे ती चूक न होण्यासाठी प्रयत्न होतील !

प्रश्‍न : सहसाधकांनी चुका सांगितल्यावर वाईट वाटून रडू येते.

प.पू. डॉक्टर : पहिल्या टप्प्याला चूक झाली; म्हणून दुःख वाटून रडायला यायला हवे, तरच खंत वाटून पुढे ती चूक न होण्यासाठी प्रयत्न होतील.

२. ‘साधनेसाठी पुढे काय करायचे ?’, याचा विचार करावा !

प्रश्‍न : माझ्यात पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहे. ‘इतके दोष कधी जातील ? माझी साधना होत नाही’, असे वाटते.

प.पू. डॉक्टर : याचे दुःख करण्यापेक्षा आता ‘पुढे काय करायचे ?’, याचाच विचार करून साधनेकडे लक्ष द्या.

३. दुसर्‍यांच्या मनात पालट घडवून आणू शकत
नाही; म्हणून स्वतःचे मन पालटण्याचा प्रयत्न करावा !

प्रश्‍न : ‘घरच्यांनीही साधना अन् सेवा करावी’, असे वाटते.

प.पू. डॉक्टर : वरीलप्रमाणे विचारप्रक्रिया, म्हणजे आपली स्वेच्छा झाली. स्वेच्छेला साधनेत किंमत शून्य आहे. दुसर्‍यांच्या मनात पालट घडवून त्यांना साधना करायला लावणे, हे आपण करू शकत नाही. झाडाचे पानही देवाच्या इच्छेविना हालत नाही. तिथे आपण एखाद्याचे मन पालटणे कसे शक्य आहे ? त्यापेक्षा आपण स्वतःचे मन पालटण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांच्या संदर्भात मनात विचार येणार नाहीत.

४. साधकाने भावावस्थेत रहाणे, हाच माझा आनंद !

प.पू. डॉक्टर (तीव्र त्रास असूनही अनेक वर्षांपासून साधनेत असणार्‍या आणि आता भाव निर्माण झालेल्या साधकाला उद्देशून) : तुम्ही भाव कसा निर्माण केलात ?

एक साधक : तुम्हीच सारे काही करवून घेता. भरभरून आनंद देता; पण देवा, तुम्हाला आनंद होईल, असे काहीच प्रयत्न माझ्याकडून होत नाहीत.

प.पू. डॉक्टर : तुम्ही भावाच्या स्थितीत आहात, हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा आनंद आहे.

(हे लिहितांना माझ्या मनात आले, ‘गुरुमाऊली आपली साधना होण्यासाठी आणि आपण आनंदी व्हावे, यासाठी अखंड धडपडत असते. त्याची परतफेड आपण करू शकत नाही; पण त्यांनी सांगितलेले प्रयत्न सातत्याने आणि मनापासून करून तेवढातरी आनंद त्यांना देऊ शकतो.’)

५. आपत्काळ हा साधकांसाठी ‘चांगला काळ’ आहे !

एक बालसाधिका : आपत्काळ का आणि कधी येतो ?

प.पू. डॉक्टर : पृथ्वीवर अराजक वाढले की, देवच आपत्काळ निर्माण करून ते नष्ट करतो; पण आपत्काळात साधना अधिक वेगाने होत असल्याने साधकांसाठी हा ‘आपत्काळ’ नसून ‘चांगला काळ’ आहे.

६. मधुमेही व्यक्ती जशी इन्सुलिनसाठी धडपडते, तसे साधनेसाठी धडपडायला हवे !

प्रश्‍न : साधनेचे प्रयत्न होत नाहीत.

प.पू. डॉक्टर : ‘प्रयत्न होत नाहीत’, या विचारात रहाण्यापेक्षा ‘प्रयत्न का होत नाहीत ?’, याकडे लक्ष द्यायला हवे. मधुमेह झालेली एखादी व्यक्ती तिच्याकडे असलेले इन्सुलिन संपल्यास रात्री १२ वाजताही ‘ते आता कुठे मिळेल ?’, यासाठी धडपडते; कारण ‘ते घेतले नाही, तर त्याचा परिणाम काय होईल ?’, हे त्या व्यक्तीला ठाऊक असते, तसेच साधनेच्या प्रयत्नांविषयी असायला हवे.

७. भाव-भक्ती वाढली की, देवच भेटायला येतो !

