शीघ्र गतीने अध्यात्मप्रसार होण्यास्तव प.पू. डॉक्टरांनी केलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची निर्मिती आणि त्यातून साधकांची साधना व्हावी, यासाठी विविध माध्यमांतून दिलेली शिकवण !

‘श्रीगुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेने आणि प्रेरणेने प.पू. डॉक्टरांनी वर्ष १९९१ मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची स्थापना केली अन् अध्यात्मप्रसाराच्या सेवेला आरंभ केला. ‘भारतभर आणि पुढे जगभरात अध्यात्मप्रसार करायचा’, ही श्री गुरूंची आज्ञा अन् आधुनिक विज्ञानाचा काळ’, या दोन्हींची सांगड घालायची, तर घरोघरी स्वत: जाऊन अध्यात्मप्रसार करण्यासह काळानुसार उपलब्ध असलेली सर्वच आधुनिक उपकरणे आणि माध्यमे यांचा उपयोग करणेही आवश्यक आहे, ही गोष्ट प.पू. डॉक्टरांनी अचूक ओळखली. दूरचित्रवाहिन्या आणि संगणकीय तंत्रज्ञान भारतात वेगाने येऊ लागले आहे, हे प.पू. डॉक्टरांच्या दृष्टोत्पत्तीस होतेच. या दृक्-श्राव्य माध्यमांचा जनमानसावरील पगडा वाढत होता. या माध्यमांद्वारे प्रसार केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला कोणतेही सूत्र आकलन होण्यास आणि मनाची पकड घेण्यास सोपे जाते. हे लक्षात घेऊन प.पू. डॉक्टरांनी संस्थेच्या ध्वनीचित्रीकरण सेवांचा आरंभ केला.

श्री. दिनेश शिंदे

१. ध्वनीचित्रीकरण सेवा आरंभ करण्यामागील मूळ उद्देश !

चित्रीकरणातील बारकावे सौ. अंजली गाडगीळ (आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) यांना सांगतांना प.पू. डॉक्टर आठवले

या सेवांच्या निर्मितीमागे अध्यात्मप्रसार आणि साधनाप्रसार, हे उद्देश होतेच; पण त्याचसमवेत ‘या सेवेअंतर्गत येणार्‍या प्रत्येक सेवेकर्‍याला ‘साधक’ म्हणून घडवणे आणि त्याची आध्यात्मिक उन्नती करवून घेणे, हाही त्यामागील सुप्त; पण अती महत्त्वाचा उद्देश होता’, असे म्हणावे लागेल !

२. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने ध्वनीचित्रीकरणाची सेवा मिळणे

ध्वनीचित्रीकरण सेवा निर्माण तर झाली; परंतु आरंभी वर्षभर प.पू. डॉक्टर एकटेच याअंतर्गत येणार्‍या सर्व सेवा करत. पुढे वर्ष १९९१ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर प.पू. डॉक्टरांकडे सेवेला जाऊ लागलो. त्या वेळी त्यांनी मला ध्वनीचित्रीकरणाची सेवा करण्याची संधी दिली. या सेवा करू लागल्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात अनेक सूत्रे लक्षात आली.

३. ध्वनीचित्रीकरणाची सेवा करतांना
प.पू. डॉक्टरांविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

३ अ. प.पू. डॉक्टरांना सर्वच गोष्टी ज्ञात असणे

प.पू. डॉक्टरांना ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण करणे, त्यासाठी आवश्यक ती प्रकाशयोजना करणे, या संदर्भातील सर्वच माहिती होती. या सर्व गोष्टी ते स्वतः करत.

३ आ. अनेक गीतांचा संग्रह

त्यांच्याकडे चांगल्या गुणवत्तेची जुनी मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटगीते आणि भावगीते, भक्तीगीते, नाट्यगीते यांचा संग्रहही होता.

३ इ. ऑडिओ-व्हिडिओे संदर्भातील अनेक वस्तू संग्रही असणे

त्या काळी त्यांच्याजवळ ऑडिओ-व्हिडिओे संदर्भातील ८ एम्.एम्. फिल्मचा व्हिडिओे कॅमेरा, स्लाईड शोचा प्रोजेक्टर, डिस्क रेकॉर्डर, कॅसेट प्लेअर, स्पुल-रेकॉर्डर, रेडिओ, फोटो कॅमेरा अशा सर्व वस्तू होत्या.

३ ई. प.पू. डॉक्टरांची जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती

वर्ष १९८५ ते १९८९ या काळात, म्हणजे ‘मानसोपचारतज्ञ’ म्हणून व्यवसाय करतांना प.पू. डॉक्टरांकडे येणारे काही रुग्ण बरे होत नव्हते. त्यांतील काही जण संतांकडे जाऊन बरे झाले. हे कळल्यावर यामागील नेमक्या कारणाचा अभ्यास करण्यासाठी प.पू. डॉक्टर त्या संतांकडे गेले. ते संत करत असलेले विविध आध्यात्मिक उपाय, त्यांचे कार्यक्रम, त्या संतांच्या भक्तांना आलेल्या अनुभूती आणि त्यांच्या मुलाखती हे सर्व त्यांनी चित्रित केले, उदा. सोमा भगत, प.पू. नरेशबाबा इत्यादी. या चित्रीत केलेल्या कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी स्वत: लिहिले आणि स्वत:च्या आवाजात ध्वनीमुद्रित केले. हे निवेदन कार्यक्रमाच्या आरंभी घालून त्यांनी चित्रफिती सिद्ध केल्या. यातून प.पू. डॉक्टरांची अभ्यासू वृत्ती लक्षात आली.

३ उ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यमय
भजनांचा अमूल्य ठेवा अखिल मानवजातीसाठी जतन करणे

३ उ १. श्री गुरूंनी गायलेल्या चैतन्यमय भजनांच्या ध्वनीफिती आणि ध्वनीचित्रफिती यांचा संग्रह करणे : प.पू. डॉक्टर त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे जाऊ लागले. त्या वेळी त्यांनी प.पू. महाराजांच्या भजनांच्या सर्व कार्यक्रमांच्या ध्वनीफिती आणि चित्रफिती सर्व भक्तांकडून जमा केल्या. त्यांच्या वाणीतील, त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दातील चैतन्य आणि त्यात साठलेले जीवनोपयोगी ज्ञानाचे अमूल्य भांडार, हे सर्व प.पू. डॉक्टरांनी अचूक ओळखले होते. आपल्या गुरूंचा हा अमूल्य ठेवा अखिल मानवजातीसाठी जतन करण्यातून त्यांंच्यातील गुरुभक्ती आणि श्री गुरूंप्रतीची कृतज्ञता शिकायला मिळाली.

३ उ २. जतन केलेल्या ध्वनीफिती आणि चित्रफिती यांना बुरशी लागू नये, यासाठी त्या प्रत्येक २-३ मासांनी ते स्वत: मागे-पुढे फिरवत असणे : चित्रफिती न फिरवता तशाच राहिल्या, तर त्यांचे रिळ चिकटते आणि त्यांच्यावर बुरशी येते. या जतन केलेल्या ध्वनीफिती आणि चित्रफिती कालौघात सुस्थितीत रहाव्यात, त्यांना बुरशी लागू नये, यासाठी त्या प्रत्येक २-३ मासांनी ते स्वत: मागे-पुढे फिरवत असत. या गोष्टी ते प्रवासाला जातांना किंवा वैयक्तिक आवरतांना करत. यातून त्यांनी ‘वेळ कसा वाचवायचा’, हेही शिकवले. त्यांनी हे सर्व स्वतः केले. त्यामुळे त्या सर्व ध्वनीफिती आणि चित्रफिती जवळजवळ २० वर्षे चांगल्या स्थितीत राहिल्या. यातून गुरुसेवा आणि गुरुभक्तीसमवेत त्यांचा दूरदर्शीपणाही लक्षात येतो.

३ उ ३. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच आज साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला मिळणे : प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच आज आम्हा साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला, तसेच त्यांच्या भजनांचे कार्यक्रम पहायला मिळत आहेत. या ध्वनीफिती आणि चित्रफिती यांच्या माध्यमातून आपल्या गुरूंच्या गुरूंना पहायला मिळणे, त्यांचा आवाज ऐकायला मिळणे, हे आम्हा साधकांचे अहोभाग्य आहे. आज हीच भजने संस्थेतील आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आध्यात्मिक उपायही करत आहेत आणि प.पू. डॉक्टरांच्या सूक्ष्म-जगतातील संशोधनकार्यात एक अनमोल वाटा उचलत आहेत. त्यांचे हे महत्त्व प.पू. डॉक्टरांनी कधीच ओळखले होते.

४. साधकांना ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात शिकवलेल्या विविध सेवा !

४ अ. ध्वनीमुद्रण, चित्रीकरण आणि संकलन आदी सेवा शिकवणे

ध्वनीफीत जतन करतांना तिला बुरशी लागणार नाही, यासाठी काळजी कशी घ्यायची, ध्वनीमुद्रण आणि चित्रीकरण कसे करायचे, त्यासाठी प्रकाशयोजना कशी असायला हवी, संकलन कसे करायचे, या सर्व सेवा त्यांनी शिकवल्या.

४ आ. आरंभी ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण
करण्यासाठी लागणारे साहित्य इतरांकडून किंवा भाड्याने आणणे

वर्ष १९९० ते १९९७ या कालावधीत आपल्याकडे ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी लागणारे साहित्य, उदा. माईक, ध्वनीमुद्रक, व्हिडिओेे कॅमेरा, फोटो कॅमेरा, संकलनासाठी लागणारा व्हिसीआर् इत्यादी नव्हते. हे सर्व साहित्य प.पू. डॉक्टर इतरांकडून मागून आणून किंवा भाड्याने मिळत असल्यास ते आणून कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण अथवा चित्रीकरण करून घ्यायचे.

४ इ. टेपरेकॉर्डरवर ध्वनीमुद्रण केलेल्या प.पू. डॉक्टरांच्या प्रवचनांची
गुणवत्ता विशेष चांगली नसूनही चैतन्यमय वाणीमुळे ती पुन:पुन्हा ऐकावीशी वाटणे

या कालावधीत अनेक ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे ‘अध्यात्म’ या विषयावर प्रवचन आणि मार्गदर्शन झाले. आवश्यक त्या वस्तू नसल्यामुळे त्यांचे चित्रीकरण अथवा ध्वनीमुद्रण आपण करू शकलो नाही. स्थानिक स्तरावर साधकांकडे असलेल्या टेपरेकॉर्डरवर त्या प्रवचनांचे ध्वनीमुद्रण केले गेले. त्यामुळे त्यांची गुणवत्ता विशेष चांगली नव्हती; परंतु त्यांतील चैतन्यमय वाणीमुळे आजही ती प्रवचने पुन:पुन्हा ऐकावीशी वाटतात.

४ ई. अर्पण मिळालेला पहिला व्हिडिओेे कॅमेरा

वर्ष १९९७ मध्ये अभ्यासवर्गास येणारे ठाणे येथील साधक श्री. श्रीकांत पाटील यांनी प.पू. डॉक्टरांच्या डोंबिवली येथील अभ्यासवर्गाचे चित्रीकरण केले. पुढे आपले कार्य पाहून त्यांनी त्यांचा व्हिडिओे कॅमेरा संस्थेच्या कार्यासाठी अर्पण केला. त्या काळी व्हिडिओे कॅमेर्‍याची किंमत जवळ-जवळ ७० ते ८० सहस्र रुपये एवढी होती. हा ध्वनीचित्रीकरणासाठी अर्पण मिळालेला पहिला व्हिडिओे कॅमेरा होता.

४ उ. प.पू. डॉक्टरांनी ‘चित्रीकरणाचे संकलन कसे करायचे’, हे बारकाव्यांसह शिकवणे

वर्ष १९९१ मध्ये मी प.पू. डॉक्टरांकडे सेवेसाठी मधे-मधे जाऊ लागलो. त्या वेळेस अन्य सेवांसह ‘चित्रीकरणाचे संकलन कसे करायचे’, हे त्यांनी शिकवले. आरंभी प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) भजनांच्या ध्वनीफितींचे संकलन करायला शिकवले. त्यानंतर प.पू. बाबांच्या कार्यक्रमांच्या चित्रफितींचे संकलन करायला शिकवले. कार्यक्रमाला अनुसरून मुख्य मथळा कसा घ्यायचा, कार्यक्रमाचे स्थळ, दिनांक आणि पत्ता कोठे घालायचा, संत अन् भक्त यांच्या नावांच्या तळपट्ट्या कशा घालायच्या, तसेच या सर्वांची रंगसंगती सात्त्विक कशी असावी, कोणत्या दृश्याने कार्यक्रमाचा आरंभ करायचा, दृश्याची सलगता राखण्यासाठी कोणकोणते दृश्य घ्यायचे, जे दृश्य घ्यायचे, त्याचे काऊंटर कसे लिहायचे, निवेदन कसे लिहायचे, व्हिसीआर् टेपचे हेड कधी आणि कसे स्वच्छ करायचे, अशा संकलनातील एक ना अनेक बारीक-सारीक गोष्टी त्यांनी शिकवल्या.

४ ऊ. प.पू. बाबांच्या सर्व चित्रफिती आणि ध्वनीफिती
यांचे संकलन करून घेणे, ते स्वत: तपासणे अन् त्यातील त्रुटीही दाखवणे

पुढे प.पू. बाबांच्या सर्व चित्रफिती आणि ध्वनीफिती यांचे संकलन त्यांनी करून घेतले अन् स्वत: तपासले. त्यातील त्रुटीही दाखवल्या. त्यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन शिकायला मिळाले. त्या वेळी त्यांनी सांगितलेले वाक्य आजही आठवते, ‘‘संकलन आणि चित्रीकरण करणारा असा सिद्ध करायचा की, तो पुढे इतरांना सिद्ध करील. त्यामुळे या सेवांसाठी आपल्याकडे साधक नाहीत, असे होणार नाही.’’ आज २४ वर्षांनंतर प.पू. डॉक्टरांनी काढलेले उद्गार किती सत्य आहेत, ते प्रत्यक्ष अनुभवत आहे. आज ध्वनीचित्रीकरण सेवेअंतर्गत अनेक उपसेवा आहेत आणि त्यामधे ८० ते ९० साधक सेवा करतात.

४ ए. बुद्धीने ‘एखादी सेवा जमणार नाही’, असे सांगितल्यास प.पू. डॉक्टरांनी प्रयत्न करण्यास सांगणे, चिकाटीने प्रयत्न केल्यावर ती सेवा होऊन त्यातून आनंद मिळणे आणि प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धा वाढणे

‘साधना’ या विषयाच्या ध्वनीफितीचे कॅसेट रेकॉर्डरवर संकलन करतांना काही वेळेला प.पू. डॉक्टर एखाद्या वाक्यातील शब्द काढायला सांगायचे. तेव्हा मी त्यांना ‘‘तसे करता येणार नाही’’, असे बुद्धीने सांगायचो, तरी ते तो शब्द काढायचा प्रयत्न करायला सांगायचे. एक शब्द काढण्यासाठी ध्वनीफीत शेकडो वेळा मागे-पुढे करावी लागे. तो शब्द संकलनात काढला जात असे. यासाठी साधारणत: ३ – ४ घंटे लागायचे; परंतु सेवेशी एकरूप झाल्याने स्वत:चाच विसर पडून तो शब्द काढायचा चिकाटीने प्रयत्न होत असे. शब्द काढल्यावर सेवा परिपूर्ण झाल्याचा आनंद मिळून प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धाही वाढत असे.

५. प.पू. बाबांच्या भजनांच्या ध्वनीफिती सिद्ध करणे

५ अ. विषयांनुसार प.पू. बाबांची निवडक भजनेे घेणे

वर्ष १९९२ मध्ये प.पू. डॉक्टरांनी मुंबई येथे प.पू. बाबांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त त्यांच्या भजनांच्या ध्वनीफितींचे विषयांप्रमाणे १२ भाग करायचे ठरवले. भक्तांकडून जमा केलेल्या २००-२५० ध्वनीफिती ऐकून त्यातील चांगली भजने निवडली. निवडक भजनांत वाद्यांना महत्त्व न देता ‘भजनांचे शब्द ऐकू येतात ना ? भजनामुळे कोणती अनुभूती येते ?’, या सर्व गोष्टींचा विचार करून ती भजने निवडली.

५ आ. भजने संकलित करतांना संकलकाला अनेक घंट्यांचा
कालावधी लागणे आणि ध्यान लागणे, शांत वाटणे अशा अनुभूती येणे

प.पू. बाबा भजन म्हणतांना बर्‍याच वेळेला काही ओळी पुनःपुन्हा म्हणत. तेव्हा ‘संकलन करतांना एकच ओळ घ्या’, असे प.पू. डॉक्टर सांगायचे. तेव्हा टेपरेकॉर्डरवर भजने संकलित केली जायची. ती ओळ घेऊन बाकीच्या ओळी पुसण्यासाठी संकलकाला अनेक घंट्यांचा कालावधी लागायचा. संकलन झाल्यावर प.पू. डॉक्टर संकलित केलेले भजन ऐकत आणि अंतिम करत. ही भजने संकलन करणार्‍या साधकाला ‘ध्यान लागणे, भजने पुनःपुन्हा ऐकत रहावी, असे वाटणे, शांत वाटणे’, अशा विविध प्रकारच्या अनुभूती यायच्या.

६. काटकसर करायला शिकवणे

ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी लागणार्‍या नवीन ऑडिओ आणि व्हिडीओ ध्वनीफिती अन् चित्रफिती बाजारातून विकत आणत असू. त्यावर चित्रीकरण अथवा ध्वनीमुद्रण झाल्यावर त्यांचे संकलन करून पुन्हा त्या वापरण्याची पद्धतही घालून दिली. यामुळे नवीन फिती (कॅसेट) आणण्यासाठीच्या पैशांची बचत होत असे.

७. कलामंदिरनिर्मितीविषयी तात्काळ मार्गदर्शन करणे

रामनाथी आश्रमात असलेल्या चित्रीकरण कक्षातील काही गोष्टींमुळे चित्रीकरणात अनेक अडचणी येत होत्या. एकदा सहज त्यासंदर्भात प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते लगेच म्हणाले, ‘‘आपण चित्रीकरणासाठी वास्तू बांधूया. पुढे आपल्याला धर्मशिक्षणासाठी जी वाहिनी काढायची आहे, त्याचा आरंभही येथूनच करता येेईल.’’

८. ‘सांगकाम्यासारखे नको, तर सेवा सर्वांगांनी
अभ्यास करावी’, याची शिकवण देणारे प.पू. डॉक्टर !

८ अ. ध्वनीफिती बनवण्यास शिकवणे

वर्ष १९९९-२००० मध्ये प.पू. डॉक्टरांची प्रवचने आणि प.पू. बाबांची भजने यांच्या ध्वनीफितींना प्रसारातून पुष्कळ मागणी येऊ लागली. तेव्हा बाजारात एका ध्वनीफितीची किंमत १२ ते १३ रुपये होती. ‘आपल्याला ध्वनीफिती बनवता येतात का’, ते त्यांनी पहायला सांगितले. तसे केल्यावर ५ – ६ रुपयांपर्यंत एक ध्वनीफीत बनू लागली.

८ आ. कॅसेट कॉपी करण्याचे यंत्र विकत घेतांना अभ्यासपूर्ण
खरेदी न केल्याची चूक दाखवून अभ्यास करण्यास शिकवणे

कॅसेट प्लेअरवर प्रतिदिन ४० – ५० फिती होत असल्यामुळे प्रसारातील मागणी पूर्ण होत नव्हती. दिवसाला ४००-५०० कॅसेट कॉपी होऊ शकतील, असे यंत्र उपलब्ध होऊ शकते का, असा पर्याय प.पू. डॉक्टरांनी सुचवला. बाजारात एके ठिकाणी वापरलेले यंत्र मिळाले. त्याची किंमत १ लक्ष ७५ सहस्र होती आणि क्षमताही दिवसाला ४०० ते ५०० प्रती काढायची होती. ते खरेदी केले. काही दिवसांनी त्यांनी विचारले, ‘‘यंत्राच्या खरेदीच्या संदर्भात परिपूर्ण अभ्यास केला का ?’’ त्यादृष्टीने अभ्यास झाला नव्हता. ही चूक त्यांनी लक्षात आणून दिली. प्रतिमास ध्वनीफितींची एकूण मागणी, बाहेरून कॉपी करून घेतल्यास येणारा व्यय, तसेच १ लक्ष ७५ सहस्र रुपये अधिकोषात ठेवून त्याच्या व्याजातून या कॉपीचे पैसे देऊ शकतो का ?’ असा कोणताच अभ्यास अथवा विचार आमच्याकडून झाला नव्हता.

– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.