अग्निहोत्राचे साधनेच्या दृष्टीकोनातून असलेले महत्त्व

या लेखात आपण अग्निहोत्राचे साधनेच्या दृष्टीकोनातून असलेले महत्त्व, अग्नीचे महत्त्व, अग्निहोत्राची व्याख्या, अग्निहोत्राचे प्रवर्तक, अग्निहोत्राचे महत्त्व आणि अग्निहोत्राचा लाभ या विषयांवरील माहिती पहाणार आहोत.

अग्निहोत्राचे साधनेच्या दृष्टीकोनातून असलेले महत्त्व

अग्निहोत्रात अग्नीत दिल्या जाणाऱ्या मंत्रयुक्त आहुतीच्या साहाय्याने नित्यनैमित्तिक कर्माच्या स्तरावर ‘प्रजापती, इंद्र, तसेच अग्नी आणि सूर्य यांच्या आशीर्वादात्मक साक्षीने ते ते कर्म भावपूर्णरित्या अर्पण केले जाते. अग्नी हा स्वतःच तेजोभूत असून तो जिवाच्या स्थूल आशा-आकांक्षांना स्वतःत सामावून घेणारा असल्याने अग्निहोत्र-साधनेने जिवाची स्थूलदेहापासून सूक्ष्मदेहापर्यंत शुद्धी होऊन कालांतराने त्याला अग्नीच्या साहाय्याने देवतांच्या साकारभानात लुप्त होऊन देहबुद्धीच्या पलीकडे, म्हणजेच विश्वाला व्यापून उरलेल्या परमात्म्याच्या अंशात विलीन होता येते. अग्निहोत्र हा यज्ञ बंधन्मुक्त आहे.

१. अग्नीचे महत्त्व

अ. अग्नी सर्व देवतांचे साकारभान आहे.

आ. अग्नी म्हणजे ईश्वरी शक्तीचे आवाहन करणारा ऋत्विज

‘अग्नीला वेदांनी ‘दिव्य होता’, असे म्हटले आहे. ‘होता’ म्हणजे ईश्वरी शक्तीचे आवाहन करणारा ऋत्विज . अग्निहोत्रस्थानी जेव्हा सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी आपण अग्नी प्रज्वलित करून, हातात आहुती घेऊन मनोमन परमात्म्याचे आवाहन आणि चिंतन करतो, त्या वेळी अग्नी ईश्वरी शक्तीला तेथे आणून प्रत्यक्ष उपस्थित करत असतो. (स देवाँ एह वक्ष्यति) अग्निहोत्राच्या या दोन्ही मंगल वेळी आपले उपास्य दैवत आपल्यासमोर, घरात किंवा उपासनेच्या स्थानी प्रत्यक्ष प्रकटलेले असते. त्यामुळे अग्निहोत्राच्या वेळी तेथे अपार पावित्र्याचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होते.

इ. देवतांचे ‘मुख’स्वरूप असलेला अग्नी

वेदांनी अग्नीला ‘दैवी शक्तीचे मुख’ किंवा ‘हव्यवाहन’, असेही संबोधले आहे. आपण भलेही कोणाच्याही स्वरूपात ईश्वरोपासना करत असा. तुम्ही शिवभक्त असा कि विष्णुभक्त असा. तुम्ही गणेश, सूर्य, मातृशक्तीदेवी, श्रीरामचंद्र, हनुमान यांपैकी कोणत्याही रूपात ईश्वरोपासना करत असा. या सर्वांना उद्देशून तुम्ही जी आहुती अर्पण करू इच्छिता, ती सर्व देवतांचे ‘मुख’स्वरूप असलेल्या अग्नीतच अर्पावी लागते. जसे कोणाला काही पदार्थ खावयास हवा असेल, तर तो साहजिकच तोंडात टाकून मगच खाता येतो, त्याप्रमाणे कोणत्याही देवतांना उद्देशून दिला जाणारा हविर्भाग अग्नीतच अर्पावा लागतो.

ई. अग्नीच्या साक्षीने केल्या जाणाऱ्या साधनेतील परिणामांची उपयुक्तता

• अग्नीच्या साक्षीने केलेले कोणतेही कर्म जिवाला विघ्नाविना पूर्ण चैतन्याची फलप्राप्ती करून देते.

• ज्या वेळी अग्नीच्या साक्षीने जीव त्यातील तत्त्वरूपी ईश्वरत्वाला भजू लागतो, त्याच वेळी ते कर्म खऱ्या अर्थाने साधनेत रूपांतरित होते.

२. अग्निहोत्राची व्याख्या

• अग्निहोत्र म्हणजेच तेजाच्या आधारावर ईश्वराचे प्रत्यक्षरूपी सगुण आणि तत्त्वरूपी निर्गुण स्वरूप चैतन्य आकृष्ट करण्यासाठी हाती घेतलेले व्रतरूपी अनुष्ठान.

• अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्वरी उपासना.

३. अग्निहोत्राचे प्रवर्तक

वेदांनी कथन केलेल्या प्राचीन अग्नि-उपासनेचे आजच्या आधुनिक युगात कोणीही व्यक्ती सहजपणे आचरण करू शकणाऱ्या या अग्निहोत्राच्या रूपात पुनरुज्जीवन, सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरु श्रीगजाननमहाराज (शिवपुरी, अक्कलकोट) यांनी केले आहे.

४. अग्निहोत्राचे महत्त्व

• अग्निहोत्रातून निर्माण होणारा अग्नी हा रज-तम कणांना विघटित करणारा आणि वायूमंडलात दीर्घकाळ रेंगाळणारा असल्याने सातत्याने ही प्रक्रिया राबवली असता, तो मानवाच्या भोवती १० फूट अंतरावर संरक्षककवच बनवतो. हे कवच तेजविषयक गोष्टींच्या स्पर्शाला अत्यंत संवेदनशील असते. सूक्ष्मातून हे कवच तांबूस रंगाचे दिसते.

• ज्या वेळी चांगल्या गोष्टीशी संबंधित तेज या कवचाच्या सान्निध्यात येते, त्या वेळी कवचातील तांबूस रंगाच्या तेजातील कण या तेजाला स्वतःत सामावून घेऊन आपल्या कवचाला बळकटी आणतात.

• रज-तमात्मक तेजकण हे कर्कश स्वरूपात आघात निर्माण करणारे असल्याने ते जवळ येत असल्याचे या कवचाला आधीच कळते आणि ते आपल्यातून प्रतिक्षिप्त क्रियेच्या रूपात अनेक तेजलहरी वेगाने ऊत्सर्जित करून त्या कर्कश नादालाच नष्ट करते आणि त्यातील नाद उत्पन्न करणारे तेजकणच नष्ट करते. यामुळे त्या लहरींतील तेज हे आघात करण्यात सामथ्र्यहीन बनते. म्हणजेच बॉम्बमधील आघातात्मक विघातक स्वरूपात ऊत्सर्जित होणारी ऊर्जेची वलये आधीच मारली गेल्याने बॉम्ब किरणोत्सर्ग होण्याच्या दृष्टीने निष्क्रीय बनतो. त्यामुळे तो फेकला, तरी पुढे होणारी मनुष्यहानी काही प्रमाणात टळते. बॉम्बचा स्फोट झाला, तरी त्यातून वेगाने जाणाऱ्या तेजरूपी रज-तमात्मक लहरी वायूमंडलातील सूक्ष्मतररूपी या अग्नीकवचाला धडकून त्यातच विघटित होतात आणि त्याचा सूक्ष्म-परिणामही तेथेच संपुष्ट झाल्याने वायूमंडल पुढील प्रदूषणाच्या धोक्यापासून मुक्त रहाते.

agnihotra_chitra

 

साधकांसह सामान्यजनांचा जीव वाचवण्याची प.पू. डॉक्टर (डॉ. आठवले, संकलक) यांनी सांगितलेला उपाय म्हणजे अग्निहोत्र ! : प.पू. डॉक्टर यांनी साधकांसह सामान्यजनांनाही साधना नाही, तर घरबसल्या अग्निहोत्ररूपी प्रक्रियेचा उपाय सुचवून ते केल्याने समष्टी साधना केल्याचेच फळ मिळणार आहे आणि बऱ्याच जिवांचे प्राण वाचणार असल्याचे, म्हणजेच तेवढे पुण्य पदरी पडणार असल्याचे भाष्य केले आहे.

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘अग्निहोत्र’