पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी संगीताच्या माध्यमातून साधना यासंदर्भात सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

प.पू. आबा उपाध्ये यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण !

कु. तेजल पात्रीकर

प.पू. आबा उपाध्ये यांची ओळख

लहानपणापासूनच प.पू. आबा उपाध्ये यांना संगीताची आवड होती. साधारण वर्ष १९३१ च्या काळात हिज मास्टर्स व्हॉईस या लंडनच्या कंपनीने भारतात प्रवेश केला. या कंपनीची एजन्सी प.पू. आबांच्या मोठ्या भावाने घेतली होती. प.पू. आबांच्या वडिलांनी त्या वेळी त्यांच्या सर्व मुलांना एक-एक रेकॉर्ड घेऊन दिली. त्या वेळी प.पू. आबांनी वसंत कानिटकर यांची पाऊस खुळा या गाण्याची रेकॉर्ड निवडली. ती निवडण्यामागील कारण म्हणजे गायक वसंत कानिटकर हे १२ वर्षांचे होते आणि प.पू. आबा हे ८ वर्षांचे ! त्यामुळे प.पू. आबांनाही आशा होती की, आपलीही कधी रेकॉर्ड निघू शकेल.

नंतर ते मोठ्या भावाकडे मुंबई येथे रहाण्यास आले. तेव्हा एच्.एम्.व्ही. कंपनीचे डायरेक्टर श्री. जी.एन्. जोशी हे होते. त्यांनी प.पू. आबांचे गाणे ऐकल्यावर त्यांचा आवाज गोड असल्याचे सांगून त्यांना शास्त्रीय संगीत शिकण्यास सांगितले. त्यानंतर श्री. राम मराठे यांच्या शिकवणीकरता प.पू. आबा जाऊ लागले. प्रारंभी त्यांनी प.पू. आबांना तंबोरा लावायला शिकवून ३ घंट्यांपर्यंत सलग बसून त्यांना साथ करायला शिकवले. त्यानंतर अनेक मान्यवरांच्या साथीला श्री. मराठे प.पू. आबांना पाठवू लागले. त्यामुळे मान्यवरांचे शास्त्रीय संगीत ऐकून त्यांचे संगीताविषयी कानही तयार झाले. नाशिकचे बेळगावकरबुवा, पं. राम मराठे, छोटा गंधर्व यांचे मेहुणे श्री. भरतेगुरुजी आणि पं. यशवंतबुवा जोशी हे प.पू. आबा यांचे शास्त्रीय संगीतातील गुरु आहेत.

प.पू. आबांना लहानपणापासूनच गाण्यांना चाली लावण्याची हौस होती. पुढे श्री. सुधीर फडके यांच्या साहाय्याने ते संगीत देण्याचा प्रयत्न करू लागले. प.पू. आबांनी लहान काव्यांपासून ६५ छोट्या-मोठ्या नाटकांतील गीतांना चाली दिल्या आहेत. प.पू. आबा काही काळ आकाशवाणीवर मान्यवर संगीतकारही होते.

३.६.२०१६ ते ७.६.२०१६ या कालावधीत प.पू. आबा उपाध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून संगीतातून साधना करण्याच्या अभ्यासाला नुकताच आरंभ झाला होता. आम्हा काही साधकांना  संगीतातून साधना कशी करावी ?, याविषयी मार्गदर्शन करतांना प.पू. आबांनी काही मार्गदर्शक सूत्रे सांगितली होती. ती पुढे दिली आहेत. संगीताकडे साधना या उद्देशाने पहाणार्‍यांना ती मार्गदर्शक ठरतील.

१. ॐकार साधना

१ अ. ॐकार साधना कशी करावी ?

ॐकारापासून सगळे विश्‍व निर्माण झाले आहे. या विश्‍वामध्ये ॐचा ध्वनी आहे. अशी ॐकाराची साधना करता-करता विश्‍वामध्ये जो ॐकार घुमत आहे, त्याच्यासह आपला ॐ मिळाला (मिसळला) पाहिजे.

१ आ. अशा प्रकारे ॐकार मिळण्यासाठी (मिसळण्यासाठी) काय करावे ?

आरंभी आपण अगदी हळू आवाजात ॐकार म्हणायचा. तो तुमच्या कानाला ऐकू येऊ लागला, तरी विश्‍वाच्या ॐशी तुमच्या ॐचा मिलाप झाला आहे का ?, हे तुम्हाला कळणार नाही; पण काही वेळाने तुम्हाला असे जाणवेल की, तुम्ही ॐ म्हणायचे बंद केले, तरी तुम्हाला ॐचा ध्वनी ऐकू येईल. याचे उदाहरण म्हणजे दोन तंबोरे जसे एकाच सुरात लावतात, त्यामुळे त्यांचे दोन वेगळे ध्वनी ऐकू न येता एकाच प्रकारचा ध्वनी ऐकू येतो, तसे आपण म्हणत असलेल्या ॐचा विश्‍वातील ॐसमवेत तुमचा हळूहळू मिलाप व्हायला लागतो.

१ इ. विश्‍वातील ॐसमवेत आपला ॐ मिसळल्यानंतरच्या स्थितीत शेषशायी
भगवान विष्णूच्या आसनावर मानसरित्या बसून गाढ समाधीचा अनुभव घ्यावा !

विश्‍वातील ॐसमवेत आपला ॐ मिसळल्यानंतरच्या स्थितीला आपण मनात कल्पना करायची, विश्‍वाचे मालक भगवान विष्णु वर अवकाशात शेषावर टेकून बसले आहेत. त्यांना प्रार्थना करावी की, तुमच्या आसनावर बसण्याची मला अनुमती मिळावी. त्यांच्या आज्ञेनुसार आपण त्यांच्या आसनावर बसून समाधी लागल्याची अनुभूती घ्यावी.

ॐकार साधनेत मनाने (मानसरित्या) वर जाऊन तरंगतो आणि खाली भूमी आहे, असे समजतो, तेव्हा समाधानाचाच (समाधीचा) एक भाग येतो. हाही अध्यात्माचाच एक भाग आहे.

१ ई. संगीतामध्येही ॐकार साधना महत्त्वाची !

१ ई १. नासिकेतील ॐकार : संगीताविषयी बोलतांना प.पू. आबांनी सांगितले, सर्वांत सुरेल काय असेल, तर नासिकेतील ॐकार आहे. हुंकार करत, म्हणजे तोंड बंद ठेवून हुंचा स्वर म्हणायचा आणि मग हळूहळू तोंड उघडून तोच हुंकार लांबवायचा. (पू. आबा यांनी हा म्हणून दाखवला आहे.)

१ ई २. संगीतातील सर्व श्रुतींना आळवण्यासाठी ॐ नमः शिवाय । म्हणणे : प्रत्येक स्वरावर ॐ नमः शिवाय । असे म्हणण्याचा अभ्यास करायचा. मुलींची गाण्याची पट्टी काळी ५ आहे. तेथील सा स्वरापासून ॐ नमः शिवाय । चढत्या क्रमाने म्हणायला आरंभ करावा, उदा. (सा ते म स्वरापर्यंत) त्यानंतर तोच ॐ नमः शिवाय । सर्व श्रुतींवरून स्वर उतरवून पुन्हा सावर आणायचा. पुन्हा सापासून पूर्वीच्या तुलनेत आणखी वरपर्यंत (सा ते प किंवा ध, नी इत्यादी स्वरांपर्यंत) ॐ नमः शिवाय । चढवून वर सांगितल्याप्रमाणे मूळ सापर्यंत पुन्हा खाली आणायचा.

अशा रितीने गाण्याचा सराव केल्याने सर्व श्रुतींना आळवल्याने सर्व श्रुती आपल्यासमोर उभ्या रहातील.

१ उ. सर्वांत सुरेल गायन कुणाचे म्हणावे ?

सर्वांत सुरेल गायन कुणाचे म्हणावे ? बरोबर स्वराच्या नियोजित श्रुती स्थानावरच गायकाचा स्वर लागतो, तो सुरेल गातो, असे समजावे. या दृष्टीने स्वर लावण्यासाठी तंबोर्‍याचा उपयोग जास्त श्रेयस्कर ठरेल. तंबोर्‍यातूनही ॐ नमः शिवाय । हा नाद निघतो. (या वेळी प.पू. आबा यांनी अशा प्रकारे ॐकार म्हणून दाखवले आहेत.)

१ ऊ. पूर्वी सामवेदाचे समूहगान असे. सामवेदाचा ॐकार म्हणजे सा आहे.

२. प.पू. आबा यांनी वाद्यांविषयी केलेले मार्गदर्शन

२ अ. वाद्य वाजवतांना बोटांचा अग्रभाग अल्प उपयोगात आणल्यावर त्या वाद्याची सुरेलता वाढते !

