शिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही !

‘सध्या लोक किंवा शासन जे काही निर्णय घेते, ते केवळ बुद्धीचा किंवा विज्ञानाचा उपयोग करूनच घेते. त्यामुळे ते बहुतांशी चुकीचे असतात. याची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. श्री भवानीदेवीच्या मूर्तीची झीज होत आहे; म्हणून मंदिराचे प्रशासक असलेल्या धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांनी तिच्या अभिषेकावर बंदी घातली.

२. वर्ष १९६० मध्ये अशुद्धलेखन करणार्‍यांना सोपे जावे, यासाठी ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ यांनी पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये मान्यता देऊन संस्कृत शुद्धलेखनाप्रमाणे असलेले सर्व नियम मराठीच्या शुद्धलेखनात पालटले.

पहिल्या उदाहरणामध्ये भाविक मूर्तीवरील अभिषेकातून देवतेच्या मूर्तीतून मिळणार्‍या चैतन्यापासून वंचित झाले आणि दुसर्‍या उदाहरणामध्ये संस्कृतमधील नियम पालटल्याने संस्कृत भाषेतील चैतन्यापासून मराठी भाषिक वंचित झाले. या उदाहरणांमधून लक्षात येईल की, सरकारने, तसेच लोकांनी पूर्वापार चालत आलेल्या आणि ऋषीमुनींनी सांगितलेल्या अध्यात्मशास्त्राला लक्षात न घेतल्याने किंवा ते त्यांना ठाऊक नसल्याने आणि त्यांना अहंमुळे कोणाचे त्याविषयी मार्गदर्शन घ्यावेसे न वाटल्याने असे चुकीचे निर्णय घेऊन समष्टीचीच हानी केली. ही हानी सूक्ष्मातील आहे; पण ती पुष्कळ मोठी आहे.

 

अध्यात्मशास्त्र माहीत नसणे, हा सध्याच्या शिक्षणपद्धतीचा दोष

सध्या शिक्षणामध्ये अनेक विषय अंतर्भूत आहेत; पण या सर्व विषयांचा जो पाया आहे, तो अध्यात्मशास्त्र हा विषयच शिकवत नसल्याने सर्व गोष्टी चुकीच्या होत आहेत. पूर्वी गुरुकुलांमध्ये तो विषय शिकवला जायचा.

 

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून घेतलेला एखादा निर्णय वरवर योग्य वाटत असला, तरी एखादी गोष्ट योग्य कि अयोग्य हे अध्यात्मच सांगू शकते; कारण ते मुळापर्यंत जाते. एखादी गोष्ट अशी का करायची याचे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून केवळ भौतिक कारण कळते; पण ईश्‍वराला काय अपेक्षित आहे, हे अध्यात्मच सांगू शकते आणि ते पुष्कळ श्रेष्ठ असते. वरील पहिल्या उदाहरणात केवळ मूर्तीची झीज होऊ नये, हाच दृष्टीकोन बघितला गेला; पण मूर्तीला अभिषेक केल्याने समष्टीला होणार्‍या आध्यात्मिक लाभापुढे तो उद्देश पुष्कळ गौण ठरतो. त्यामुळे तो चुकीचा आहे. सध्याचा विज्ञाननिष्ठांनी ठेवलेला आणखी एक चुकीचा दृष्टीकोन म्हणजे प्रदूषण होते; म्हणून गणेशमूर्ती दान करा किंवा कृत्रीम तलावात विसर्जित करा. अध्यात्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती वहात्या पाण्यात, उदा. नदीत किंवा समुद्रात विसर्जित केल्याने गणेमूर्तीतील गणेशतत्त्व पाण्यात येऊन ते वहात्या पाण्यामुळे दूरवर पसरते आणि त्याचा लाभ अनेकांना होतो, हा दृष्टीकोन आहे.

 

सध्या अध्यात्मशास्त्राला डावलले जाणे,
याला कारण कोणाला साधना ठाऊक नसणे, हे असणे

साधना करू लागल्यास बुद्धी सात्त्विक होते आणि अध्यात्मशास्त्र कळू लागते. सध्या विज्ञाननिष्ठेचीच परंपरा चालू असल्याने ईश्‍वरनिष्ठा लुप्त झाली आहे. तसेच ईश्‍वरप्राप्ती हा मनुष्यजीवनाचा उद्देश आहे, हेच सर्व जण विसरले आहेत. त्यामुळे मनुष्यातील गुणांचाही र्‍हास होत आहे. ही स्थिती दूर करण्यासाठीच सनातन संस्था अध्यात्मप्रसार आणि धर्मजागृती करत आहे. तसेच हा पालट आणखी व्यापक स्तरावर आणि मुळापासून होण्यासाठी शिक्षणामध्ये अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.९.२०११)