भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- भारतियांचे निसर्गाशी असलेले स्नेहसंबंध !

कु. मधुरा भोसले
कु. मधुरा भोसले

संपूर्ण मानवजातीला निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले आहे. भारतीय वृक्ष, लता, वेली, पशु आणि पक्षी यांचे पूजन करतात. त्याविषयी पाश्‍चात्त्य विचारवंतांना वाटते, निसर्गाचे प्रचंड सामर्थ्य पाहून भारतीय पापभीरू वृत्तीने त्यांचे पूजन करतात. भारतियांनी निसर्गाचे सामर्थ्य पुढील ३ स्तरांवर मान्य केले आहे.

 

 

 

१. निसर्गातही देवतेचे दर्शन झाल्याने कृतज्ञताभावाने निसर्गाचे पूजन करणे

भारतीय लोकांत असणार्‍या भोळ्या भावामुळे त्यांना निसर्गातही देवतेचे दर्शन झाले. त्यामुळे भारतीय निसर्गरूपी देवतेच्या चरणी आदरभावाने नतमस्तक झाले आहेत आणि निसर्गाचे माहात्म्य स्वीकारून कृतज्ञताभावाने निसर्गाचे पूजन करत आहेत.

 

२. ऋषीमुनींनी नैसर्गिक शक्तींची अनेक गूढ रहस्ये
उकलल्यामुळे निसर्ग प्रेमळ मित्राप्रमाणे जवळचा वाटणे

आमच्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या सान्निध्यात अनेक वर्षे साधना करून निसर्गाशी जवळीक साधली. त्यांनी निसर्गाच्या सहवासात जीवन व्यतीत करून निसर्गाशी एकरूप होऊन नैसर्गिक शक्तींची अनेक गूढ रहस्ये उकलून विश्‍वापुढे ज्ञानाचे नवे दालन उघडले. त्यामुळे भारतियांना निसर्ग प्रेमळ मित्राप्रमाणे जवळचा वाटतो.

 

३. शरणागतभावाने निसर्गाचे अफाट सामर्थ्य मान्य करणे

निसर्गाचे प्रचंड सामर्थ्य पाहून भारतियांना मनुष्याकडे असणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यत्मिक बळ किती तुटपुंजे आहे, याची तीव्रतेने जाणीव झाली. निसर्गाचे उग्र रौद्र रूप पाहून केवळ भयभीत न होता निसर्गाच्या अफाट सामर्थ्यापुढे भारतीय शरण आले आहेत. त्यामुळे ते निसर्गाचे सामर्थ्य अगदी मनापासून स्वीकारतात.

यावरून भारतियांचे निसर्गाशी स्नेहाचे संबंध असल्याचे सिद्ध होते. पाश्‍चात्यांना केवळ भयापोटी निसर्गाचे सामर्थ्य स्वीकारणे, हे एकमेव सूत्र ठाऊक आहे, या उलट आदरभाव, कृतज्ञताभाव, स्नेहभाव आणि शरणागतभाव यांमुळे भारतियांनी निसर्गाशी ३ निरनिराळ्या स्तरांवर स्नेहाचे नाते जोडले आहे. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१६)