कोणत्याही वाद्याला बोटांचा अग्रभाग अत्यल्प लागला की, त्या वाद्याची सुरेलता वाढते, उदा. तंबोरा वाजवतांना बोटांचा अग्रभाग तारांना अत्यल्प लागायला हवा, म्हणजे तंबोरा सुरेल आणि रसाळ वाजेल. तंबोरा तालात वाजवला, तर ॐकाराचा ध्वनी निघतो. हाच भाग अन्य वाद्यांच्या संदर्भातही आहे.

२ आ. स्वरांमधील सलगता ज्या वाद्यांमध्ये असते, त्या वाद्यांतून सर्व श्रुती ऐकायला मिळतात !

वाद्यांमध्ये पेटीवर (हामोर्र्नियमवर) २ स्वरांच्या मधील श्रुती ऐकायला मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे सानंतर रे हा स्वर तुटून म्हटला जातो. याउलट ज्या वाद्यांमध्ये स्वरांची सलगता साधली जाते, स्वर तुटलेले नाहीत, त्या वाद्यांतून सर्व श्रुती ऐकायला मिळतात, उदा. व्हायोलीन, तंबोरा यांसारख्या वाद्यांच्या तारा छेडल्यावर २ स्वरांमधील श्रुती आपल्याला ऐकायला मिळतात.

२ इ. प.पू. आबांनी त्यांचे सद्गुरु सदानंदस्वामी यांच्या आज्ञेनुसार वाद्याचे बोल
किंवा रागांचे स्वर सिद्ध व्हावेत, यासाठी काही कलाकारांना आशीर्वादस्वरूप ताम्रपट देणे

तबल्यातील चाटीवर धिं जितका कोमल वाजेल, तितका तबला सुंदर वाजेल. तबला वाजवतांना हाताच्या अग्रबोटांचा स्पर्श तबल्याला जेवढा अलगद होईल, तेवढा तबला अधिक सुकोमल वाजेल. एका तबलावादकाला (श्री. प्रसाद जोशी यांना) प.पू. आबांनी तबल्याचे बोल असलेला ताम्रपट दिला आहे. प.पू. आबांनी त्यांचे सद्गुरु सदानंदस्वामी यांच्या आज्ञेनुसार आशीर्वादस्वरूप असे ताम्रपट काही व्यक्तींना दिलेले आहेत. या ताम्रपटामुळे त्या वाद्याचे बोल किंवा रागांचे स्वर त्या व्यक्तीला सिद्ध होतात आणि त्याचा उत्कर्षही होतो, असे प.पू. आबा यांनी आम्हाला सांगितले.

३. प.पू. आबांनी संगीतातील हिमगौरी रागाविषयी सांगितलेली माहिती

हिमगौरी राग कसा आला ?, याविषयी सांगतांना प.पू. आबा म्हणाले, एका गावात एकाच वेळी श्री. दीनानाथ मंगेशकर आणि बालगंधर्व यांचे नाटक होते. ऐन कार्यक्रमाच्या वेळी श्री. दीनानाथ मंगेशकरांचा आवाज बसला. तेव्हा त्यांनी मंगेशदेवाला प्रार्थना केली, देवा, माझी लाज राखायला पाहिजे. माझा आवाज बसला आहे, तो व्यवस्थित लागला पाहिजे. मला गंधर्वांशी स्पर्धा करायची; म्हणून मी म्हणत आहे, असे नाही; पण माझे नाटकही चांगले झाले पाहिजे. असे म्हणून त्यांनी मंगेशापुढे डोके टेकवले आणि त्या वेळी हिमगौरी रागाचे स्वर असलेला एक कागद त्यांच्या डोक्यावर येऊन पडला. तो कागद घेऊन श्री. दीनानाथ मंगेशकरांनी त्या स्वरांचे पठण केले. ते कार्यक्रमाकरता सभागृहात गेले आणि यशस्वी झाले.

३ अ. हिमगौरी रागाचे ताम्रपट प.पू. आबांनी
सद्गुरूंच्या सांगण्यावरून पं. जीतेंद्र अभिषेकी यांना देणे

‘सद्गुरूंच्या सांगण्यावरून सदर ताम्रपट पं. जितेंद्र अभिषेकी यांना दिला; परंतु ते आजारपणामुळे रुग्णालयात असल्यामुळे सदर ताम्रपट पं. जितेंद्र अभिषेकी यांची बहीण मंगला आळवणी यांच्या समवेत पाठवला. ते कोमात असल्यामुळे तो ताम्रपट त्यांच्या उशाशी ठेवला गेला. प्रत्यक्ष प.पू. आबांशी त्यांची बोलाचाली होऊ शकली नाही. या वेळी मी (कु. तेजल पात्रीकर यांनी) प.पू. आबांना विचारले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकरता आपण हा ताम्रपट आम्हाला देणार का ? त्यावर प.पू. आबा म्हणाले, श्री गुरूंचा आदेश येईल त्याप्रमाणे करू.

३ आ. हिमगौरी रागाचे वैशिष्ट्य

या रागाच्या माध्यमातून हिमगौरीची आराधना (हिमगौरी घोषपूजा) करायची असते. त्यामुळे हिमगौरीचे दार उघडते. प.पू. आबा यांच्या मानसकन्येला परम गुरु सदानंदस्वामी यांच्या आज्ञेनुसार प.पू. आबांनी तीन रागांचे हिमगौरी, शिवगौरी आणि शिवचंद्र गौरी ताम्रपट दिले.

शिवचंद्र गौरीपर्यंत गेल्यामुळे, म्हणजे चंद्र हा शिवाच्या डोक्यावर असल्यामुळे सर्व जगात तुमची प्रसिद्धी वाढते. हा राग उत्कर्षाच्या शिखरापर्यंत नेतो; परंतु आजपर्यंत याचा म्हणावा तसा लाभ कुणाला करून घेता न आल्याने आता हे ताम्रपट देणे बंद केले, असेही प.पू. आबांनी सांगितले.

४. राग गाण्याच्या वेळेला तो गायल्याने अधिक रंजक होतो !

संगीतात प्रत्येक रागाचा गानसमय (वेळ) असतो. आपण घरी चहा घेतो आणि हिल स्टेशनवरील सीनसीनरी पहात हॉटेलमध्येही तोच चहा घेतो; पण हिल स्टेशनवरील सीनसीनरी पहात तोच चहा घेतांना त्याची लज्जत काय असेल ! असेच रागांचे आहे. राग गाण्याच्या काळात, प्रहरात तो राग गायल्यास अधिक रंजक होतो, म्हणजे खुलतो.

५. प.पू. आबांनी भावगीत गाण्याविषयी सांगितलेली काही सूत्रे

५ अ. काही भावगीतांत सुराला शब्दांचा, तर
काही भावगीतांत शब्दांना सुराचा न्याय द्यावा लागणे
आणि यामुळे त्या गीतातील भाव गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त करता येणे

काही भावगीतांत सुराला शब्दांचा न्याय द्यावा लागतो, म्हणजे रागाला शोभतील असेच शब्द असायला हवेत. काही भावगीतांत शब्दांना सुराचा न्याय द्यावा लागतो, म्हणजे गीतातला भाव ओळखून शब्दांना शोभेल असा सूर द्यावा लागतो (त्याला साजेसा राग असायला हवा.), तरच तो संगीतकार शब्द आणि सूर यांचा योग्य मिलाप करू शकतो. यामुळे त्या गीतातील भाव गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त करता येतात.

५ आ. भावगीतात शब्दफेकीला अधिक महत्त्व असणे

भावगीत म्हणतांना भावाप्रमाणे हात आपोआप वर-खाली होतात. भावगीतात शब्दफेकीला अधिक महत्त्व आहे. गीतातील ज्या शब्दांना महत्त्व द्यायचे असेल, त्या शब्दांवर जोर कशा प्रकारे द्यायचा ?, हे प.पू. आबांनी समजावून सांगितले.

६. बैठकीत (मैफलीत) षड्जाचे गाणे मध्यमाच्या गाण्यासमोर फिके ठरते !

संगीताच्या बैठकीत (मैफलीत) गाणे म्हणतांना, निवडतांना कसा विचार करावा ?, याविषयी प.पू. आबा सांगतात, बैठकीत (मैफलीत) षड्जाचे गाणे मध्यमाच्या गाण्यासमोर फिके ठरते, म्हणजे संगीताच्या बैठकीत एखाद्या तार सप्तकाच्या (वरच्या पट्टीतील स्वरांचे गाणे) गाण्यानंतर मंद्र सप्तकातील (खालच्या पट्टीतील स्वरांचे गाणे) गाणे एखाद्याने गायले, तर ते तेवढे उठत नाही. त्यामुळे तार सप्तकातील गाण्यानंतर तार सप्तकातीलच गाणी गावीत.

(खालच्या स्वरांमुळे निर्गुण तत्त्व आणि सात्त्विक तत्त्व अधिक प्रमाणात प्रकट होत असावे आणि मध्यमाच्या वरच्या स्वरांमधून सगुण तत्त्व, रजोगुण अधिक प्रमाणात प्रकट होत असावेत. त्यामुळे वरच्या पट्टीतील गाण्याने क्रियाशीलता वाढते, असे वाटते. योग्य आहे का ? – सौ. श्रेया साने

(परात्पर गुरु) डॉ. आठवले : योग्य आहे.)

७. गाण्यात श्रुतींचा वापर जेवणात चटणी घेतो, तेवढाच असणे आवश्यक !

गाण्यात श्रुतींच्या वापराविषयी मार्गदर्शन करतांना प.पू. आबांनी एक उदाहरण सांगितले. प.पू. आबा एका प्रसिद्ध संगीतकाराच्या, गायकाच्या कार्यक्रमाला गेले होते. ते गायक गायनामध्ये १२ श्रुतींव्यतिरिक्त काही निद्रिस्त श्रुतींना हळुवार आळवून गीत सादर करत होते; परंतु ते गाण्यात वारंवार त्या निद्रिस्त श्रुतींना आळवत असलेले पाहून कार्यक्रमानंतर प.पू. आबांनी त्या प्रसिद्ध संगीतकार, गायकांना सांगितले, बारा सुरांमध्ये आपण हळुवारपणे जागे केलेल्या श्रुतींचा ताटातील चटणीसारखा वापर करावा. त्याचा भात करू नये. याचा अर्थ गाण्यात उपयोगात आणलेल्या निद्रिस्त श्रुतींना हळुवार आळवून चटणी तोंडी लावतो, तसे केल्यास ते गाण्यात उठून दिसते. त्या श्रुतींचे उच्चारण वारंवार, म्हणजे भाताएवढे मोठे करू नये. (जेवणात चटणी तोंडी लावायला आपण थोडीच घेतो; पण भाताचे प्रमाण जेवणात अधिक असते. त्याची उपमा येथे प.पू. आबा देत आहेत.)

८. संगीतातून साधना करण्यासाठी मन निर्मळ असायला हवे आणि सर्व  सजीव वृक्ष, पशू, पक्षी, निर्जीव वस्तू यांच्यावर प्रेम करायला जमायला हवे

९. अनुभूती

९ अ. गाणे बंद झाल्यावर प.पू. आबांची प्रकृती बिघडणे आणि
गाण्याचा अभ्यास चालू केल्यावर त्यांची प्रकृती आपोआप सुधारणे

प.पू. आबांच्या तरुणपणात काही काळ ते दुसरीकडे रहायला गेल्यामुळे त्यांचे गाणे बंद झाले. हळूहळू प.पू. आबांची प्रकृती बिघडायला लागली. बरेच आधुनिक वैद्य (डॉक्टर), वैद्य झाले; पण गुण येत नव्हता. शेवटी डॉ. कर्वे (होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक) यांनी प.पू. आबांच्या सर्व पैलूंचे निरीक्षण करून सांगितले, तुम्ही गाण्याचा अभ्यास पुन्हा चालू करा. तसे प.पू. आबांनी केल्यावर त्यांची प्रकृती आपोआप सुधारली.

९ आ. प.पू. आबांनी लिहिलेल्या पंचमहाभुतांच्या
अष्टकाच्या पठणाने एका भक्ताची गेलेली वाणी परत येणे

प.पू. आबांनी पंचमहाभुतांचे अष्टक लिहिले आहे. प.पू. आबांचे भक्त श्री. माधवराव दीक्षित यांची वाणी गेली होती. प.पू. आबांनी त्यांना पंचमहाभूतांचे अष्टक दिले. त्याच्या पठणामुळे त्यांची गेलेली वाणी परत आली आणि ते ठणठणीत बरे झाले.

प.पू. आबांचे वय ९० वर्षे आहे, तरी याही वयात अत्यंत उत्साहाने आणि आत्मीयतेने प.पू. आबांनी आम्हा संगीतातून साधना करण्याचा अभ्यास करणार्‍या साधकांना वेळ देऊन गायन आणि वादन यांविषयी विविध सूत्रे सांगितली, त्याबद्दल प.पू. आबांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करते.

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment