आध्यात्मिक सोपी कोडी – भाग १

बर्‍याच नियतकालिकांत ‘शब्दकोडी’ असतात. ती बौद्धिक स्तरावरची असतात. ही शब्दकोडी देण्यामागे ‘बुद्धीला चालना मिळणे आणि ज्ञानात भर पडणे’, हा व्यावहारिक दृष्टीकोन असतो. ‘प्रहेलिका’ (कोडी सोडवणे) ही ६४ कलांमधील एक कला आहे. ईश्‍वराचे अस्तित्व जाणून घेऊन त्याच्याशी एकरूप होणे, हा ईश्‍वराने निर्माण केलेल्या या विविध कलांचा मुख्य उद्देश आहे.

जीवन हे देवाने निर्माण केलेले एक कोडे आहे; परंतु ‘ते कशा प्रकारे सोडवायचे ?’, हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपण ज्या वेळी जीवनात येणार्‍या अडचणी, सुख-दुःख यांच्या उत्तरांचा शोध घेऊ लागतो, त्या वेळी लक्षात येते की, या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे साधना ! साधना केल्यावरच कोणत्याही अडचणीमागील कोडे सहज सोडवता येते. ‘प्रहेलिका’ या कलेच्या माध्यमातून हे शिकायला मिळते.

येथे एक मानसिक स्तरावरचे कोडे दिले आहे. सनातन प्रभात आध्यात्मिक नियतकालिक असल्यामुळे लेखमालिकेत आध्यात्मिक स्तरावरील कोडी दिली आहेत. त्यावरून मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील कोडी म्हणजे काय, हे लक्षात येईल. सनातन प्रभात दैनिकात प्रत्येक रविवारी आणि साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक ‘सनातन प्रभात’ यांत प्रत्येक अंकात कोडी देण्यात येत आहेत.

 

१. मानसिक स्तरावरील कोडे –
प.पू. भक्तराज महाराज यांची आकार लहान होत गेलेली छायाचित्रे

१ अ. प्रयोग

1

 

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांवरून नजर मोठ्या छायाचित्राकडून लहान छायाचित्राकडे सावकाश फिरवत प्रत्येक छायाचित्राकडे पाहिल्यावर काय जाणवते, त्याचा अभ्यास करा. असे १ – २ मिनिटे करा.

प्रयोगाचे उत्तर

मोठ्या छायाचित्राकडे पाहून चांगले वाटते. भाव जागृत होतो.

१ इ. विश्‍लेषण

प.पू. भक्तराज महाराज यांचे हे छायाचित्र आहे. ते आपण डोळ्यांनी मानसिक स्तरावर पहातो. जे चांगले छायाचित्र स्पष्ट दिसते, ते आपल्याला अधिक आवडते; म्हणूनच त्यांचे मोठे छायाचित्र आपल्याला पहावेसे वाटते.

 

२. आध्यात्मिक स्तरावरील कोडी

२ अ. अनुभव आणि अनुभूती यांतील भेद

२ अ १. अनुभव : पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या इंद्रियांद्वारे जिवाला येणार्‍या संवेदनांना ‘अनुभव’ म्हणतात. यालाच ‘स्थुलातील कळणे’ असे म्हणतात. उदबत्ती लावलेली असतांना नाकाद्वारे तिचा सुगंध येणे याला ‘अनुभव’ म्हणतात.

२ अ २. अनुभूती : खोलीत उदबत्ती नसतांनाही तिचा सुगंध येणे, याला ‘अनुभूती’ म्हणतात. अनुभूती म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलिकडील अनुभव. पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये, सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी यांद्वारा जीवात्मा आणि शिवात्मा यांना येणार्‍या अनुभवांना ‘अनुभूती’ म्हणतात. यालाच ‘सूक्ष्मातील कळणे’, असेही म्हणतात. एखाद्या अनुभवाच्या मागचा कार्यकारणभाव बुद्धीला न समजल्यास त्यालाही ‘अनुभूती’ म्हणतात, उदा. बाह्य कारणाशिवाय एखादी वस्तू हलतांना स्थूल डोळ्यांना दिसणे. अद्वैताची अनुभूती शिवदशेत येते. अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे. आध्यात्मिक कोड्यांची उत्तरे मिळणे, ही अनुभूती असल्याने या ग्रंथात दिलेल्या कोड्यांच्या उत्तरासाठी बुद्धीने विचार करू नका, तर मनाला काय वाटते, ते अनुभवा.

२ आ. साधनेत प्रगती होईल, तशी कोड्यांची उत्तरे अधिकाधिक योग्य असणे

कोड्यांतील प्रश्‍नांची योग्य उत्तरे मिळण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेने आध्यात्मिक पातळी वाढते, तसे उत्तरे बरोबर येण्याचे प्रमाणही वाढते. उत्तरांचे विश्‍लेषण समजण्यासाठी आध्यात्मिक परिभाषेची माहिती आवश्यक असते. एखाद्याची साधना आहे; पण त्याचा अध्यात्माचा अभ्यास नाही, तर त्याला या लेखात दिलेले उत्तरांचे विश्‍लेषण वाचून अध्यात्माची तात्त्विक माहिती कळू लागेल. बुद्धीप्रामाण्यवादी, म्हणजेच साधना न करणारे यांच्यासाठी ही कोडी नाहीत; कारण त्यांना बुद्धीपलिकडे जाऊन काही अनुभवता येत नाही.

२ इ. अनुभूतींचे प्रकार

अध्यात्मातील सिद्धांतानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्र असतात. विषय सुलभ व्हावा, यासाठी येथे ‘शक्ती’ हा शब्द वापरला असला, तरी तो शक्ती, भाव, चैतन्य, आनंद, आणि शांती या सर्वांच्या संदर्भात वापरला आहे. प्रत्येक रूपात एक प्रकारची शक्ती असते. रूप चांगले असल्यास त्यात चांगली शक्ती आणि वाईट असल्यास त्यात वाईट शक्ती असते. येथे वाईट रूपांचा विचार केलेला नाही, तर चांगल्या रूपांचाच विचार केला आहे. चांगल्या रूपांतही काहींकडे पाहून अधिक चांगले वाटते, काहींकडे पाहून अल्प चांगले वाटते, तर काहींकडे पाहून तुलनेत त्रासदायकही वाटते.

२ ई. कोड्यांचे स्वरूप

कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या पंचज्ञानेंद्रियांपैकी एकेका इंद्रियाला पंचमहाभूतांच्या अनुक्रमे शब्द (नाद), स्पर्श, रूप (दृश्य रूप), रस (चव) आणि गंध (वास) यांचे ज्ञान होते. यांपैकी स्पर्श, रस आणि गंध यांच्या संदर्भातील प्रयोग सनातन प्रभातमध्ये छापील स्वरूपात देता येत नाहीत. केवळ रूप, म्हणजे दृश्य रूप. याच्या संदर्भातील प्रयोग सनातन प्रभातमध्ये छापील स्वरूपात देता येतात. शब्दाच्या, म्हणजे नादाच्या संदर्भातील प्रयोग कसे करायचे, म्हणजे प्रयोग करण्यासाठी कोणता नाद ऐकायचा किंवा त्याचा उच्चार कसा करायचा याची माहिती देण्यात येईल. त्याप्रमाणे वाचकांना नादाचे प्रयोग घरी करता येतील.

२ उ. कोड्यांची उत्तरे बरोबर येणे

१. हे साधनेमुळे आध्यात्मिक स्तर चांगला असल्याचे दर्शक आहे.

२. उत्तरे बरोबर आल्यास आणि या जन्मात साधना करत नसल्यास गेल्या जन्मीच्या साधनेमुळे प्राप्त झालेल्या आध्यात्मिक स्तरामुळे उत्तरे बरोबर येतात.

२ ऊ. कोड्यांची उत्तरे चुकीची येणे

साधना नसल्यामुळे किंवा अल्प असल्यामुळे असे होते. अशांनी साधना करणे किंवा वाढवणे आवश्यक आहे.

२ ए. कोड्यांची उत्तरे शोधतांना काही आकृत्यांकडे पाहून त्रास होतो

कोड्यातील चांगले अंक आणि अक्षरे यांच्याकडे पाहून त्रास झाल्यास ‘वाईट शक्तींचा’ त्रास आहे, असे समजावे आणि उपाय म्हणून साधनेला आरंभ करावा किंवा ती वाढवावी.

२ ऐ. सूक्ष्मातील कळण्यातील पुढचे टप्पे

पुढे दुसर्‍याच्या मनातीलही कळते आणि मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरेही आतून कळतात. त्याही पुढे गेल्यावर काळाच्या पुढे किंवा मागे जाऊन तेव्हाची माहितीही मिळवता येते. याला ‘सहावे ज्ञानेंद्रिय जागृत झाले’, असे म्हणतात.

दैनिक सनातन प्रभातमध्ये यापुढे देण्यात येणार्‍या या अध्यात्मिक कोड्यांमुळे शरीर, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील ज्ञान प्राप्त होण्यास साहाय्य होऊन ‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे’, या सूत्राची ओळख होईल.

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१५)