परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

अनुक्रमणिका

वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.

 

१. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन
केल्यावर नामजप एकाग्रतेने होऊन साधनेत पुढे जाता येते !

साधक : नामजपावर मन कसे एकाग्र करायचे ?; कारण जेव्हा मी नामजप करायला बसतो, तेव्हा मला त्यात रुची वाटत नाही. ही गोष्ट आतून खेद उत्पन्न करते; कारण भगवंताला भेटण्याची आणि त्याच्या दर्शनाची आतमध्ये पुष्कळ तीव्र ओढ आहे. गेल्या १६ वर्षांपासून माझ्याकडून हीच प्रार्थना होत आहे; परंतु माझ्याकडून काहीच होत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘नामजपावर मन एकाग्र होणे’, हे साध्य आहे, साधन नाही. समजले ना ? आपल्यामध्ये जे स्वभावदोष आणि अहं आहेत, त्यामुळे मन एकाग्र होत नाही. जेव्हा आपण स्वभावदोष आणि अहं दूर करतो, तेव्हा साधनेत पहिले पाऊल ठेवतो. त्यासाठी येथे (सनातन संस्थेमध्ये) सर्व स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यालाच प्रथम प्राधान्य आहे. हा पाया (बेस) पक्का असेल, तरच साधक आपल्या प्रकृतीनुसार कोणत्याही मार्गाने, म्हणजे ध्यानयोग असो, भक्तीयोग असो, कर्मयोग असो, कुंडलिनीयोग असो, शक्तिपातयोग असो, पुढे जातो. समजा, कुणी आजारी असेल आणि म्हणाला, ‘मला लढायचे आहे, धावायचे आहे’, तर आपण म्हणतो, ‘अरे, आधी तुझा आजार तरी बरा होऊ दे. नंतर तू हे सर्वकाही करू शकशील.’ त्याच प्रकारे स्वभावदोष गेले, तरच साधनेत पुढे पुढे जाता येते.

 

२. अहं नष्ट झाल्यावर ईश्‍वराच्या जवळ जाणे सोपे होते !

साधक : मी माझ्या भावाला सांगत होतो, ‘जर साधनेत काही करायचे असेल, तर कुणाचे ना कुणाचे तरी ऐकावेच लागेल; नाहीतर ते स्वतःच्या मनानुसार होईल आणि मग कोणताच लाभ होणार नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : जो ऐकत नाही, त्याच्यामध्ये अहं असतो. तो प्रश्‍नावर प्रश्‍न विचारत रहातो. अहं नष्ट झाल्यावर ईश्‍वराच्या जवळ जाता येते. अहं आपल्याला ईश्‍वरापासून वेगळे ठेवतो. अहं नष्ट होताच ‘इदं ब्रह्म’, म्हणजे ‘हे सर्व ब्रह्म आहे’, याची अनुभूती येते.

 

३. नामजप साधना ही त्रिगुण आणि प्रकृती यांवर अवलंबून असते !

साधक : मला सनातनचे संत पू. कर्वेमामा यांनी सांगितले होते, ‘‘सकाळी लवकर उठून नामजप केल्यामुळे तुम्हा सर्वांना अधिक लाभ होईल.’’ त्याप्रमाणे मी नेहमी प्रयत्न करतो. मला जेव्हा जाग येते, म्हणजे पहाटे ३.३० किंवा ४ वाजता मी बसून नामजप करण्याचा प्रयत्न करतो. असे २ – ४ दिवसच झाले. कदाचित् मधेच झोप येत असेल. माझी पत्नी म्हणते, ‘‘तुम्ही तर झोपता.’’ त्याविषयी माझ्या मुलीने सांगितले, ‘‘तुम्ही नामजप लावून ‘इअरफोन’ कानात घालून नामजपाला बसलात, तर झोप येणार नाही.’’ तिने जे सांगितले, ते योग्य आहे. नंतर २ – ४ दिवसांनंतर पुन्हा त्यात खंड पडतो. नंतर पुन्हा कधीच तसा नामजप झाला नाही. मी पहाटे ५ वाजताचा गजर (अलार्म) लावतो. कधी पहाटे ४ किंवा ५ वाजता जाग येते; परंतु उठावेसे वाटत नाही. मला वाटते, ‘नंतर उठूया.’ असे का होते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : असे काही नाही. सत्त्व-रज-तम हे गुण आहेत. ज्या दिवशी सत्त्वगुण अधिक प्रमाणात असतो, त्या दिवशी साधना चांगली होते. रजोगुण अधिक प्रमाणात असेल, तर नामजप करतांना मनात पुष्कळ विचार येतात. तमोगुण अधिक प्रमाणात असेल, तर वाटते, ‘आज झोपावे. आता नामजप करवासा वाटत नाही.’ ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे गेलो की, आपण सत्त्वगुणामध्ये स्थिर (स्टेबल) होतो. नंतर साधना हळूहळू योग्य प्रकारे होऊ लागते; म्हणून तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. साधना आणि प्रयत्न चालू ठेवावेत. होऊन जाईल.

प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. शाळेतसुद्धा आपण बघतो, ‘काही मुले पहाटे ४ – ५ वाजता उठून अभ्यास करतात, तर कुणी रात्री २ – ३ वाजेपर्यंत जागून अभ्यास करतात.’ साधनासुद्धा आपापल्या प्रकृतीनुसार केली, तर चांगली होते आणि त्यामुळे उन्नतीही होते.

 

४. ‘कुटुंबियांची सेवा ‘साधना’ म्हणून करणे
आणि साधनेसंबंधी अन्य सेवा करणे’, एकसारखेच आहे !

साधिका : मला माझ्या लहान मुलाचे बघायचे असते. सेवा करायला सांगितले आहे; पण माझ्याकडून ती होत नाही. प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न तर होतच नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : घरातील सदस्यांचे दायित्व आपल्याकडेच असते. ‘ते देवाचे एक रूप आहेत. त्याची सेवा करते’, असा मनात विचार आला, तर ‘संगणकीय सेवा करणे आणि ही सेवा करणे’ यांमध्ये कोणतेच अंतर रहात नाही. देवाला ठाऊक आहे, ‘मुलगा लहान आहे. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे, तर देव असे म्हणणार नाही की, संगणकीय सेवा का केली नाही ?’ ‘ही माझी साधना आहे’, हा एकच भाव ठेवायचा.

 

५. सेवेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही नसते,
सेवा भावपूर्ण आणि मन लावून केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते !

साधिका : मी स्वयंपाकघरात सेवा करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याकडे स्वयंपाकघरातील साधिका ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे आहेत, हे ठाऊक आहे ना ? आणखी १ – २ साधिका तर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आहेत. १ – २ वर्षांत त्या संत होतील. वर्ष २०१६ मध्ये पू. (कु.) रेखा काणकोणकर या स्वयंपाकघरात सेवा करून संत झाल्या आहेत. सेवेत श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही नसते. सेवा भावपूर्ण आणि मनापासून केली, तर अध्यात्मात प्रगती होते.

 

६. सेवा परिपूर्ण होण्यासाठी सेवा करतांना
मधे मधे प्रार्थना करून भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करावा !

साधक : पूर्वी मी स्वतःहून माझ्या सेवेतील चुका शोधण्याचा प्रयत्न करत नव्हतो. आता प्रयत्न केल्यानंतर सेवा दोनदा पडताळतो, तरीसुद्धा कधी कधी चूक राहून जाते. त्यामुळे मला पुष्कळ खंत वाटते. ‘असे का झाले ?’, असे मला वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : रामनाथी आश्रमातील साधक सेवा करतांना प्रत्येक १५ – २० मिनिटांनंतर देवाला प्रार्थना करतात. ते भावस्थितीत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांची सेवा परिपूर्ण होते. सेवा करतांना अधूनमधून प्रार्थना करा.

साधक : ‘सेवा लवकरात लवकर पूर्ण करायची आहे’, असेही कधी कधी मनात असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ते ठीक आहे. तो गुण आहे; परंतु सेवा परिपूर्ण व्हायला पाहिजे. सेवेत चुका होता कामा नये. प्रार्थना केल्यावर ती परिपूर्ण होईल.

 

७. भक्तीयोगानुसार साधना करणारे
भावाच्या स्थितीत राहून आणि कर्मयोगानुसार
साधना करणारे परिपूर्ण सेवा करून साधना करतात !

साधिका : ‘श्रीकृष्णाशी अनुसंधान ठेवणे’, ही आपली साधना आहे. श्रीकृष्णाला विचारूनच प्रत्येक कृती करायची आहे. ते मला पुष्कळ कठीण वाटते. ‘मला ठाऊक आहे’, हा अहंचा पैलू अधिक असल्यामुळे असे होते कि आणखी कशामुळे होते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. प्रत्येकाचा साधनामार्ग वेगळा असतो. भक्तीमार्गी असलेल्यांना ईश्‍वराला विचारूनच कृती करणे सोपे जाते. त्यामुळे ते भावस्थितीत रहातात; परंतु कर्मयोग्यांसाठी ‘सेवा परिपूर्ण करणे’ महत्त्वाचे आहे.

 

८. सनातनच्या ‘भावजागृतीचे प्रकार’ या ग्रंथात
सांगितल्यानुसार टप्प्याटप्प्याने भावजागृतीचे प्रयत्न करावे !

साधक : मला कळत नाही की, मला भावाची स्थिती अनुभवायला का येत नाही ? मी दिवसभरात ३ – ४ वेळा भावजागृतीचे प्रयत्न करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ग्रंथात दिल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रयत्न करा. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) रामनाथी आश्रमात सत्संग घेत होत्या. एकदा त्यांनी सर्व साधकांना ‘पुढच्या वेळी सत्संगात ‘भावजागृती’ हा विषय घेऊया. तुम्ही तो ग्रंथ वाचून या’, असे सांगितले. पुढील सप्ताहाच्या सत्संगात त्यांनी सर्वांना विचारले, ‘‘ग्रंथ वाचला कि नाही ?’’ सर्वांनी हात वर केले; परंतु कु. मधुरा भोसले (ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले) हिने हात वर केला नव्हता. तेव्हा सौ. अंजली यांनी तिला विचारले, ‘‘तुझी प्रकृती बरी नव्हती का ? सेवा अधिक होती का ? का ग्रंथ वाचला नाहीस ?’’ तेव्हा तिने (मधुराने) सांगितले, ‘‘मी आजारी नव्हते आणि मला अधिक सेवासुद्धा नव्हती; परंतु मी जेवढे वाचले, ते आचरणात (कृतीत) आणण्याचा प्रयत्न करत होते.’’

अध्यात्माचे ग्रंथ गोष्टीच्या पुस्तकासारखे वाचून बाजूला ठेवून दिले, असे नाहीत. मधुराने त्यातील १० – १५ पाने वाचली आणि त्यात सांगितल्याप्रमाणे ती कृती करत होती. तसे टप्प्याटप्प्याने करत गेलात, तर तुम्ही पुढे जाल आणि भावजागृती होर्ईल. थोडे थोडे वाचून तशी कृती करा.

 

९. भगवंताचे एकदाच अत्यंत भावपूर्ण
नाम घेतल्याने मुक्ती मिळते; परंतु ते करण्यासाठी
प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे !

साधक : परात्पर गुरुदेव, गुणात्मक नामजप आणि संख्यात्मक नामजप यांमध्ये कशाला अधिक महत्त्व आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : गुणात्मक (क्वालिटी) नामजपाला !

साधक : मी जेव्हा संख्यात्मक नामजप करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो गुणात्मक न होता यांत्रिकपणे होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : संख्यात्मक नामजपाला कसलाही अर्थ नाही. भगवंताचे नाम एकदा जरी भावपूर्ण घेतले, तरीसुद्धा मुक्ती मिळते; परंतु (आपला) भाव नसतो. त्यामुळे आपल्याला लक्ष-लक्ष वेळा नामजप करावा लागतो.

साधक : मुक्तीपर्यंत पोचण्यासाठी न्यूनतम किती नामजप करायला पाहिजे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला प्रथम प्राधान्य असते. हा पहिला टप्पा आहे. जसे शाळेत गेल्यावर आपण प्रथम ‘अ, आ, इ, ई …’ आणि ‘ए, बी, सी, डी…’ लिहायला शिकतो, नंतर मोठमोठी पुस्तके शिकतो; त्याच प्रकारे प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायचे. नंतर नामजप इत्यादी करता येईल.

 

१०. अद्वैतात जाण्यासाठी नामजपापेक्षा
‘२४ घंटे भावाच्या स्थितीत रहाणे’, हा साधनेचा पुढचा टप्पा आहे !

साधक : परात्पर गुरुदेव, जर नामजपाच्या ऐवजी मी भगवंताचे किंवा त्याच्या लीलांचे स्मरण करत राहिलो, तर त्यात माझा वेळ वाया गेला का ? नामजप आणि स्मरण हे दोन्ही एकाच टप्प्यावरचे आहेत का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : कसले स्मरण करता ?

