दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया आणि दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे

Article also available in :

या लेखात आपण ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?’, ‘दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया’ आणि ‘दृष्ट लागण्याचे परिणाम किंवा दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे’, या सूत्रांविषयी माहिती पहाणार आहोत.

१. ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?

अ. एखाद्या व्यक्तीच्या रज-तमात्मक इच्छेचा दुसऱ्या व्यक्तीवर होणारा दुष्परिणाम म्हणजेच दृष्ट लागणे.

याचे एक उदाहरण म्हणजे, बाळाला दृष्ट लागणे. हसऱ्या किंवा गोंडस बाळाला पहाणाऱ्या काही जणांच्या मनात नकळत एक प्रकारचे आसक्तीयुक्त विचार येतात. आसक्तीयुक्त विचार हे रज-तमात्मक असतात. बाळाचा सूक्ष्मदेह हा अती संवेदनशील असल्यामुळे त्याच्यावर या रज-तमात्मक स्पंदनांचा अनिष्ट परिणाम होतो, म्हणजेच बाळाला दृष्ट लागते.

आ. काही वेळा एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांविषयी एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या वाईट शक्तीच्या मनात वाईट विचार येतात किंवा त्यांचे चांगले झाल्याचे तिला बघवत नाही. यांमुळे निर्माण होणाऱ्या वाईट स्पंदनांचा ती व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांच्यावर परिणाम होणे, याला `दृष्ट लागणे’ असे म्हणतात.

एखाद्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीविषयी तीव्र मत्सर किंवा द्वेषयुक्त विचारांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर त्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीला तीव्र प्रमाणात दृष्ट लागू शकते. या दृष्टीच्या प्रक्रियेत त्या दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक स्तरापेक्षा मानसिक स्तरावर त्रास होण्याचे प्रमाण अधिक असते. याला ‘सूक्ष्म-स्तरावर तीव्र प्रमाणात दृष्ट लागणे’, असे म्हणतात.

इ. अघोरी विधी करणाऱ्याकडून एखाद्या व्यक्तीवर करणी करण्यासारखा विधी करून घेतल्यानेही त्या व्यक्तीला दृष्ट लागते.

करणीची वैशिष्ट्ये :

  •  करणी एका विशिष्ट उद्दिष्टाला धरून केली जाते.
  • दृष्ट लागण्यात एखाद्या व्यक्तीची कपटी वासना ३० टक्के इतक्या प्रमाणात तीव्र असते, तर करणी होण्यात हीच दुष्ट वासना ३० टक्क्यांच्याही पुढे जाऊन ऊग्र रूप धारण करू शकते.
  • दृष्टीची स्पंदने ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात त्रासदायक स्वरूपात कार्य करू लागली की, त्यांचे रूपांतर करणीसदृश घटनेत होते.

ई. वाईट शक्तींनी सोडलेल्या त्रासदायक शक्तीमुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होणे, यालाही ‘ व्यक्तीला त्या वाईट शक्तीची दृष्ट लागली’, असे म्हणतात.

 

२. दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया

drushta_shukshma

 

३. दृष्ट लागण्याचे परिणाम किंवा
दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे

अ. स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांच्या संदर्भातील काही लक्षणे

`दृष्ट लागणे’, या प्रकारात ज्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल, त्याच्या भोवती रजतमात्मक इच्छाधारी स्पंदनांचे वातावरण बनवले जाते. हे वातावरण रज-तमात्मक नादलहरींनी भारित असल्याने याच्या स्पर्शाने त्या व्यक्तीचा स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

स्थूलदेह

ज्या वेळी स्थूलदेह रज-तमात्मक इच्छाधारी लहरींनी भारित होतो, त्या वेळी ती व्यक्ती अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. शारीरिक व्याधींमध्ये तीव्र डोकेदुखी, कान ठणकणे, डोळे दुखणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायांना मुंग्या येणे, छातीत धडधडणे, हात-पाय गार पडून गळून जाणे इत्यादी त्रास होतात. अशी लक्षणे दिसल्यावर त्वरित दृष्ट काढली असता संबंधित त्रासाच्या प्रमाणात घट होते.

मनोदेह

ज्या वेळी रज-तमात्मक इच्छाधारी लहरींची शक्ती प्रबळ होऊन वेगाने कार्य करू लागते, त्या वेळी या लहरींचे संक्रमण व्यक्तीच्या मनोदेहावर आपला प्रभाव दर्शवते. मनोदेहाच्या रज-तमात्मक धारणेमुळे मनात अनावश्यक विचार आणि विकल्प येणे, त्यामुळे घरात भांडणे होणे, तसेच या विचारांच्या प्रभावाखाली कार्य केल्याने त्यांची धाव मारामारी होण्यापर्यंत जाणे, विचार आल्यावर अचानक घर सोडून निघून जाणे, तसेच वेगाने गाडी चालवल्याने अपघात होणे अशा घटनांचा यांत समावेश होतो.

सूक्ष्मदेह

कालांतराने सूक्ष्मदेहही या लहरींनी प्रभावित होऊ लागला, तर प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

आ. काही समस्याप्रधान लक्षणे

• शारीरिक समस्या : व्यसन, सतत रुग्णाईत (आजारी) होणे, औषधे घेऊनही साधे साधे आजार (उदा. ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी) बरे न होणे, कोणतेही शारीरिक कारण नसतांना पुष्कळ दिवस थकवा असणे किंवा शरीर कृश होणे, वारंवार उद्भवणारे त्वचेचे विकार इत्यादी.

मानसिक समस्या : सतत तणाव आणि निराशा, अती भित्रेपणा, अकारण मनात नकारात्मक विचार येऊन मन अस्वस्थ होणे इत्यादी.

• शैक्षणिक समस्या : चांगला अभ्यास करूनही परीक्षेत उत्तीर्ण न होणे, बुद्धीमत्ता असूनही वाचलेले न आठवणे इत्यादी.

• आर्थिक समस्या : नोकरी न लागणे, व्यवसाय न चालणे, सतत आर्थिक हानी होणे किंवा फसवणूक होणे इत्यादी.

• वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या : विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मूल अपुऱ्या दिवसांचे जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे इत्यादी.

संदर्भ :  सनातन-निर्मित ग्रंथ ‘दृष्ट काढण्याचे प्रकार (भाग १)’