प्रश्‍न : प.पू. डॉक्टर, ‘स्थुलातून तुम्हाला भेटायला हवे’, असे वाटत नाही; कारण ‘आता घरीही तुम्ही माझ्यासमवेत आहात’, हे अनुभवायला मिळते.

प.पू. डॉक्टर : छान ! हे प्रगतीचे लक्षण आहे. भाव-भक्ती वाढते, तेव्हा देवच आपल्याला घरी किंवा आपण जेथे आहोत, तेथे त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

८. शारीरिक स्थिती बरी नसतांना शरिराकडेच लक्ष द्यायला हवे !

प्रश्‍न : माझी सेवा करायची इच्छा असते; पण कधी शारीरिक स्थिती बरी नसते. कधी प्रवासामुळे त्रास होतो. त्यामुळे सेवा होत नाही, याचे वाईट वाटते. अशा वेळी काय करावेे ?

प.पू. डॉक्टर : प्रथम स्वतःच्या शरिराकडे लक्ष द्यायला हवे. ज्या वेळी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. ज्याच्याकडे जे आहे, तेच देवाला अर्पण करायचे असते. आपल्याकडे जे नाही, ते देव मागणार नाही, म्हणजे शारीरिक स्थिती चांगली नसतांना देव प्रसार करण्याची अपेक्षा करत नाही.

९. साधनेसाठी आता या क्षणापासून प्रयत्न करायला हवेत !

प्रश्‍न : साधनेत येऊन पुष्कळ वर्षे झाली; पण देवाला अपेक्षित असे प्रयत्न न झाल्याने ‘मी सर्व वर्षे वाया घालवली’, असे वाटते.

प.पू. डॉक्टर : योग्य प्रकारे साधना न केल्याने आपली वर्षेच नाहीत, तर कित्येक जन्म आपण वाया घालवले आहेत; पण आता भूतकाळाचा विचार न करता या क्षणापासून प्रयत्न करायला हवेत.

१०. आध्यात्मिक त्रास असणार्‍यांनी उपायांनाच प्राधान्य द्यावे !

प्रश्‍न : मला आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे उपाय करावे लागतात; पण नोकरीमुळे वेळ अल्प असतो. तेव्हा उपायांना प्राधान्य द्यावे कि सेवेला ?

प.पू. डॉक्टर : प्रथम उपायांना प्राधान्य द्यावे. सेवा अन्य कुणीही करील. आपण रुग्णाईत असलो, तर औषध स्वतःलाच घ्यावे लागते. तसे आपण उपाय केले, तरच आपल्याला चैतन्य मिळेल आणि त्रास न्यून होईल. त्रास न्यून झाला की, सेवा चांगली करू शकतो.

११. जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसार होत असतात !

प्रश्‍न : मनात विवाहाचे विचार येतात.

प.पू. डॉक्टर : तारुण्यात विवाहाचे विचार येणे नैसर्गिक आहे. विवाह हा प्रारब्धाचा भाग आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसार होत असतात. त्यांचे स्थळ आणि काळ ठरलेला असतो.

१२. साधकाच्या साधनेत अडथळे आणणे, हे फेडता न येणारे पाप आहे !

प्रश्‍न : माझा मुलगा सनातनचा पूर्णवेळ साधक आहे. त्याने ‘घर आणि नोकरी सांभाळून साधना करावी’, असे मला वाटते; पण त्याला पूर्णवेळ साधनाच करायची आहे.

प.पू. डॉक्टर : एखाद्या साधकाच्या साधनेत अडथळे आणणे, हे पाप आहे. त्यामुळे विरोध करू नये. या पापाचे क्षालन होण्यासाठी कितीही साधना केली, तरी ते फेडता येत नाही, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

१३. ‘साधनेचे प्रयत्न केल्यावर पालट व्हायलाच हवा’, अशी फळाची अपेक्षा नको !

प्रश्‍न : ‘साधना नीट होत नाही’, या विचाराने चिडचिड होत रहाते.

प.पू. डॉक्टर : साधनेत स्वेच्छा नको. ‘आपण प्रयत्न केल्यावर पालट व्हायलाच हवा’, अशी फळाची अपेक्षा नको. एखाद्याला शरीर कमवायचे असेल, तर त्याला काही वर्षे व्यायाम करावा लागतो. त्यासाठी थोडा वेळ प्रतिदिन द्यावा लागतो, त्याचप्रमाणे मनावर झालेले सहस्रो संस्कार नष्ट होण्यासाठीही काही वर्षे द्यावी लागतात. आपण मनाचा व्यायाम, म्हणजे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत रहायचे.’

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment