श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा

Shri_Mahant_Sagaranand_Maharaj_clr
महंत श्री सागरानंद सरस्वती महाराज

नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत श्री सागरानंद सरस्वती महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

संकलक : श्री. सचिन कौलकर

आखाड्यांचा परिचय

सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

 

१. महाराष्ट्रात स्थापन झालेला एकमेव आखाडा

श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा हा भारतातील १३ आखाड्यांपैकी महाराष्ट्रात स्थापन झालेला एकमेव आखाडा आहे. शैवांच्या १० आखाड्यांपैकी श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा हा एक आहे. या आखाड्याची स्थापना महाराष्ट्रात विक्रम संवत ९१२ (वर्ष ८५६), मिती ज्येष्ठ शुक्ल पक्ष ४, (रविवार) या दिवशी झाली. आखाड्याचे प्रमुख कार्यालय काशी (वाराणसी) येथे आहे.

 

२. सर्वसंमतीने कामकाज

श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचा कारभार पंचायती स्वरूपात चालतो. अध्यक्ष, श्रीमहंत, महंत, कारभारी, सचिव, कोतवाल, पुजारी या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या विचाराने कार्य होते. प्रत्येकी ६ वर्षांनी प्रयागच्या कुंभमेळ्यात पंचपरमेश्‍वराची निवड होते. वर्ष १९४५-४६ मध्ये या आखाड्याची नोंदणी झाली आहे. आखाड्याचा अध्यक्ष एकच असतो आणि तोच मुख्य असतो; म्हणजे जिल्हास्तरावर अध्यक्षपद नसते. या आखाड्यात साधूंनी दीक्षा घेतलेली असते. नूतन पंचाची माहिती लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील कार्यालयाला पाठवली जाते. श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याच्या देशभरात ३०० शाखा आहेत. दक्षिणेत अल्प प्रमाणात, तर पूर्व, पश्‍चिम आणि उत्तर बाजूला अधिक शाखा आहेत.

 

३. इष्टदेव सूर्यनारायण

जगाचे पालनहार, जगाचा आधार आणि संपूर्ण विश्‍वाला प्रत्यक्ष दर्शन देणारा श्री सूर्यनारायण हीच श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याची इष्टदेवता आहे. आखाड्यात सूर्यदेवाची उपासना केली जाते, तर आखाड्यातील साधूंच्या कपाळावर असलेला भस्म गोल (शंभू) शिवलिंगाकार असतो. आखाड्यात प्रांतानुसार साधूंची संख्या २ पासून ते साधारणपणे १०० पर्यंत असते.

 

४. आखाड्यात सहभागी करून
घेण्यापूर्वी नवीन साधकांची सेवावृत्ती अभ्यासली जाणे

नवीन साधूची ज्या महंतावर श्रद्धा आणि भक्ती असेल, ते त्या माध्यमातून साधना करू शकतात. तथापि त्यांनी श्री सूर्यनारायणाची उपासना करणे आवश्यक असते. जगद्गुरु शंकराचार्य यांच्या पद्धतीनुसार आणि त्यांनी निर्देशित केलेल्या मार्गानुसार साधना सांगितली जाते. आखाड्यात अनेक सेवा असतात. नवीन साधकांना भोजन विभागात सेवा दिली जाते. आम्ही २ दिवस त्या साधकाचे निरीक्षण करतो. आम्हाला तो व्यवस्थित सेवा करत आहे कि नाही, हे त्याच्या बोलण्यातून आणि कृतीतून समजते. आखाड्यातील साधकांनी नियम पाळायला हवेत.

 

५. वैदिक धर्माचा प्रचार आणि
सनातन धर्माचे पालन करणार्‍यांनाच आखाड्यात प्रवेश

कोणाला आखाड्यात येऊन सर्व शिकायचे असेल, तर त्यांना प्रथम घरचा मोह दूर करावा लागेल. त्यांनी प्रपंच, सोयी, अपेक्षा, आशाआकांक्षा न बाळगता साधना केली पाहिजे. वैदिक धर्माचा प्रचार आणि सनातन धर्माचे पालन करणार्‍यांनाच आखाड्यात प्रवेश दिला जातो. त्यांनी आयुष्यभर केवळ साधनाच करायची असते.

 

६. आखाड्यात जटाधारी साधू नाहीत !

श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्यातील साधू जटा धारण करत नाहीत. शैवांच्या सर्व १० आखाड्यांमध्ये ब्रह्मचारी आणि संन्यासी यांच्या जीवनशैलीत परंपरेनुसार एकच नियम असतो. कधी कधी काही गोष्टींत थोडा भेद असतो; मात्र नियमांत भेद नसतो. हिमालयातील साधूंविषयी सर्वांनाच उत्सुकता असते; तथापि त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध नाही. हिमालयातून आलेले साधू आम्हाला कुंभमेळ्यात भेटतात आणि परत निघून जातात. अमृत स्नानाच्या वेळी नाशिक येथील कुशावर्त तीर्थावर साधूंची संख्या २ लाखांहून अधिक असते. सर्व साधू ३० मिनिटांत स्नान करून बाहेर पडतात. ही आश्‍चर्यकारक गोष्ट आहे.

 

७. साधूंकडून सिद्धींचा वापर नाही !

सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोग केला, तर तो नरकात जातो. ब्रह्मतत्त्वाला सिद्धी प्राप्त होत नसते, आत्मज्ञान महत्त्वाचे असते. परमेश्‍वराने सिद्धीविषयी नियम घालून दिले आहेत. ते नियम कुणी मोडत नाहीत.

 

८. नागा साधू म्हणजे अद्भुत शक्ती

नागा साधू म्हणजे अद्भुत शक्ती आहे. वस्त्रांचा त्याग करून जे दिगंबर स्वरूपात भक्तीचे लेपन करून शंकरस्वरूप बनले आहेत, ते म्हणजे नागा साधू होय. नागा साधू हे शंकराने जसे भस्म लावले आहे, तशा पद्धतीचे चिताभस्म लावून शिव स्वरूपात असतात. नागा साधूंच्या अंगावर विशिष्ट खूण असते, त्याद्वारे त्यांना ओळखता येते. नागा साधूंचा इतिहास पाहिला असता बंगाली गृहस्थ साधू झाले आहेत. शैवांच्या १० आखाड्यांपैकी श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा, श्री पंचायती जुना आखाडा, श्री पंच महानिर्वाणी आखाडा आणि श्री पंच अटल आखाडा या आखाड्यांत नागा साधू आहेत. धर्मासाठी लक्षावधी नागा साधूंनी बलीदान केले आहे. ते सर्वांच्या अंत:करणात वसले आहेत. त्यामुळेच शासन त्यांची व्यवस्था करते.

 

९. धर्मसंस्थापनेसाठीच आखाड्यांची स्थापना

भारतातील सर्व १३ आखाड्यांचा इतिहास पाहिला, तर हे आखाडे धर्मसंस्थापना करण्यासाठीच स्थापन झाले आहेत. धर्माचे पालन करणे आणि दुसर्‍याला मार्गदर्शन करणे, हेच या आखाड्यांचे प्रमुख कार्य आहे. साधूंच्या लढाया या धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठीच झाल्या आहेत. आखाड्यांनी सहस्रो लढाया केल्या आहेत. शत्रूने हिसकावून घेतलेले राज्य परत मिळवून दिल्याविषयी राजाने त्याच ठिकाणी आखाडे बांधलेले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासन अस्तित्वात आले. देशाची घटना पालटली गेली. आता सार्वभौम शासन आले आहे. त्यामुळे आखाड्यांना आता वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.

 

१०. शस्त्र आणि शास्त्र धारण करणारे आखाडे

परंपरेनुसार १३ आखाडे अस्तित्वात आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालावधीपर्यंत आखाडे शस्त्र बाळगत होते. शस्त्र धारण करणे म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. सध्याच्या काळानुसार ते शस्त्र धारण करत नाहीत. आता काळ पालटला आहे. आता आखाडे शासनाची अनुमती घेऊन शस्त्र ठेवतात. १३ आखाड्यांनी शौर्य गाजवले आहे. कोट्यवधी लोकांच्या हृदयात त्यांच्यासाठी विशेष स्थान आहे. म्हणूनच कुंभमेळ्याच्या कालावधीत भक्तांकडून आखाड्यांना सर्वतोपरी साहाय्य केले जाते.

 

११. प्रत्येक आखाडा करतो गोपालन अन् गोरक्षण

प्रत्येक आखाड्याच्या मालकीच्या अनेक गोशाळा आहेत. तेथे अनुमाने ३-४ सहस्र गायी असतात. आखाड्यात गायी पाळून त्यांचे संरक्षणही केले जाते. आखाड्यात गोरक्षणाविषयी लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण याप्रमाणे वागले जात नाही.

 

१२. नैसर्गिक आपत्तीतही आखाड्यांचे मोठे योगदान

देशात भूकंप, दुष्काळ आणि अन्य काही नैसर्गिक आपत्ती आल्यास १३ आखाड्यांतील महंत शासनाशी चर्चा करतात. त्यांची शासनाला सर्वतोपरी साहाय्य करण्याची भूमिका असते. शासनाला प्रसंगी धान्य आणि पैसे यांच्या स्वरूपातही साहाय्य केले जाते.

 

१३. साधूंची अपकीर्ती करणे हे एक षड्यंत्र

देशात पूर्वीपासूनच ३६ पाखंड आहेत. साधूंची अपकीर्ती करण्याचा खेळ चालू आहे. हे एक षड्यंत्र आहे. प्रसारमाध्यमांनी साधूंची कितीही अपकीर्ती केली, तरी धर्मप्रसाराचे कार्य थांबणार नाही. हे परमात्म्याचे कार्य आहे. आखाडे धर्मप्रसार करणे कदापि बंद करणार नाहीत. कांची कामकोटी पिठाच्या शंकराचार्यांना अडकवण्यामागे मोठे षड्यंत्र होते. त्यांना वाचवण्यासाठी राजकीय पक्षांशी चर्चा केली होती; मात्र त्याचा विशेष उपयोग झाला नाही. हा पूर्वनियोजित कट होता.

 

१४. इतरही संघटना आखाड्यांसमवेत कार्य करू शकतात !

आखाड्यांची परंपरा प्राचीन आहे. इतरही संघटना आखाड्यांसमवेत येऊन धर्मकार्य करू शकतात. वारकरी संप्रदाय अनेक आखाड्यांशी जोडलेला आहे. आखाड्यात वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव महाराज असे खालसे आहेत. त्यांना खालशांचे मालक बनवलेले आहे. आखाडे अनेक वर्षांपासून आहेत. पूर्वी साधूंनी घालून दिलेल्या तत्त्वांच्या आधारावरच आखाड्यांचे कार्य चालू असते. आखाड्यांच्या निमिर्तीच्याच वेळी खालशांचीही निर्मिती झाली. भारतात १३ आखाडे आहेत. १४ वा आखाडा होऊच शकत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात