श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा

उज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त..

श्री महंत सत्यगिरि महाराज

नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महासचिव आणि काशी येथील श्री महंत सत्यगिरि महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात महाराजांनी आखाड्यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

संकलक : श्री. सचिन कौलकर

१. आखाड्याची स्थापना, त्यांचे इष्टदैवत आणि नित्यसाधना

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथील श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्याची स्थापना विक्रमी संवत ६०३ (वर्ष ५४७), ज्येष्ठ कृष्ण पक्ष नवमी, शुक्रवार या दिवशी करण्यात आली. भगवान सिद्ध गणेशजी हे या आखाड्याचे इष्ट दैवत आहे. या आखाड्याची मुख्य शाखा वाराणसी येथे आहे. प्रतिदिन पहाटे ४ वाजता स्नान करून ध्यानधारणा करणे, पूजा-अर्चा करणे, भाविकांना मार्गदर्शन करणे, अशी त्यांची नित्यसाधना असते. श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाड्यातील साधूंची संख्या अनुमाने १५ सहस्र इतकी आहे.

 

२. साधू आणि त्यांचे राहणीमान

आखाड्यात साधना करणार्‍यांना साधू म्हटले जाते. साधूंचे कोणतेही प्रकार नसतात. ज्यांच्यात औदार्य, बंधुत्व, नम्रता, साधना आणि सेवा करण्याची इच्छा आहे, ते साधू म्हणून आखाड्यात राहू शकतात. काही साधू जटाधारी असतात, काही जण भगवी वस्त्रे परिधान करतात, तर काही जण सोन्याचे अलंकार घालतात. प्रत्येक आखाड्यांकडे शस्त्र आहेत. प्राचीन काळापासून आखाडे शस्त्र धारण करतात.

 

३. नागा साधू दिनचर्येत कधीही पालट करत नाहीत !

आवाहन आखाडा, अटल आखाडा, आनंद आखाडा, जुना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा आणि अग्नी आखाडा या आखाड्यांमध्ये नागा साधू असतात. नागा साधूंची दिनचर्या सारखीच असते. त्यांच्या दिनचर्येत ते कधीही पालट करत नाहीत. कुंभमेळ्यानंतर ते आपापल्या तीर्थक्षेत्री जाऊन साधनाच करतात.

 

४. साधूंचे देश, काळ
आणि परिस्थिती यांनुसार धर्मासाठी योगदान !

साधू व्यष्टी साधनेच्या स्तरावर ध्यान-धारणा करणे, पूजा-अर्चा करणे, ज्ञानार्जन करणे आदी करतात. समष्टी साधनेच्या स्तरावर देश, काळ आणि परिस्थिती यांनुसार धर्मासाठी योगदान दिले जाते. पेशव्यांनी मोगलांपासून आखाड्यांच्या माध्यमातूनच धर्माचे रक्षण करण्याचे कार्य केले आहे.

आखाड्यांचा परिचय

सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात