एखाद्या प्रसंगामुळे अनावश्यक विचार वाढल्यास काय करावे ?

‘काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे साधकांचे विचार अधिक वाढतात आणि बहुतेक वेळा ते अनावश्यक असतात. असे घडल्यास पुढीलप्रमाणे विचार करावा किंवा प्रयत्न करावेत.

पू. संदीप आळशी

१. ‘जो प्रसंग घडला आहे, त्या प्रसंगाचे माझ्या एकूण जीवनात किती मूल्य आहे ? त्या प्रसंगाचा माझ्या एकूण जीवनावर किती परिणाम होणार आहे ? तात्कालिक कि दूरगामी परिणाम होणार आहे ?’, असा आपण आपल्याच मनाशी विचार करावा. बहुतेक वेळा अशा प्रसंगाचे (उदा. एखादा आपल्याशी नीट बोलला नसल्यास) आपल्या एकूण जीवनात विशेष मूल्य नसते किंवा त्याचा आपल्या जीवनावर फारसा परिणाम होत नसतो आणि जो काही होत असतो, तो फारच तात्कालिक असतो. असे असतांनाही आपण त्या विचारांवर मनाची ऊर्जा अनावश्यक व्यय (खर्च) करतो. ज्या प्रसंगाचे आपल्या जीवनात मूल्य आहे किंवा ज्याचा आपल्या जीवनावर विशेष परिणाम होणार असेल (उदा. आपल्या साधनेचे दायित्व असलेल्या साधकाने आपले स्वभावदोष लक्षात आणून दिल्यास), त्यावर मात्र विचारमंथन करणे आवश्यक असते.

२. ‘प्रसंग जरी घडला, तरी त्यातून आपल्याला गुरूंनी किंवा देवाने पुष्कळ शिकवले’, हा विचार केला, तर घडलेल्या प्रसंगाविषयी काही वाटत नाही.

३. प्रसंगामुळे वाढलेले विचार लगेच गुरुचरणी अर्पण करून मनाला स्थिरता लाभण्यासाठी गुरूंना प्रार्थना करण्याची सवय स्वतःला लावावी.

४. मनात वाढलेले विचार कागदावर लिहून त्या लिखाणाभोवती चारही बाजूंनी नामजप लिहावा (नामजपाचे मंडल करावे) आणि त्यानंतर तो कागद कापरासोबत जाळावा. असे केल्याने विचारांचे प्रमाण पुष्कळ अल्प होते.

५. आपले मन एका वेळी एकच विचार करू शकते. त्यामुळे मनाला दुसर्‍या सकारात्मक विचारात, म्हणजे ‘ज्या सेवेत आपले मन गुंतेल अशा सेवेत’ किंवा ‘नामजप, भावप्रयोग अशा ज्या गोष्टीत मन सहजपणे गुंतेल’, अशा गोष्टीत मनाला गुंतवावे. यामुळे आधीच्या विचारात अडकलेले मन त्या विचारातून बाहेर पडते.

६. प्रसंगामुळे वाढलेल्या विचारांची तीव्रता अल्प झाल्यावर विचारांमागील स्वभावदोष शोधून काढून त्यांवर परिणामकारक स्वयंसूचना द्याव्यात.

७. काही वेळा आध्यात्मिक त्रासामुळेही विचार वाढतात. अशा वेळी ते विचार अधिक काळ टिकू शकतात. यावर उपाय म्हणून स्वयंसूचनांच्या जोडीलाच ‘प्राणशक्तीवहन’ उपायपद्धतीने उपाय शोधून किंवा जाणकाराला विचारून ते भावपूर्वक करावेत.’

– (पू.) संदीप आळशी (२६.१०.२०२२)

Leave a Comment