पाणी हे जागतिक युद्धाचे कारण ?

 

 

१. पुढील काळात माणसाला पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असणे

पाण्याचा भौगोलिक अभ्यास दर्शवितो की, पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि उर्वरित २९ टक्के भागावर भूमी आहे. अर्थात् सर्व पाणी हे प्राणीमात्राला वापरण्यायोग्य नाही; कारण तज्ञांच्या मतानुसार यातील ९७.५ टक्के पाणी खारे आहे. उर्वरित पाण्यापैकी ०.६२ टक्के पाणी भूमीखाली साठ्याच्या रूपात आहे. यातून शेष राहिलेले पाणी नद्या, तलाव, सरोवरे यांमधून आपल्याला मिळते. केवळ हेच पाणी आपल्याला वापरण्यासाठी योग्य आहे; पण खरे सूत्र असे आहे की, पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत एकंदरीतच अल्प होत आहेत. आणखी पुढील ३० वर्षांत पाण्याची उपलब्धता इतकी न्यून होईल की, १/३ लोकसंख्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याने त्रासलेली (हवालदिल) असेल. लोकसंख्येच्या भस्मासुरामुळे वर्ष १९०० ते २००० या कालावधीत पाण्याची आवश्यकता दुपटीने वाढलेली आहे.

 

२. जगातील १०० कोटी लोक शुद्ध, पिण्यायोग्य
पाणी मिळण्याच्या मूलभूत आवश्यकतेपासून वंचित असणे

‘ग्लोबल इश्यू – १९९९’ यामधील विवरणानुसार जगातील ४०० कोटी लोकसंख्या ही अशा ठिकाणी रहाते, जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पूर्ण जगाची लोकसंख्या ६०० कोटी आहे; पण त्यातील १०० कोटी लोक शुद्ध, पिण्यायोग्य पाणी मिळण्याच्या मूलभूत आवश्यकतेपासून वंचित आहेत.

 

३. भारताला पाण्यासंबंधी अनेक उपाययोजनाकरण्याची आवश्यकता असणे

असे समजले जाते की, प्रतिवर्षी माणसामागे २००० क्युबिक मीटर एवढे पाणी उपलब्ध असावे. जर हे प्रमाण १७०० क्युबिक मीटरएवढे असेल, तर समाधानकारक उपलब्धता नाही आणि १००० क्युबिक मीटरपेक्षाही अल्प असल्यास पाणी तुटवडा आहे. वर्ष २०५० मध्ये केवळ भारतातच २७८८ बिलियन क्युबिक मीटर पाणी प्रतिवर्षी लागेल; पण या वर्षी भारताची स्थिती अत्यंत असमाधानकारक आहे. त्यामुळे भारताला पाण्यासंबंधी अनेक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 

४. तज्ञांच्या भाकितानुसार वर्ष २०२५ पर्यंत पाण्याचा असलेला साठा संपुष्टात येईल

तज्ञांच्या भाकितानुसार वर्ष २०२५ पर्यंत पाण्याचा असलेला साठा संपुष्टात येईल आणि केवळ पाणी समस्येमुळे युद्धेसुद्धा होतील. केवळ पाणी वाटपावरून गावे, तालुके, शहरे, प्रांत, राज्ये आणि देश या सगळ्यांचे आपापसांत कलह होतील.

 

५. ‘इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन’ ही
पाण्यासाठी चळवळ उभारणारी भारतातील संस्था असणे

पाणी या प्रश्‍नाची गंभीरता लक्षात घेऊन जागतिक पातळीवर एक चळवळ उभारली जात आहे. केवळ पाणी या विषयाकरिता ‘वर्ल्ड वॉटर कौन्सिल’ची स्थापना झाली आहे. स्टॉकहोम येथे ऑगस्ट १९९९ मध्ये ‘वर्ल्ड वॉटर व्हिजन’ हा उपक्रम सादर केला गेला. देशादेशांतून ‘पाणी’विषयक जागृती निर्माण करणे, त्यासाठी अनेक शासकीय आणि निजी संस्थांना पाणी समस्येचे महत्त्व अन् त्यावरची उपाययोजना यांचे विवरण करून देणे, तळागाळातील लोकांपर्यंत याची गंभीरता पोचवण्यासाठी लागणारे आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य या स्वरूपाचे कठीण काम ‘ग्लोबल वॉटर पार्टनरशिप’ (GWP) ही संस्था ‘वर्ल्ड वॉटर कौन्सिल’च्या छत्राखाली करत आहे. ‘इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन’ ही अशाच प्रकारची चळवळ उभारणारी भारतातील संस्था आहे.’

– माधुरी नवरे. (‘दैनिक लोकसत्ता’, १९.३.२०००)

टीप : सदर लेखातून मांडण्यात आलेली पाण्याची गंभीर समस्या ही १७ वर्षांपूर्वीची असली, तरी या समस्येने आज आणखी भयंकर रूप धारण केले आहे – संपादक

‘संस्कारहीन व्यक्ती शिक्षित समाजात हंसाच्या थव्यामध्ये बगळ्याप्रमाणे असतात.’ जे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या डोक्यावर मारतात, ते निश्‍चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात. ज्या ठिकाणी ज्ञान, शिक्षण, माणुसकी आणि संपन्नता असते, त्या ठिकाणी स्वर्ग असतो. संस्कारक्षम व्यक्ती स्वर्ग निर्माण करतात, तर संस्कारहीन व्यक्ती नरक निर्माण करतात.’ – गीता स्वाध्याय (जानेेेवारी २०११)

Leave a Comment