साधक : भगवंताच्या विविध लीलांच्या कथा किंवा त्याची गुणवैशिष्ट्ये यांविषयी वाचतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्याला ‘अनेकातून एकात’ जायचे आहे. मायेची अनेक-अनेक रूपे आहेत, तशी भगवंताचीसुद्धा अनेक अनेक रूपे झाली ना ! त्यांतील एकात जायचे आहे. भगवंत अनेक नसून एकच आहे.

भक्तीमार्गात साधक प्रथम पूजापाठ करतो. तेव्हा कुणी म्हणते, ‘‘स्थुलातील पूजा काय करतोस ? भगवंत तर सूक्ष्म आहे ना ? पूजेऐवजी मानसपूजा कर.’’ नंतर मानसपूजेत मनाने मूर्ती ताम्हनात घेतली, मूर्तीला स्नान घातले. तिला पुसले. तिला गंध, अक्षता, फूल वाहिले, तरीसुद्धा ते सर्व अनेक झाले ना ? तेव्हा म्हणतात, ‘‘अरे, आता मानसपूजा नको, तू आता नामजप कर. एका नामावर ये.’’ नंतर जीवनात आणखी कुणी येतो आणि सांगतो, ‘‘अरे, तू नामजप काय करतोस ? पोपटालासुद्धा ‘राम, राम, राम…’ म्हणायला शिकवले, तर पोपटसुद्धा बोलेल. नामजप भावपूर्ण व्हायला पाहिजे.’’ मग साधक भावपूर्ण नामजप करतो. नंतर आणखी कुणी जीवनात येऊन म्हणतो, ‘‘अरे, नामजप किती वर्षे करत रहाशील ? ते तर द्वैत आहे. तुला अद्वैतात जायचे आहे ना ? भावाच्या स्थितीत २४ घंटे रहा.’’ असे पुढचे पुढचे टप्पे टप्पे असतात.

 

११. साधनेमध्ये अनुभूतीचे महत्त्व

११ अ. साधनेत अनुभूती महत्त्वाची असते !

साधक : मला जेव्हा समजले की, तुम्हाला भेटायचे आहे, तेव्हा मी स्वतःला रोखू शकलो नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते (माझा भाव जागृत झाला होता.) मला समजत नव्हते, ‘हे घडत आहे, ते योग्य आहे का ?’; पण ते खरेच घडत होते. अतिशय वेगळी अनुभूती होती. असे मी या पूर्वी कधीच अनुभवले नव्हते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे महत्त्वाचे आहे. साधनेत अनुभूती महत्त्वाची असते. बुद्धीला ग्रंथसुद्धा शिकवू शकतात. एकदा मुंबईची एक साधिका आली. जसे सर्व साधक करतात, तसे ती नामजप इत्यादी करते. तिला अनुभूतीसुद्धा येतात. तिचे यजमान तिच्यासह होते. ते म्हणाले, ‘‘मी नामजप इत्यादी करत नाही; परंतु माझ्याकडे नामजपावर ५०० ग्रंथ आहेत. मी त्यांचा अभ्यास केला आहे. अनुभूती काही नाही.’’ या बुद्धीवाद्यांचे असेच असते. तेव्हा मी म्हटले, ‘‘ठीक आहे. तो तुमचा मार्ग आहे. या साधिकेचा हा मार्ग आहे.’’ ६ – ७ मासांनंतर ते दोघे पुन्हा भेटायला आले. साधनेसंबंधी शिबिर होते. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मी सर्व पुस्तके (इतरांना) वाटून टाकली. नामजप केल्यामुळे जी अनुभूती आली, तशी एवढा अभ्यास केल्यानंतरसुद्धा कधीच आली नव्हती.’’

११ आ. अनुभूतीतून साधना करण्यासाठी प्रेरणा मिळते !

साधक : मला दीड वर्षात विशेष अशी अनुभूती येत नव्हती; परंतु आजचा दिवस असा आहे की, मला केवळ अनुभूतीच अनुभूती येत आहेत. त्यामुळे आजचा दिवस पुष्कळ चांगला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अनुभूतीमुळे साधना करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते. जेवढे वाचाल, तेवढे बुद्धीला जडत्व येते. आपण मनोलय आणि बुद्धीलय म्हणतो ना ? बुद्धी नष्टच करायची आहे, तर वाचून वाचून तिला जड कशाला करायचे ? एवढे संत-महात्मे होऊन गेले. त्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला होता का ? साधना करूनच ते पुढे गेले.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment