हस्तरेषा, जन्मकुंडली आणि नाडीभविष्य

1hasta

प्रश्‍न : बरेच नाडीशास्त्राचे जाणकार हाताच्या रेषांवरून भविष्य सांगतात. त्यासंदर्भात पुढील मजकूर वाचून माहिती कळवावी. हस्तरेषा आणि पादरेषा, तसेच जन्मकुंडली या दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की, जन्मवेळ चुकीची असल्यास भविष्य चुकते; मात्र हाताच्या रेषा प्रत्यक्ष दिसतात. त्यामुळे त्यावरून सांगितलेले भविष्य चुकण्याची शक्यता कमी असते का ?; मात्र रेषा पालटत असल्यामुळे पुढचे भविष्य सांगता येते का ?

उत्तर

१. हस्तरेषांपेक्षा जन्मकुंडली अधिक महत्त्वाची ! : रेषांप्रमाणे जन्मकुंडलीमध्येही पालट होतो. जन्मवेळेच्या मूळ कुंडलीत (जन्मलग्नकुंडलीत) पालट होत नाही. जसे हाता-पायांवरील रेषा काही वर्षांनी पालटतात, तसेच गोचर कुंडलीत (तात्कालिक कुंडलीत) पालट होतो. हाता-पायांवरील रेषांवरून प्रत्यक्ष कोणत्या वेळेत एखादी घटना घडली ?, हे सांगण्यासाठी ते सांगणार्‍या व्यक्तीची साधना आणि तिचा हस्तशास्त्राचा भरपूर अभ्यास असणे आवश्यक असते. असे असले, तरीही घडणार्‍या घटनेची अचूक वेळ वर्तवणे कठीण होते. केवळ हातावरील रेषा पाहून घटनांचा काळ, दिवस तर नाहीच; परंतु घटनेचा मासही (महिनाही) अचूक येत नाही. ज्याप्रमाणे कुंडली घटनांच्या कालनिर्णयासहित ठळक मार्गदर्शन करू शकते, त्याप्रमाणे हाता-पायांवरील रेषा पाहून मार्गदर्शन करता येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य ८५ वर्षे दर्शवणार्‍या आयुष्यरेषेवर एक बिंदू कित्येक वर्षांच्या घटना कोरून ठेवतो. अशा वेळी आयुष्यात संभवणार्‍या एखाद्या घटनेचा कालावधी सांगणे कठीण असते. सूक्ष्म कालनिर्णयासाठी हस्तसामुद्रिक शास्त्र अपूर्ण ठरते. गोचर कुंडलीवरून ग्रहांची अवस्था, ग्रहांचे विविध योग, ग्रहांची महादशा, त्यातील अंतर्दशा, अंतर्दशेमधील विदशा असा सखोल गणिती अभ्यास करणे हस्तरेषेच्या तुलनेत सुलभ जाते. यासाठीही साधनेची आवश्यकता आहे. अन्यथा गणिते चुकू शकतात, उदा. एखाद्या रुग्णाईत व्यक्तीला मुख्य व्याधीसहित इतर कोणत्या व्याधी असण्याची शक्यता आहे ? रुग्णाईत व्याधीमुक्त होणार का ? केव्हा होणार ? कोणत्या ग्रहाच्या त्रासामुळे रुग्णाईत आहे ?, याचा बोध व्यक्तीची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली यांवरून होतो. हस्तरेषेवरून अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे अवघड ठरते. यासाठी रेषांपेक्षा जन्मकुंडली महत्त्वाची ठरते. आणखी सुलभ उदाहरण द्यायचे झाल्यास उद्या एखादी मुलाखत आहे. त्यात माझी निवड होईल का ? उद्या होणारे महत्त्वाचे कार्य होईल का ?, अशा सर्व प्रश्‍नातील उद्या हातांवरील रेषांवरून शोधता येणे अशक्य आहे. यावरून हस्तरेषांपेक्षा जन्मकुंडली अधिक महत्त्वाची आहे. – सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०१६)

२. हाताच्या अंगठ्यावरील रेषा शक्यतो पालटत नसल्याने त्यांवरून महर्षींनी नाडीभविष्य लिहिलेले असणे, नाडीभविष्यात व्यक्तीचे स्थळ, काळ, जन्मकुंडली इत्यादी वर्तमानातील माहिती जुळवली जाऊन तिचे पुढील भविष्य सांगितलेले असणे; पण ते सांगता येण्यासाठीही नाडीवाचकाची तेवढी साधना असणे आवश्यक असणे

kundali

२ अ. हाताच्या अंगठ्यावरील रेषा शक्यतो पालटत नाहीत; म्हणून बर्‍याच नाडीशास्त्रकारांनी भविष्य सांगण्यासाठी संपूर्ण हाताच्या रेषांपेक्षा अंगठ्यावरील रेषांना अधिक महत्त्व देणे : बरेच नाडीशास्त्रकार भविष्य सांगण्यासाठी संपूर्ण हाताच्या रेषांपेक्षा अंगठ्यावरील रेषांना अधिक महत्त्व देतात; कारण वयाच्या १६ व्या वर्षानंतर हातावरील रेषा पालटतात; परंतु अंगठ्यावरील रेषा पालटत नाहीत; म्हणून पोलीस खात्यात किंवा ठिकठिकाणी अंगठ्याचा ठसा घेण्याचीच पद्धत आहे.

२ आ. डोळ्यांच्या आकारातही एकेका वर्षाने पालट होत असणे : डोळ्यांतही एकेका वर्षाने पालट होत असतो. वयाच्या २१ व्या वर्षानंतर डोळ्यांचा नंबर स्थिर होतो; म्हणूनच डोळ्यांत लेन्स (भिंग) लावतांना आधुनिक वैद्य वयाच्या २१ व्या वर्षानंतर हा निर्णय घेतात.

२ इ. नाडीशास्त्रात अंगठ्याच्या रेखांच्या प्रकाराचे प्रमुख १२ भाग असणे आणि त्यांतही एकूण १०८ उपभाग केलेले असणे : नाडीशास्त्रात अंगठ्याच्या रेखांच्या प्रकारांचे प्रमुख १२ भाग केले आहेत. त्यांत एकूण १०८ उपभाग आहेत. त्यातलाच एक प्रकार आहे, कमलरेखा. यातील अंगठ्याचे प्रकार दर्शवतांना तमिळ शब्दांचा उपयोग केला आहे.

२ ई. दैवी व्यक्तींच्या हातावर कमलरेखा असणे : कमलरेखा सामान्य व्यक्तींमध्ये नसते. ज्या व्यक्तीमुळे इतरांचे कल्याण होणार आहे, अशा व्यक्तींच्या हाताच्या अंगठ्यावर कमलरेखा असते. देव स्वतः न येता, अशा व्यक्तींना भूतलावर पाठवतो. त्यांच्या हातावर अशी रेखा असते.

२ उ. नाडीशास्त्राचे महत्त्व

२ उ १. नाडीशास्त्रात तुम्ही कोणत्या वेळेत नाडीवाचकाकडे आलात तो दिवस, ते ठिकाण आणि वेळ सांगून, म्हणजेच वर्तमानातील स्थळ आणि काळ जुळवून, शिवाय जन्मकुंडली सांगून भविष्यकथन केले जाणे : नाडीशास्त्रात केवळ हस्तरेषाच नाही, तर तुमची जन्मकुंडलीही त्याबरोबर जुळवली जाते, तसेच तुमची इतर सर्व कौटुंबिक माहितीही जुळवली जाऊन तुम्हीच ते आहात, हे निश्‍चित केले जाते. इतकेच नव्हे, तर तुमच्या हस्तरेषा आणि तुम्ही नाडीवाचकाकडे आलेली वेळ यांचेही योग्य गणित बांधलेले असते. नाडीशास्त्रात सिद्ध महर्षींनी स्थळाबरोबर काळालाही तेवढेच महत्त्व दिले आहे. काही महिन्यांनी तुम्ही परत नाडीवाचकाकडे आलात, तर तुमचे वर्तमानातील भविष्यही महर्षींनी त्यात लिहून ठेवलेले असते. म्हणजे तुमच्या अंगठ्याच्या रेषेत काही सूक्ष्म पालट झाले असतील, तर महर्षींनी त्या पालटानुसार तुमच्या भविष्याची कालगतीही ओळखून तुम्हाला त्यात मार्गदर्शन केलेले असते. नाडीशास्त्रात जन्मकुंडली, हस्तरेषा, स्थळ, काळ, तुमची रास, नक्षत्र या माहितीबरोबरच तुम्ही नाडीशास्त्र सांगणार्‍याकडे कधी येणार ? तुमच्याबरोबर किती माणसे असणार ? यांचाही उल्लेख केलेला असतो.

२ उ २. कधीकधी महर्षींनी तुमची जन्मवेळ चुकली असल्यास योग्य जन्मवेळही लक्षात आणून देणे : महर्षि कधीकधी तुमची जन्मवेळ चुकली असेल, तर तुमची योग्य जन्मवेळ कोणती ?, हे सांगून त्यानुसारही भविष्य कथन करतात; परंतु हे सर्व जाणायला महर्षींसारखेच सिद्धच हवेत. अन्यथा भविष्य सांगणार्‍याचे भविष्य चुकू शकते.

२ ऊ. तात्पर्य : नाडीशास्त्रात सांगितलेले सांकेतिक शब्द किंवा महर्षि एखाद्या वाक्यातून त्या व्यक्तीला काय सांगू इच्छितात, हे ओळखण्यासाठीही नाडीवाचकाची तेवढी साधना हवी ! : नाडीशास्त्रात सांगितलेले सांकेतिक शब्द किंवा महर्षि एखाद्या वाक्यातून त्या व्यक्तीला काय सांगू इच्छितात, हे ओळखण्यासाठीही नाडीवाचकाची तेवढी साधना हवी. केवळ पैशांसाठी भविष्य सांगणारे व्यक्तीच्या भविष्याचे योग्य अनुमान लावू शकत नाहीत. नाडीवाचन करणे, ही एक साधना आहे. महर्षि ठराविक उपासनेनंतरच तुम्हाला नाडीवाचन करण्याची अनुमती देतात. त्याचेही पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा योग्य तर्‍हेने नाडीवाचन होऊ शकत नाही. ठराविक संख्येने जप करणे, घरातील कुलाचाराचे पालन करणे, नित्य देवदर्शनाला जाणे, असे काही नियम परंपरेने नाडीवाचन करणार्‍या घरांमध्ये चालत आलेले असतात. त्यांचेही पालन करणे आवश्यक असते. नाहीतर व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करणे नाडीवाचकाला कठीण होऊन जाते. – (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तंजावर, तमिळनाडू. (२४.६.२०१६, सकाळी ८.४५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात