गुरूंच्या विविध प्रकारांप्रमाणे प.पू. डॉक्टरांमध्ये दिसलेली विविध रूपे !

अनुक्रमणिका

Ppdr_hasatana_side_2012
परात्पर गुरु (डॉ.) अाठवले

प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मात्र महर्षींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा वाढदिवस १०.५.२०१५ या दिवशी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून केलेल्या नाडीवाचनावरून त्यांचे अवतारत्व सिद्ध झाले आहे. त्याचा साधकांना झालेला आनंद शब्दातीत आहे. तो सोहळा पहाणारे आणि काही कारणांनी न पहाणारे यांचीसुद्धा त्या सोहळ्याचे वर्णन ऐकून साधनेत आल्यापासून अशी भावजागृती प्रथमच झाली असावी. त्यांच्या अवतारत्वाचा प्रवास डॉक्टर या नामाधिमानापासून आरंभ झाला. या प्रवासात जरी ते स्वतःला कुणाचेही गुरु म्हणवून घेत नसले, तरी ते सर्व साधकांना गुरुस्थानीच होते आणि त्यांचे अवतारत्व घोषित झाले असले, तरी आजही ते साधकांना गुरुस्थानीच आहेत.

प.पू. डॉक्टरांनी लिहिलेल्या पूर्वीच्या गुरुकृपायोगानुसार साधना या ग्रंथात गुरूंचे विविध प्रकार दिले आहेत. तो ग्रंथ ग्रंथातील गुरूंचे प्रकार आणि प.पू. डॉक्टर अशा भावाने कधी वाचला नव्हता. या वेळी मात्र अकस्मात् अशा भावाने वाचायचा प्रयत्न केला आणि लक्षात आले की, ती सर्व गुरूंची रूपे प.पू. डॉक्टरांमध्ये सामावलेली आहेत. ती सूत्रे पुढीलप्रमाणे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

१. कुलागमानुसार गुरूंचे प्रकार

१ अ. प्रेरक गुरु

हे साधकाच्या मनात दीक्षेचे रोपण करणारे असतात. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या साधनेच्या आरंभीच्या काळातच अनेक ठिकाणी स्वतः एकट्याने प्रसार करून प्रवचनांद्वारे अध्यात्माचा प्रसार केला आणि जिज्ञासूंच्या मनात दीक्षेचे रोपण केले.

१ आ. सूचक गुरु

हे साधना आणि दीक्षा यांचे वर्णन करणारे असतात. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या प्रवचनांमध्ये अध्यात्मशास्त्र सोप्या भाषेत सांगून त्याची ऐकणार्‍यांमध्ये गोडी निर्माण केली.

१ इ. वचक गुरु

हे साधकाचे वर्णन करणारे असतात. प.पू. डॉक्टरांनी प्रवचनांच्या माध्यमातून साधना करणारी व्यक्ती हेरून त्यांना पुढील साधनेसाठी मार्गदर्शन करणे चालू केले.

१ ई. दर्शक गुरु

हे साधना आणि दीक्षा यांतील योग्यायोग्यता सांगणारे असतात. साधना म्हणजे नेमके काय आहे ?, साधना आणि दीक्षा यांचा समन्वय कसा साधायचा ?, त्यात किती घटकांचा अंतर्भाव आहे ? आणि कठीण वाटले, तरी कलियुगात साधना करणे काळानुरून कसे आवश्यक आहे ?, हे प.पू. डॉक्टरांनी ऐकणार्‍यांच्या मनावर बिंबवले.

१ उ. बोधक गुरु

हे साधना आणि दीक्षा यांचे तात्त्विक विवेचन करणारे असतात. प.पू. डॉक्टरांनी साधनेविषयी अध्यात्म, गुरुकृपायोगानुसार साधना, अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन असे अध्यात्माचे महत्त्व सांगणार्‍या आणि देवतांप्रती श्रद्धा वाढवणार्‍या काही लघुग्रंथांचे संकलन केले आणि ज्यांच्यापर्यंत ते प्रत्यक्ष पोचू शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत या माध्यमातून अध्यात्म पोचवले.

१ ऊ. शिक्षक गुरु

हे साधना शिकवणारे आणि दीक्षा देणारे असतात. नंतरच्या काळात सनातनचे काही साधक सिद्ध झाल्यावर त्यांनी अभ्यासवर्गांच्या माध्यमातून अध्यात्म या विषयावरील शंकांचे निरसन करायला प्रारंभ केला. साधनेचा आरंभीच्या काळात त्यांनी प.पू. भक्तराज महाराजांच्या कृपाशीर्वादाने या गुरुरूपात जिज्ञासूंना आणि साधकांना मार्गदर्शन केले.

 

२. प.पू. डॉक्टर हे साधकांना साधनेत सर्व प्रकारे साहाय्य
करून त्यांच्याकडून साधना करवून घेणारे उत्तम गुरु आहेत !

1400425734_P_Patrikarkaka_150
पू. अशोक पात्रीकर

जसाजसा काळ जात आहे, तसतसे प.पू. डॉक्टरांमधील गुरूंची पुढील रूपेही सर्व साधकांना जाणवत आहेत. गुरूंच्या कनिष्ठ गुरु, मध्यम गुरु आणि उत्तम गुरु या तीन प्रकारांपैकी प.पू. डॉक्टर उत्तम गुरु आहेत. उत्तम गुरूंच्या व्याख्येप्रमाणे जर साधक (शिष्य) साधनेकडे नीट लक्ष देत नसेल, तर ते साधकांना सर्व प्रकारे साहाय्य करून, प्रसंगी शिक्षा करून साधकांकडून साधना करवून घेतात. या ठिकाणी बळाचा वापर स्थूल माध्यमातून नव्हे, तर सूक्ष्मातून केला जातो; पण प.पू. डॉक्टर साधकाची साधनेत हानी होऊ नये, यासाठी धर्मशास्त्रानुसार प्रायश्‍चित्त घ्यायला सांगून साधकांच्या साधनेची सर्वतोपरी काळजी घेतात. असे करण्यामागे सनातनमधील प्रत्येक साधक साधनेत जलद गतीने पुढे जावा, असा त्यांचा उद्देश असतो.

 

३. नामचिंतामणीनुसार

नामचिंतामणीत गुरूंचे पुढील बारा प्रकार सांगितले आहेत.

३ अ. धातूवादी गुरु

हे शिष्याकडून तीर्थाटन आणि नाना प्रकारची साधने करवून शेवटी ज्ञानोपदेश करणारे असतात. प.पू. डॉक्टर सनातनच्या काही संतांना आणि साधकांना तीर्थाटनाला पाठवून त्या त्या ठिकाणी रहायला सांगून त्यांच्याकडून साधना करवून घेत आहे. पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत असलेले अन्य साधक सध्या हीच साधना करत आहेत.

३ आ. चंदन गुरु

ज्याच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, ते चंदनगुरु होत. चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारे ते चंदनगुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्‍यांना सुगंध देते, त्याप्रमाणे असे गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवतात. असे गुरु वाणीने नाही, तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतात. प.पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात आलेली प्रत्येक व्यक्ती याची अनुभूती घेत आहे. स्वतःचा देह अक्षरशः झिजवून प्रत्येक कृती साधना म्हणून कशी करायची ?, याचा आदर्श ते प्रत्यक्ष कृतीतून साधकांसमोर ठेवत आहेत. त्यांच्या कृपेने सनातनचे साधक संतपदी विराजमान झाले आहेत आणि अन्य साधकांचा त्या दिशेने प्रवास चालू आहे. समाजातील धर्माभिमानी व्यक्तींचीही अशीच गतीने प्रगती होत आहे. प.पू. डॉक्टरांच्या देहाला आणि त्यांच्या कोणत्याही वस्तूला जसा सुगंध येतो, तसा अंशात्मक सुगंध अनेक साधकांच्या देहाला आणि वस्तूंनाही येतो. ते चंदन गुरु असल्याची ही लक्षणे नव्हेत का ?

३ इ. विचार गुरु

हे शिष्याला सारासार विवेक शिकवून पिपीलिका (मुंगी) मार्गाने आत्मसाक्षात्कार घडवणारे असतात. प.पू. डॉक्टरांनी मोक्षप्राप्तीच्या पिपीलिका (मुंगी) मार्गाऐवजी अध्यात्मात जलद प्रगती करणारा गुरुकृपायोगानुसार साधना हा विहंगम मार्ग शोधून त्यानुसार त्यांनी सर्व साधकांनाच नव्हे, तर धर्माभिमानी हिंदुत्ववाद्यांनाही आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला आहे.

३ ई. अनुग्रह गुरु

हे केवळ कृपानुग्रहाने शिष्याला ज्ञान देणारे असतात. कुणालाही स्वतःचा अनुग्रह घ्यायला न लावता केवळ साधकांची साधना व्हावी, यासाठी विविध सेेवांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टर साधकांकडून साधना करवून घेत आहेत. त्यासाठी समाजातील धर्मप्रसारापासून आश्रमातील प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेपर्यंतच्या सेवांद्वारे अध्यात्मात कशी प्रगती होऊ शकते, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहेत.

३ उ. स्पर्श/परीस गुरु

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे साधकाला दिव्य ज्ञान देणारे असतात. साधकांना स्पर्शही न करता त्यांना दिव्य ज्ञान देणारे प.पू. डॉक्टर महान गुरु आहेत !

३ ऊ. कूर्म / कच्छप गुरु

कासवी जशी केवळ दृष्टीमात्रे पिल्लांचे पोषण करते, तद्वत हे केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करणारे असतात. प.पू. डॉक्टर रामनाथी आश्रमातील एका साध्या खोलीत राहून सनातनच्या सर्वत्रच्या साधकांचे त्रास सूक्ष्मातील दृष्टीमात्रे स्वतःवर घेऊन त्यांचे रक्षण करत आहेत.

३ ए. चंद्र गुरु

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो. त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने शिष्याला तारणारे असतात. प.पू. डॉक्टर सर्व साधकांचे अपराध पोटात घेऊन त्यांना साधनेची पुनःपुन्हा संधी देऊन साधनेला उद्युक्त करतात.

३ ऐ. दर्पण गुरु

आरशात स्वतःचे मुख दिसते. त्याप्रमाणे केवळ आत्मदर्शनाने शिष्याला ब्रह्मज्ञान घडवतात. असे कितीतरी साधक आहेत की, ज्यांनी प.पू डॉक्टरांना पाहिलेही नाही. केवळ त्यांचे छायाचित्र हाच त्यांचा आरसा आहे आणि त्याच्या बळावर अनेक साधक अन् धर्माभिमानी साधना करून साधनेत पुढे जात आहेत.

३ ओ. छायानिधी गुरु

छायानिधी नावाचा एक मोठा पक्षी आकाशात फिरत असतो. त्याची सावली ज्याच्यावर पडते, तो राजा होतो, अशी समजूत आहे. याप्रमाणे हे साधकावर केवळ सावली धरून त्याला स्वानंदसाम्राज्याचा अधिपती करणारे असतात. प.पू. डॉक्टर सनातनच्या साधकांनाच नव्हे, तर अनेक हिंदु धर्माभिमान्यांनाही एकाच भेटीत आपलेसे करून त्यांना स्वानंदसाम्राज्याचा अधिपती करत आहेत.

३ औ. नादनिधी गुरु

नादनिधी या नावाच्या एका मण्याचा ज्या धातूला स्पर्श होतो, तो धातू जिथल्या तिथे सुवर्ण बनतो, अशी समजूत आहे. त्याप्रमाणे मुमुक्षूची करुण वाणी कानी पडताच त्याला तिथल्या तिथे दिव्यज्ञान देणारे ते नादनिधी गुरु. जो मुमुक्षू प.पू. डॉक्टरांची मधुर वाणी प्रत्यक्ष किंवा ध्वनीचकतीद्वारे ऐकतो, तो लगेच साधनेसाठी उद्युक्त होऊन साधनेला आरंभ करतो.

३ अं. क्रौंच गुरु

क्रौंच पक्षीण आपली पिल्ले समुद्रतिरी ठेवून दूरदेशी चारा आणायला जाते. या संचारात ती वारंवार आकाशाकडे डोळे करून पिलांचे स्मरण करते. त्यायोगे ठेवल्यास्थानी तिची पिले पुष्ट होतात, अशी समजूत आहे. तद्वत शिष्याची आठवण करून त्याला स्वस्थानी आत्मानंदाचा उपभोग देणारे ते क्रौंच गुरु. सनातनच्या अनेक साधकांनी त्यांच्यावर आलेल्या संकटाच्या वेळी प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून केलेल्या साहाय्याची अनुभूती घेतली आहे. याचा अर्थ ते स्थुलातून जरी रामनाथी आश्रमात असले, तरी सूक्ष्मातून ते प्रत्येक साधकासमवेत राहून त्याला सूक्ष्मातून मार्गदर्शन करत आहेत.

३ क. सूर्यकांत गुरु

सूर्याच्या किरणस्पर्शाने सूर्यकांत मण्यामध्ये अग्नी उत्पन्न होतो. तद्वत आपली दृष्टी जिकडे वळेल, तिकडच्या साधकांना विदेहत्व देणारे सूर्यकांत गुरु होत. प.पू. डॉक्टरांकडून प्रक्षेपित होत असलेल्या सूक्ष्म चैतन्याच्या किरणांमुळे साधकांना साधनेची योग्य दिशा कळते आणि त्यांनी संघर्षमय प्रसंगात केवळ प.पू. डॉक्टरांचे स्मरण जरी केले, तरी प.पू. डॉक्टर त्यांच्या साहाय्याला सूक्ष्मातून धावून जातात.

 

४. पिश्‍चिलातंत्रानुसार गुरूंचे प्रकार

४ अ. दीक्षा गुरु

पूर्वपरंपरेने प्राप्त झालेल्या मंत्राची दीक्षा देणारे दीक्षा गुरु होत. प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना नामदीक्षा दिली, तशीच नामदीक्षा ते सनातनच्या साधकांना देत आहेत. त्यांनी कुणालाही गुरुमंत्र दिला नाही. केवळ देवाचे नावच घ्यायला सांगितले आहे. त्यांनी कुणालाही स्वतःच्या देहात अडकू दिले नाही.

४ आ. शिक्षा गुरु

समाधी, ध्यान, धारणा, जप, कवच, पुरश्‍चरण, महापुरश्‍चरण आणि साधनेचे निरनिराळे विधी अन् योग या गोष्टी शिकवणारे शिक्षा गुरु होत. प.पू. डॉक्टरांनी साधनेसाठी आवश्यक असलेले हे सर्व घटक गुुरुकृपायोगानुसार साधनेत अंतर्भूत करून या प्रत्येकासाठी द्यावा लागणारा वेळ वाचवला आहे आणि म्हणून तोच साधनेचा विहंगम मार्ग झाला आहे.

 

५. इतर प्रकार

५ अ. मार्गदर्शक गुरु

हे शिष्याला योग्य मार्गदर्शन करतात. साधकांच्या साधनेतील लहानात लहान अडचणी लवकर दूर व्हाव्यात, अशा पद्धतीचे मार्गदर्शन प.पू. डॉक्टर दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून करत असतात.

५ आ. पृच्छक गुरु

हे स्वतःच शिष्याला प्रश्‍न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्‍या मार्गाकडे वळवतात. जिज्ञासू हाच ज्ञानाचा खरा अधिकारी आहे, अशी प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेत आल्यापासून दिली आहे. त्यामुळे साधनेसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट लिहून ठेवण्याची सवय त्यांनी साधकांना लावली आहे.

५ इ. दोषविसर्जक गुरु

यांना शिष्य आत्मीयभावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो. साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया सांगून ती त्यांच्याकडून प्रभावीपणे राबवून घेण्याचा प.पू. डॉक्टरांचा संकल्प झाला आहे. त्यामुळे कुणीही साधक स्वतःच्या चुका किंवा अडचणी प्रांजळपणे त्यांच्याकडे किंवा दायित्व असलेल्या साधकांकडे मांडू शकतो.

५ ई. गुण गुरु

साधनेला पूरक असा प्रत्येकातील गुण घेऊन दत्ताने जे २४ गुरु केले. त्यांना गुण गुरु म्हणतात. प.पू. डॉक्टरांनीही साधकांना सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला सांगून साधकच नव्हे, तर अन्य व्यक्तीतील गुण हेरून ते आत्मसात करायला शिकवले आहे.

उपरोक्त गुरूंच्या प्रकारातील प्रत्येक रूप प.पू. डॉक्टरांमध्ये आहे.

 

६. सनातनचे साधक प.पू. डॉक्टरांना पुढील रूपातही पहातात.

६ अ. भाव गुरु

साधकाच्या मनात भाव तिथे देव हे सूत्र रुजवून भाव वाढवण्यासाठी ते सतत मार्गदर्शन करत असतात.

६ आ. सगुण-निर्गुण गुरु

आश्रमात रहाणार्‍या साधकांसाठी ते कधी कधी सगुण रूपात दिसतात, तर अन्यत्रच्या साधकांना त्यांच्या निर्गुण रूपाच्या अनुभूती येतात.

६ इ. समष्टी गुरु

साधकांना आणि समाजातील धर्माभिमान्यांना केवळ व्यष्टी साधनेत न अडकवता त्यांना समष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करून प.पू. डॉक्टर समष्टी साधना करवून घेत आहेत.

६ ई. राष्ट्ररक्षक गुरु

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्यास घेऊन साधकांना आणि धर्माभिमानी व्यक्तींना ते प्रत्येक पाऊल त्या दिशेने टाकण्यासाठी मार्गदर्शन करत असतात.

६ उ. धर्मरक्षक गुरु

आज हिंदु धर्माला आलेली ग्लानी कशी दूर होईल ?, यासाठी ते सातत्याने ग्रंथ, दैनिक आणि साप्ताहिक सनातन प्रभात यांच्या माध्यमातून मागदर्शन करत असतात.

६ ऊ. मोक्ष गुरु

प्रत्येक साधकाला मोक्ष मिळावा, असेच मार्गदर्शन ते करत असतात.

म्हणूनच विविध प्रकारच्या गुरूंचे सर्व गुण असणार्‍या प.पू. डॉक्टरांना महर्षींनी विष्णूचे अवतार म्हणून घोषित केले आहे. अवतारत्व असणारे गुरु या जन्मी लाभले, हे सनातनच्या साधकांचे परम भाग्य आहे. यासाठी आपण सर्वांनी ईश्‍वराच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केेली, तरी ती अल्पच रहाणार आहे. प.पू. डॉक्टरांनी सुचवलेले शब्दपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो.

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक