दृष्ट काढण्याचे महत्त्व

Article also available in :

सध्याच्या स्पर्धात्मक आणि भोगवादी युगात ईर्षा, द्वेषभाव, लोकेषणा, यांसारख्या विकृतींनी बहुतांश व्यक्ती ग्रासलेल्या आहेत. या विकृतीजन्य रज-तमात्मक स्पंदनांचा त्रासदायक परिणाम सूक्ष्मातून नकळत दुसऱ्या व्यक्तींवर होतो. यालाच त्या व्यक्तींना ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात. दृष्ट लागल्यावर त्यावर ‘दृष्ट काढणे’ या आध्यात्मिक उपायसदृश प्रक्रियेविषयी जाणून घेऊ. या लेखात आपण कलियुगात व्यक्तीला दृष्ट लागण्याचे प्रमाण जास्त का असते ?, दृष्ट काढण्याचे महत्त्व आणि तो का करावा ? यांविषयी माहिती पाहू.

drushta_naral

 

कलियुगात जिवाला दृष्ट लागण्याचे प्रमाण जास्त का असते ?

कलियुग हे तमोगुणी संस्कारांनी व्यापलेले आहे. बहुतेक व्यक्ती साधना आणि आध्यात्मिक उपायांविना जीवन व्यतीत करतात. त्यामुळे ते या जन्मात स्वतःचीच अत्यंत हानी करून घेऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात.

प्रत्येक मनुष्यात षड्रिपूंचे प्रमाण त्याच्या कर्मप्रारब्धाप्रमाणे अधिक-उणे (कमी-जास्त) असते. कलियुगात मनुष्याचे षड्रिपूंच्या प्रमाणात कार्य करण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याला दुसऱ्यांविषयी ईर्षा, अनेक गोष्टींविषयी अपेक्षा आणि आसक्ती असते. कलियुगातील मनुष्याचे मन ७० टक्के विकल्पाने भरलेले असते. त्यामुळे त्याच्या मनात येणारा आणि मनातून बाहेर पडणारा प्रत्येक विचार तमोगुणी असतो.

या तमोगुणामुळे निर्माण होणाऱ्या क्रोध, द्वेष, मत्सर यांसारख्या दोषांचा परिणाम दुसऱ्यावर होऊन ज्याच्याविषयी आपल्याला वासनाजन्यरूपी आसक्तीदर्शक रज-तमात्मक विचार येतात, त्या विचारांच्या तीव्रतेप्रमाणे समोरच्या व्यक्तीला दृष्ट लागण्याचे प्रमाण असते.

कलियुगातील वायूमंडलच तमोगुणी विचारांनी ग्रासलेले असल्याने प्रत्येक व्यक्तीला कोणाची तरी दृष्ट लागतच असते. त्यासाठी व्यक्तीने साधना करून स्वतःभोवतीचे वायूमंडल सतत शुद्ध ठेवणे अन् त्यातूनच श्वास घेऊन ईश्वराच्या चैतन्यलहरींचा अपेक्षित लाभ करून घेणे इष्ट ठरते.

कलियुगात दृष्ट काढण्याचे महत्त्व

आध्यात्मिक उपायांमधील प्रक्रियेचा एक भाग म्हणून दृष्ट काढणे, ही पद्धत अवलंबिली असता, स्थूलदेहावर, तसेच मनोदेहावर आलेले रज-तमात्मक आवरण दूर होऊन व्यक्तीचे जीवनमान उंचावू शकते.

दृष्ट काढण्याच्या अनेक पद्धती आणि त्यांविषयीचे शास्त्र आहे. बुद्धीजीवी व्यक्तींना हे सर्व पटणारे नसले, तरी ते एक शाश्वत सत्य आहे. त्याला आपल्याला स्वीकारावेच लागेल. कलियुगात मोठ्या संख्येने वावरणाऱ्या वाईट शक्तींपासून पावलापावलावर धोका आहे, हे ओळखूनच आपले जीवन व्यतीत करायला हवे.

दृष्ट काढण्यामुळे देहावरील रज-तमात्मक आवरण वेळोवेळी दूर झाल्याने व्यक्तीच्या देहातील मनःशक्ती सबल होऊन कार्य करू लागते. यामुळे कार्यात विघ्न न येता, ते कर्मासहित पूर्ण करता येते. दृष्टाळलेल्या व्यक्तीच्या देहात घनीभूत झालेली रज-तमात्मक स्पंदने अधिक काळ तिच्या देहात राहिली, तर त्यापासून तिला धोका उद्भवू शकतो; कारण या स्पंदनांच्या माध्यमातून वाईट शक्तीचा तिच्या देहात शिरकाव होऊ शकतो.

शारीरिक व्याधी मनुष्याच्या मृत्यूनंतर संपतात; परंतु आध्यात्मिक व्याधी मात्र जन्मोजन्म तशाच चालू रहातात. या व्याधींना तीव्र साधनेने, तसेच वेळोवेळी दृष्ट काढणे आणि अन्य आध्यात्मिक उपाय करणे, या माध्यमांतून दूर करावे लागते. तरच कलियुगातील मनुष्य जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळवू शकतो.

‘दृष्ट काढणे’ हा सोपा घरगुती आध्यात्मिक उपाय का करावा ?

बाळाला काजळाची तीट लावण्याचा संस्कार आजही समाजात जपला जातो. जुन्याजाणत्या स्त्रिया आलेल्या पाहुण्यावरून लिंबलोण आजही उतरवतात. परंपरा जेव्हा शतकानुशतके जपल्या जातात, तेव्हा त्यांमागे निश्चित काहीतरी शास्त्र असते, हे आपण समजून घ्यायला हवे.

कुटुंबात भांडणे, व्याधी, आर्थिक चणचण, वाईट स्वप्ने पडणे, नैराश्य, सिगारेट किंवा मद्य यांचे व्यसन यांसारख्या समस्या आता नित्याच्या झाल्या आहेत आणि या समस्यांच्या मागे दृष्ट लागणे हेही एक कारण असू शकते. जीवनातील ८० टक्के समस्यांमागील कारणे सकृद्दर्शनी स्थुलातील दिसत असली, तरी खरे मूळ कारण हे सूक्ष्मातील, म्हणजेच वाईट शक्तींचा त्रास, हे असते. वाईट शक्तींचा त्रास हाही दृष्ट लागण्याचाच प्रकार होय.

थोडक्यात, जीवन समस्यांविरहित आणि आनंदी बनवायचे असेल, तर ‘दृष्ट काढणे’ हा सोपा घरगुती आध्यात्मिक उपाय अवलंबणे केव्हाही उपयुक्त ठरते. दृष्ट काढण्याचे महत्त्व लक्षात घेऊन अधिकाधिक जणांनी दृष्ट काढून स्वतःभोवती निर्माण झालेले त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करावे आणि साधनेने ब्रह्मांडातील ईश्वरी लहरींचा लाभ करून घ्यावा.

संदर्भ :  सनातन-निर्मित ग्रंथ ‘दृष्ट काढण्याचे प्रकार (भाग १)’