परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी सन्मानांद्वारे केलेला गौरव !

संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही. किंबहुना मनोलय आणि अहंलय झालेला असल्याने ते सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे सन्मान अन् पुरस्कार यांच्या पलीकडे गेलेले असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही असेच आहे. असे असले, तरी संतच संतांना ओळखू शकतात आणि त्यांनाच अन्य संतांच्या कार्याचे महत्त्व कळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याही आध्यात्मिक कार्याचे महत्त्व कळल्याने अनेक संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सन्मान अन् पुरस्कार यांद्वारे गौरव केला. याची उदाहरणे येथे दिली आहेत.

ppdr-sant1

ppdr-2

ppdr-patrak

 

महर्षींनी प.पू. डॉक्टरांची वर्णन केलेली महती !

ppdr-pushpa
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्पवृष्टी करतांना नाडीवाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् (वर्ष २०१५)

महर्षी म्हणतात, देवावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. देवाने आम्हाला जे सांगितले, तेच आम्ही या नाडीशास्त्रात लिहिले. देवाने आम्हाला सांगितले की, साधकांना कैलासात, वैकुंठात दर्शन घ्यायला यायची आवश्यकता नाही. त्यासाठी आम्ही परम गुरुजींनाच (प.पू. डॉक्टरांना) अवताराच्या रूपात पृथ्वीवर पाठवले आहे. त्यांच्या दर्शनानेच साधकांना देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे साधकांनो, गुरुचरण सोडून कुठेही जाऊ नका. (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६)

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१२.३.२०१६, सायं. ५.१३)

 

सावंतवाडी येथील प.पू. भाऊ मसूरकर यांनी परात्पर गुरु
डॉ. आठवले यांचा अध्यात्मातील महनीय कार्याविषयी केलेला सन्मान !

१७.११.१९९९ या दिवशी सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल मंदिराच्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यात्मक्षेत्रातील थोर विभूतींचा सन्मान करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई यांचा त्यांनी अध्यात्मामध्ये केलेल्या महनीय कार्याविषयी सावंतवाडी येथील अध्यात्माचे गाढे अभ्यासक प.पू. भाऊसाहेब मसूरकर यांनी सन्मान केला. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी प.पू. भाऊ म्हणाले, सत्य जगासमोर ठेवतात, ते म्हणजे संत. असे संत असलेले डॉ. आठवले यांना मी नाही, तर श्री विठ्ठलानेच येथे आणले ! (दैनिक पुढारी, २१.११.१९९९)

 

कोल्हापूर येथील प.पू. तोडकर महाराज
यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केलेले सन्मान !

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना धर्मपत्नीसह सिंहासनावर बसवून अन् त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचा केलेला सन्मान !

२२.७.२००० या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी कोल्हापूर येथील संत प.पू. तोडकर महाराज यांच्या द्रोणागिरी आश्रमास प्रथमच भेट दिली. त्या वेळी प.पू. तोडकर महाराज आणि त्यांची भक्त मंडळी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई यांना सिंहासनावर बसवून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. (दैनिक सनातन प्रभात, २३.७.२०००)

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ढोल, ताशे आणि हनुमान नामाचा गजर यांनी पालखी मिरवणूक काढून केलेला सन्मान !

२४.११.२००१ या दिवशी प.पू. तोडकर महाराज यांच्या द्रोणागिरी आश्रमामध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई गेले असतांना त्या दोघांचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आणि सहस्रो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आश्रमामध्ये रांगोळ्या काढून अन् पायघड्या अंथरून सजावट करण्यात आली होती. द्रोणागिरी आश्रमात आगमन होतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जयजयकार करण्यात आला. या वेळी प.पू. तोडकर महाराज यांनी प.पू. आठवले महाराज की जय ! हा जयजयकाराचा फलक गॅसच्या फुग्यांना लावून तो हवेत सोडला.

त्यानंतर पुष्पहारांनी आणि भगव्या वस्त्राने सजवलेल्या दोन पालख्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्या हस्ते वीर मारुतीच्या २ मूर्ती ठेवण्यात आल्या. यांतील एक मूर्ती लहान मुलांच्या हनुमानाची होती. तिसर्‍या नावेच्या आकाराच्या पालखीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बसवण्यात आले. या तीनही पालख्या आश्रमाजवळच असलेल्या श्री विनायक मंदिर आणि शहाजी उद्यान यांना प्रदक्षिणा घालून परत द्रोणागिरी आश्रमात आणण्यात आल्या. या मिरवणुकीमध्ये झेंडे आणि पताका धारण केलेले सहस्रो हनुमानभक्त होते, ढोल आणि ताशे वाजवण्यात येत होते, हनुमान नामाचा गजर करण्यात येत होता. या पालखीमिरवणुकीत दत्त, मारुति, शंकर-पार्वती, श्री गणपति, नामदेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील लहान मुलेही होती. (दैनिक सनातन प्रभात, २५.११.२००१)

ठाणे येथील जासूसी नजरें प्रकाशन संस्थानाने
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भारत गौरव रत्न पुरस्कार देणे

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना मराठी भाषेच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि सनातन धर्म अन् अध्यात्म या क्षेत्रांत केलेले सर्वोत्कृष्ट कार्य यांबद्दल भारत गौरव रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा विशेष मानद सन्मान जासूसी नजरें प्रकाशन संस्थान, हाजी मलंग वाडी, कल्याण, जिल्हा ठाणे या संस्थेने प्रदान केला. (दैनिक सनातन प्रभात, ३१.१२.२००६)

सोलापूर येथील शनैश्‍वर देवस्थानाने
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शनैश्‍वर कृतज्ञता धर्म पुरस्कार देणे

२५.५.२००९ या दिवशी पू. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराजांच्या शनैश्‍वर देवस्थानाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शनैश्‍वर कृतज्ञता धर्म पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील परमपूज्य योगतज्ञ दादाजी वैशंपायन सत्कर्म सेवा सोसायटीने
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना योगतज्ञ दादाजी वैशंपायन गुणगौरव पुरस्कार देणे

२५.७.२०१० या दिवशी परमपूज्य योगतज्ञ दादाजी वैशंपायन सत्कर्म सेवा सोसायटीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना सन्मानपत्र आणि पंधरा सहस्र रुपये देऊन योगतज्ञ दादाजी वैशंपायन गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्रामध्ये पुढीलप्रमाणे म्हटले आहे. आपण करत असलेल्या विशेष सामाजिक, आध्यात्मिक इत्यादी उल्लेखनीय कार्यांसाठी आमच्या ट्रस्टतर्फे प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. आपले कल्याणकारी कार्य उत्तरोत्तर अखंड चालू राहो, ही शुभेच्छा !

ठाणे येथील खानकाह सूफी दीदार शाह चिश्ती या संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष पू. डॉ. अनजाना चिश्ती यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सनातन पद्मभूषण उपाधीने पुरस्कृत करणे

याविषयीचे पत्र पुढे दिले आहे.

१९.३.२०१४
प्रती,
माननीय संपादक,
दैनिक सनातन प्रभात, रामनाथी, फोंडा (गोवा), सनातन धर्माची सत्यता इंग्रजी, मराठी, हिंदी इत्यादी भाषांमध्ये जनमानसापर्यंत पोहोचवण्यास सनातन संस्था सक्षम आहे. दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार आणि अमानवता या अपराधांचे महाराष्ट्र अन् गोवा या राज्यांतून समूळ उच्चाटन करण्यासाठीच्या चळवळींमध्ये सनातन संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. देशामध्ये सुखशांती आणण्यासाठी आणि जनमानसामध्ये मानवतावादी सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी डॉ. जयंत आठवले अभिनंदनाला पात्र आहेत. यासाठी आमच्या संस्थानाने यापूर्वीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सन्मानित केले होते. डॉ. आठवले त्यांच्या कर्तृत्वासाठी या वर्षीचा विशेष सन्मान सनातन पद्मभूषण आम्ही त्यांना आता देत आहोत. सनातन प्रभात हे नाव तसे गुण असेच आहे. याने नेहमीच कट्टरवाद, आतंकवाद, उग्रवाद आणि नक्षलवाद यांना विरोध केला आहे. हे वृत्तपत्र इस्लामविरोधीही नाही आणि ख्रिस्ती मतांच्या विरोधीही नाही. जे कृत्य आणि लिखाण जनजीवनात अशांती अन् द्वेष पसरवते, तसेच राष्ट्रीय एकात्मतेवर घाला घालते, त्याला सनातन प्रभातने सप्रमाण विरोध केला आहे. तेच राष्ट्रहितासाठी प्रशंसनीय पत्रकारितेचे लक्षण आहे.

यासाठीच आमच्या संस्थानाने सनातन प्रभातला सनातन धर्मवीर हा सन्मान देऊन विभूषित केले आहे.
शुभकामनांसह.

– डॉ. अनजाना चिश्ती, संस्थापक अध्यक्ष, खानकाह सूफी दीदार शाह चिश्ती, हाजी मलंगवाडी, बी.ओ. वाडी, कल्याण (पूर्व), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.

 

अखिल मानवजातीसाठी अद्वितीय कार्य करणार्‍या परात्पर गुरु
डॉ. आठवले यांच्या कार्याची राज्य किंवा केंद्र शासनाने नोंद न घेणे, हा दैवदुर्विलास !

संतांचे कार्य आध्यात्मिक स्तरावरचे असते. त्यामुळे व्यावहारिक स्तरावर कार्य करणार्‍या शासनदरबारात संतांचे महत्त्व ते काय !

त्यामुळे खरेतर अखिल मानवजातीसाठी जगद्व्यापी हिंदु धर्मप्रसार आणि भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे कल्याणकारी कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची राज्य किंवा केंद्र शासनाने दखल घेतल्याचे एकही उदाहरण नाही. याउलट संतांना हालअपेष्टा आणि शासनाकडून त्रासच भोगावे लागतात, तसेच अनुभव परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आले.

म्हणतात ना, जिथे पिकते तिथे विकत नाही, हेच खरे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात