पूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे कलियुगात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारे प.पू. डॉक्टर !

PP_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

सप्तर्षींनी सर्वांसाठी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदं प्रमाणं । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।, हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे आपल्यावर निसर्गाची कृपा होणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झाले आहेत. ते आपल्याला नेहमी चैतन्याची महती सांगतात. त्या दृष्टीने ते साधकांद्वारे चैतन्यवृद्धीसाठी प्रयत्न करून घेत आहेत. तेव्हा धर्माचरण करून त्या गुरुमंत्राद्वारे व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यासच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल अन् आजची परिस्थिती पालटून रामराज्य अनुभवता येईल.महर्षींच्या सांगण्यानुसार गायत्री मंत्र हा गुरुमंत्र आहे. ते वाणीतील तेजतत्त्व आहे. त्यामुळे बुद्धी प्रकाशमय होते. गायत्री मंत्राची शक्ती काळानुसार निसर्गामध्ये आली. तो निसर्ग वेदांनी मान्य केला. त्याला गुरुमंत्राद्वारा सर्वत्र कार्यरत करायचे आहे.

१. भगवान श्रीकृष्णाने संकर्षण तत्त्वातून ब्रह्माची निर्मिती करणे आणि त्याच्या मुखातून मधुकशा नावाची ब्रह्मशक्ती प्रसृत होणे

भगवान श्रीकृष्णाला सृष्टीनिर्मितीची इच्छा झाली. त्यासाठी त्याने आपल्या चैतन्याच्या अंशाद्वारे संकर्षण(अहंकार) तत्त्वातून नारायणाद्वारे ब्रह्माची निर्मिती केली. त्याने ब्रह्माला आपल्या मुरलीच्या ध्वनीद्वारे गायत्री मंत्राचे प्रबोधन केले. ते त्याने श्रवण करून आपल्या मुखातून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या वेदांद्वारे (या त्रयींद्वारे) प्रगट केले. ही जी चैतन्यशक्ती, म्हणजेच ब्रह्मशक्ती प्रसृत झाली, तिलाच मधुकशा असे म्हणतात. (संदर्भ : श्रीश्री ब्रह्मसंहिता)

२. ब्रह्मशक्ती निसर्गात विविध स्वरूपातून कार्य करत असणे

वेदांमध्ये वर्णिले आहे की, ही ब्रह्मशक्ती निसर्गात विविध स्वरूपातून कार्य करत आहे, उदा. सत्पुरुष, संत,साधू, ब्राह्मण, धर्माचरणी राजा, गाय-बैल, धान्य, जव, मधु, वृक्ष, पर्वत, नद्या, ज्ञान आणि बलयुक्त चैतन्य वाणी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, विद्युत्, पर्वत, मनोहारी दृश्य, औषधी, मेघ, गाय, दूध, दही, तूप, अश्‍व, गुरु,वीर्यशक्ती, आत्मशक्ती, ब्राह्मतेज, क्षात्रतेज, हृदयातील सोमरस, मेधा, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश,सागर इत्यादींमध्ये विलसत आहे. (यावरून सध्या महर्षींनी निसर्गदेव आणि वेद यांविषयी जो मंत्रजप दिला आहे. त्यात निसर्गात देव कसा आहे ? त्यात चैतन्यशक्ती कशी भरून उरली आहे आणि वेदांनीसुद्धा हेच कसे सांगितले आहे ?, हे लक्षात येते.) (संदर्भ : अथर्ववेदातील कांड ९, सूक्त १, मधील ऋचा १ ते २४)

३. ऋषिमुनींनी समाजात सात्त्विकता निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न

३ अ. ऋषिमुनींनी केलेल्या यज्ञांमुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण
निर्माण होऊन मानवाची मनोवृत्ती सत्कार्य करण्याकडे लागणे

त्या चैतन्यशक्तीला ऋषींनी यज्ञाद्वारे सर्व सृष्टीमध्ये उजाळा दिला. त्यामुळे विविध माध्यमांतून ती शक्ती प्रसृत होऊन त्याद्वारे सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. साहजिकच त्यामुळे मानवाची मनोवृत्ती सत्कार्य करण्याकडे लागली. आपल्या हातून पापकर्म होऊ नये, यासाठी ते काळजी घेत.

३ आ. चातुर्मासात ऋषींनी धर्मप्रसाराचे कार्य
केल्याने प्रजा सात्त्विक आणि धर्माचरणी होणे

निसर्गात अधिक चैतन्य मिळण्यासाठी भगवंत १२ मासांमधील (महिन्यांमधील) चार मास (महिने) शयन करतो(समाधी अवस्थेत असतो.), असे धर्मशास्त्र सांगते. या कालावधीत, म्हणजे चातुर्मासात ऋषींनी भागवत,पुराण यांद्वारे सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य केले. त्यामुळे प्रजा सात्त्विक आणि धर्माचरणी झाली.

३ इ. गुरुकुलाद्वारे सर्वांना धर्मशिक्षण दिले जात असल्याने प्रजा सुबुद्ध असणे

गायत्री मंत्र हा गुरुमंत्रच आहे.पूर्वी गुरुकुलाद्वारे सर्वांना धर्मशिक्षण दिले जाई. क्षात्रतेेजाचे महत्त्वही प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवले जाई.त्यामुळे प्रजा सुबुद्ध आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी समर्थ असे.

३ ई. आश्रमपद्धतीमुळे धर्मप्रसाराचे कार्य सुलभतेने होणे

आश्रमपद्धतीमुळे समाजात सर्वत्र सहज सुलभतेने धर्मप्रसाराचे कार्य होत असे. व्यक्ती धर्माचरण करून समष्टी साधनाही करत असे. त्यामुळे तिचेही कल्याण होत असे.

३ उ. तीर्थयात्रा

तीर्थयात्रेच्या वेळी साधू-संतांच्या भेटीमुळे मानवाला चैतन्य प्राप्त होत असे. त्याच्या मनात गुरुप्राप्तीची ओढ निर्माण होऊन गुरुप्राप्तीद्वारे तो आपल्या जीवनाचे सार्थक करून घेत असे.

३ ऊ. दानधर्म

दानधर्मामुळे समाजात दुर्बलता नव्हती. वर्णाश्रमामुळे प्रत्येक वर्ण आपले कार्य धर्माचरणाने करत असे. त्यामुळे समाज सर्व दृष्टींनी समृद्ध असे. साहजिकच राष्ट्र हे धर्माप्रमाणे चालत असल्यामुळे ते संपन्न होते.

४. स्वातंत्र्यपूर्व काळात धर्माचरणामुळे झालेला लाभ आणि स्वातंत्र्यानंतर पाश्‍चात्त्य संस्कृती अन् विज्ञान यांच्या प्रभावामुळे चैतन्याचा झालेला लोप, तसेच वाढलेली विकृती

धर्माचरणामुळेच पुढे मुसलमानांच्या स्वार्‍या आणि त्यांचे अधिपत्य, तसेच इंग्रजांचे अधिपत्य आले, तरी त्याचा प्रभाव अधिक काळ टिकू शकला नाही आणि चैतन्याची हानी झाली नाही; परंतु स्वातंत्र्यानंतर हळूहळू पाश्‍चात्त्य संस्कृती अन् विज्ञान यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रभावामुळे रज-तमाचे प्राबल्य वाढले.त्यामुळे चैतन्याचा लोप होणे चालू झाले, उदा. गावात नांगरांऐवजी ट्रॅक्टर आले. त्यामुळे गाय आणि बैल यांची आवश्यकता उणावत गेली. त्यांना कसायाकडे देण्यात येत आहे. पिकांसाठी लागणारे बीज हे आता हायब्रिड झाल्यामुळे त्यातील मूळ सत्त्व नाहीसे झाले. शेणखताऐवजी आता रासायनिक खते आली आहेत.त्यामुळे भूमी नापीक होत आहे. एकूण भूमीचा आणि धान्यातील कस नाहीसा झाला आहे. वृक्षतोड आणि पर्वतांचे उत्खनन, तसेच नदी-नाले प्रदूषणयुक्त झाले आहेत. हवासुद्धा प्रदूषणयुक्त झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे रज-तमाचा प्रभाव वाढला आहे. चैतन्य प्रसृत करणारी भगवंताने निर्मिलेली सर्व माध्यमेच नाहीशी होत चालल्याने त्याचा परिणाम मानवाच्या मानसिक स्थितीवर होऊन तो दुःखी झाला आहे.भ्रष्टाचार, बलात्कार, हेवे-दावे, नापिकी अशा प्रकारची विकृती वाढली आहे. आता परत चैतन्ययुक्त वातावरण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

५. मानवाकडून अधर्माचरण झाल्यावर मृत्यूनंतर त्याची होणारी गती

गरुडपुराणात सांगितले आहे, जेव्हा मानवाकडून अधर्माचरण होते, तेव्हा त्याच्या हातून पाप घडते आणि त्या पापामुळे त्याला मृत्यूनंतर यमलोकात अनंत यातना भोगाव्या लागतात. एवढेच नव्हे, तर त्याला पुढे मानव जन्म मिळाला, तरी तो अशा नीच स्थितीत मिळतो की, ज्यामुळे त्याला मानव जन्म मिळूनही यातना भोगाव्या लागतात.

६. आईच्या उदरात असलेल्या जिवाने भगवंताला त्याचे स्मरण करून स्वतःचा उद्धार करण्याचे वचन देणे,उदरातून बाहेर आल्यावर त्याने देवाला दिलेले वचन विसरणे आणि पूर्वपुण्याईने गुरुप्राप्ती झाल्यावर गुरूंनी त्याचा उद्धार करणे

जीव जेव्हा आईच्या उदरात असतो, तेव्हा त्या यातनेतून मुक्त होण्यासाठी तो भगवंताला प्रार्थना करत असतो, हे देवा, मला या यातनांमधून मुक्त कर. मी येथून बाहेर आल्यावर तुझे सतत स्मरण करून गुरुकृपेद्वारे माझा उद्धार करून घेईन. परंतु तो जेव्हा आईच्या उदरातून बाहेर पडतो, तेव्हा मायेच्या आवरणाने बद्ध होऊन देवाला दिलेले वचन विसरून जातो. त्यानंतर त्याचे माता-पिता, नातेवाईक आणि समाज यांपैकी कुणीच त्याला त्याने भगवंताला दिलेल्या वचनांची जाणीव करून देत नाही. त्यामुळे तो मायेच्या आवरणात गुरफटून जातो; मात्र जेव्हा त्याच्या पूर्वपुण्याईने त्यास गुरुप्राप्ती होते, तेव्हा गुरु त्याला योग्य साधना सांगून त्याचा उद्धार करतात.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले आजच्या विकृतीजन्य परिस्थितीला पालटण्यासाठी प्रयत्नरत असणे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात साधकांनी आपले झोकून देऊन स्वतःचा उद्धार करून घेणे आवश्यक असणे

आज अशा या कठीण काळात रज-तमाच्या आवरणात आपल्याला अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले गुरु म्हणून लाभले आहते. सध्या परात्पर गुरु डॉ. आठवले अशा या विकृतीजन्य परिस्थितीला पालटण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ते सध्या धर्माचरणाचे महत्त्व सनातन प्रभात या नियतकालिकांमधून आणि संकेतस्थळे, जाहीर सभा, संमेलने यांद्वारे सर्वांना सांगत आहे. त्याचा परिणाम बर्‍याच जणांवर होत आहे.त्यामुळेच आज सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणारे ६८ साधक संतपदी विराजमान झाले आहेत आणि ९३४ हून अधिक साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचा टप्पा ओलांडला आहे. त्यांच्या या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला समाजातील संत-महात्मे सहकार्य करत आहेत. एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष सप्तर्षींकडून जीवनाडीद्वारे कार्याला दिशा मिळत आहे. हे सर्व प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच आकर्षण शक्तीमुळेच होत आहे. श्रीकृष्णाचा अर्थही तोच आहे. (कृष्ण = कृष् + ण, कृष् = आकर्षून घेणे, ण = आनंद देणे.) अशा प्रकारे ते साधना करणार्‍या सर्वांना आकर्षून घेऊन त्यांना साधनेतील पुढील टप्प्याला नेत आनंद देत आहेत. त्यांच्या नियोजनाप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे; परंतु प्रत्येक साधकाने यात सहभागी होऊन आपले सर्वस्व अर्पून स्वतःचा उद्धार करून घेणे, एवढेच कार्य उरले आहे.

– प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.४.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात