औषधी वनस्पतींची लागवड करा !

 

  • भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !
  • भावी आपत्काळातील संजीवनी
  • सनातनची ग्रंथमालिका

१. काळाची पावले ओळखून जनकल्याणासाठी ग्रंथाची निर्मिती !

‘पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. जनजीवन आणि दळणवळण सुविधा विस्कळीत झाल्याने तयार औषधांचा पुरवठा होऊ शकत नाही. कधी सीमेवर युद्धाची ठिणगी पडल्यास शासनाकडे उपलब्ध औषधे सैन्याला पुरवायची कि जनतेला, हा प्रश्‍न येतो आणि साहजिकच सर्व सुविधा सैन्याकडे वळवल्या जातात. अलीकडेच नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक मरण पावले. तेथेही औषधांचा प्रचंड तुटवडा भासत होता. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात. या वनस्पती कशा लावाव्यात याची इत्थंभूत माहिती प्रस्तुत ग्रंथात दिली आहे. हा ग्रंथ म्हणजे काळाची पाऊले ओळखून जनकल्याणासाठी केलेला एक यज्ञच म्हणावा लागेल.

२. औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी समर्पित ग्रंथ !

विश्‍वाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आयुर्वेदाचे सृजन केले. अनादी काळापासून भारतामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जात आहे. आयुर्वेद हा ‘पाचवा वेद’ आहे. परंतु भारतातच या शास्त्राच्या झालेल्या उपेक्षेमुळे आज या चिकित्साशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. प्रस्तुत ग्रंथ या वनस्पतींच्या संवर्धनासाठी समर्पित आहे.

३. मुंबईसारख्या शहरांतील लोकांनाही स्वतःच्या
घरांमध्ये लावता येतील, अशा वनस्पतींविषयी सविस्तर मार्गदर्शन !

शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये (‘फ्लॅट्स’मध्ये) किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये रहात असल्याने त्यांना औषधी वनस्पतींची लागवड करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत त्यांनाही निवडक १० वनस्पतींची लागवड कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येही करता येते. या १० वनस्पतींद्वारे १०० हून अधिक विकारांवर उपचार करता येतात. या ग्रंथांत हे उपचारही सविस्तर वर्णिले आहेत.

४. लागवडीच्या दृष्टीने वनस्पतींचे प्रायोगिक वर्गीकरण करून
प्रत्येकालाच औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रवृत्त करणारा ग्रंथ !

प्रत्येकाकडील जागेची उपलब्धता, पाण्याची सोय आणि प्रत्येकाची क्षमता यांना अनुसरून एकूण २०० हून अधिक वनस्पती या ग्रंथात विविध वर्गांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. घरातील सज्जात लावण्याजोग्या, परसात लावण्याजोग्या, पाण्याची टंचाई असतांना आणि पडीक भूमीमध्ये अत्यल्प श्रम करून लावता येण्याजोग्या, तसेच चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, अशी ही वर्गवारी केली आहे. या वर्गवारीमुळे हा ग्रंथ अधिक प्रायोगिक बनला आहे.

५. बहुपयोगी औषधी वनस्पतींच्या माहितीचा समावेश !

औषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांसमवेतच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात. ती झाडे घराच्या अवतीभोवती, तसेच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लावल्यास परिसर सुशोभित होतो. पुष्कळ औषधी वनस्पतींची भाजी सुरेख होते. काही औषधी झाडांपासून फळेही मिळतात. काही कंदवर्गीय वनस्पतींचे कंद पोटभरीसाठीही खाता येतात. वृक्षवर्गीय वनस्पतींचा इंधनासाठीही उपयोग होतो. काही वनस्पतींपासून खाण्याचा डिंक, खाण्याचा रंग यांसारखे पदार्थ मिळतात. एकूणच औषधी वनस्पती या बहूपयोगी सिद्ध होतात. अशा सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती या ग्रंथात दिली आहे.

६. पडीक भूमींचा सदुपयोग करण्याविषयीचे उत्कृष्ट मार्गदर्शन असलेला ग्रंथ !

आजकाल सर्वत्रच ‘शेतीकामासाठी कोणी कामगार मिळत नाही आणि मिळाला, तरी त्याची मजूरी परवडत नाही’, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत अत्यल्प श्रमांमध्ये, तसेच न्यूनातिन्यून व्ययामध्ये (कमीत कमी खर्चामध्ये) औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. काहीजणांकडे मोठी भूमी विनावापर पडून असते. या भूमीवर पावसाळ्याच्या दिवसांत औषधी वनस्पतींचे बी टाकल्यास त्यातील काही वनस्पती तरी उगवून येतील. भूमी विनावापर पडीक ठेवण्यापेक्षा अशा भूमीमध्ये थोडेसे प्रयत्न करून बीजारोपण करणे कधीही चांगलेच नाही का ? अशाने पडीक भूमीचा सदुपयोग होऊन तिच्यापासून शेतकर्‍याला उत्पन्नही मिळू शकेल.

७. निसर्गतःच तणस्वरूपात उगवणार्‍या औषधी वनस्पतींविषयी माहिती देणारा ग्रंथ !

काही वनस्पती निसर्गतःच पुष्कळ मोठ्या प्रमाणात उगवत असतात. पावसाळ्यात तणस्वरूपात उगवणार्‍या अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. टाकळा, मोठी नायटी, एकदंडी यांसारख्या वनस्पती, तर आपण प्रतिदिन पहात असतो; पण ‘त्या औषधी वनस्पती आहेत आणि त्यांचा विकार बरे करण्यासाठी उपयोग होऊ शकतो’, हेच आपल्याला ठाऊक नसते. निसर्गामध्ये तण स्वरूपात मोठ्या प्रमाणात उगवणार्‍या वनस्पतींची वेगळी लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आपल्याला अशा वनस्पतींची ओळख होणे आणि त्या आपल्या भोवताली कुठे मिळतात, हे ठाऊक असणे आवश्यक असते. अशा वनस्पतींची माहिती त्यांच्या छायाचित्रासह प्रस्तुत ग्रंथात अंतर्भूत केली आहे.

८. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्याविषयीही मार्गदर्शन !

मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करायची झाल्यास कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ? माती परीक्षण का करतात ? रोपवाटिका कशी बनवावी ? आदी माहिती ग्रंथात वाचायला मिळते. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सेंद्रिय खते आणि कीटकनाशके यांचे विविध पर्याय, तसेच औषधी वनस्पतींपासून मिळणार्‍या उत्पन्नाची काढणी आणि साठवण कशी करावी, याचीही माहिती या ग्रंथात दिली आहे.

९. आध्यात्मिक स्पर्श असलेला ग्रंथ !

नवग्रह, २७ नक्षत्रे, १२ राशी, सप्तर्षि आदींशी संबंधित वनस्पतींचीही माहिती या ग्रंथात दिली आहे. आज अशी उपवने ठिकठिकाणी बनवली जात आहेत. अशा उपवनांच्या निर्मितीमध्ये हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल. औषधी वनस्पतींची लागवड ही केवळ व्यवसाय म्हणून न करता ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास सुयोग्य उत्पन्नासह मनःशांतीही लाभते, हे या ग्रंथात विविध अनुभूतींच्या द्वारे स्पष्ट केले आहे.’

– श्री. प्रशांत सावंत, फळविज्ञान शाखेचे पदवीधर, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात