स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला मंगल भेट

दैनिक सनातन प्रभात पहातांना स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती बाजूला त्यांचे शिष्य आणि त्यांच्या डाव्या बाजूला श्री. प्रकाश जोशी

   रामनाथी, १ मे (वार्ता.) – नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी त्यांच्या काही अनुयायांसमवेत २८ एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या भेटीत त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांचे कार्य जाणून घेतले. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांनी माहिती दिली.

विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांचा सनातनविषयीचा भाव

सनातनचे काही ग्रंथ स्वामीजींनी चाळून पाहिले. त्यानंतर ते म्हणाले,

१. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉ. आठवले यांनी आध्यात्माचा मजबूत पाया घातला आहे. पाया मजबूत असेल, तर इमारत भक्कम आणि मोठी उभारता येते. हे कार्य प.पू. आठवले करत आहे. पुढील काळात इतर काही नसेल, केवळ सनातन संस्थेचे कार्य असणार आहे.

२. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि प.पू. डॉक्टर यांचे हे खूप मोठे कार्य आहे. त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.

३. मी आज सनातनच्या आश्रमात कसा आलो, हे मलाच माहीत नाही. कोणीतरी खेचून आणल्याप्रमाणे येथे आलो आहे.

४. सनातन धर्म आपले बीज आहे. त्याचाच प्रसार झाला पाहिजे. हे कार्य सनातन संस्था करत आहे.

५. यापूर्वी सनातनविषयी चांगल्या-वाईट गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. सनातनच्या आश्रमात आल्यानंतर सत्य काय आहे, ते समजले आणि सनातनचे विशाल कार्य लक्षात आले.

६. यापूर्वी स्वामीजींचा सनातनच्या कार्याशी अल्प परिचय होता. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आल्यानंतर स्वामी म्हणाले की, आतापर्यंत मी केवळ एक थेंब पाहिला होता, इथे आल्यानंतर मला समुद्र दिसला.

गोवा राज्यातील स्थानिक सेवेकर्‍यांशी बोलतांना
स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी केलेले मार्गदर्शन

१. राष्ट्र उभारणीसाठी आपल्याला आपला धर्म आणि संस्कृती समजून घेतली पाहिजे.

२. आपल्याला पशूप्रमाणे जीवन व्यतीत करायचे नाही, तर आपल्याला देवाने दिलेल्या मनुष्यजन्माचे सार्थक करायचे आहे.

३. मनातील पूर्वग्रह आणि दूषित विचार यांना आपण नष्ट केले पाहिजे. असे केले, तर मन निर्मळ होते.

४. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे. केवळ मनुष्यजन्म घेऊन उपयोगी नाही, तर आपल्यात मनुष्यत्व आले पाहिजे.

५. प.पू. बाबा आणि प.पू. डॉक्टर यांनी सांगितलेल्या मार्गानुसार साधनेचे प्रयत्न केले, तर जीवनाचे सार्थक करू शकतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात