श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळते, हे आपण ऐकले वा वाचले असते; परंतु सद्गती मिळण्यात नेमकी काय प्रक्रिया घडते, तसेच लिंगदेहाच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे श्राद्ध करावे कि नाही हे का अवलंबून असते, यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

‘श्राद्ध हे लिंगदेहावर करावयाच्या संस्कारकर्माशी संबंधित असते. श्राद्ध करणे म्हणजे, पितरांच्या लिंगदेहाला गती देण्यासाठी ब्रह्मांडातील ऊर्जात्मक यमलहरींना आवाहन करणे होय. या प्रार्थनारूपी आवाहनामुळे ब्रह्मांडातील दत्ततत्त्वाशी संबंधित इच्छालहरी कार्यरत होऊन पितरांच्या लिंगदेहाशी संबंधित यमलहरींना आपल्या आकर्षणशक्तीच्या बळावर खेचून पृथ्वीच्या कक्षेत आणतात. बरेच लिंगदेह हे मर्त्यलोकामध्ये अडकलेले असतात. या लिंगदेहांना गती मिळण्यासाठी क्रियात्मक यमलहरींची आवश्यकता असते. या क्रियात्मक यमलहरींना श्राद्धकर्मामध्ये आवाहन केले असता, पितरांच्या लिंगदेहाभोवती असलेले वायूमंडल कार्यरत होऊन, या लहरींच्या बळावर लिंगदेह पुढच्या टप्प्यात ढकलला जातो, म्हणजेच लिंगदेहाला सद्गती मिळते.

५० टक्क्यांपेक्षा अल्प आध्यात्मिक पातळीच्या लिंगदेहाचे श्राद्ध करणे आवश्यक,
तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या लिंगदेहाचे श्राद्ध केले नाही तरी चालणे

५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाचा लिंगदेह साधनेच्या बळावर आधीच मर्त्यलोक पार करून पुढच्या लोकाला प्राप्त होतो; परंतु साधनेचे बळ नसलेल्या व्यक्तीचा लिंगदेह मर्त्यलोकातच यातना सहन करत पडून रहातो. त्याला गती मिळत नाही; कारण त्याच्या देहात नामात्मक म्हणजेच सात्त्विक ऊर्जेचा अभाव असल्याने तो मर्त्यलोकातील जडत्वदर्शक वातावरणात अडकून रहातो.

५० टक्क्यांच्या पुढे उन्नती झालेल्या जिवाचे श्राद्ध केले नाही तरी चालते; कारण त्याच्या देहात असलेल्या सुप्त नामरूपी ऊर्जेच्या बळावर तो साधना करून स्वबळावरच पुढच्या गतीला प्राप्त होत असतो.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.३.२००५, सायं. ६.४३)

(म्हणूनच संतांचे श्राद्ध न करता त्यांची पुण्यतिथी साजरी करतात. लिंगदेहाची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांपेक्षा अल्प आहे कि अधिक, हे सर्वसामान्यांना कळणे कठीण असल्याने श्राद्ध करणे श्रेयस्कर असते. – संकलक)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment