भारताच्या अवनतीची कारणे

त्रेता युगात प्रभु श्रीरामचंद्र, द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण असे अवतार भारतात झाल्याने भारताने त्या-त्या काळात आध्यात्मिकतेचे शिखर गाठले होते. आजच्या घोेर अशा कलियुगात भारताची अवनती का झाली, त्याची कारणे या लेखात पाहू.

 

१. हिंदूंनी वर्णाश्रमधर्माचे पालन न करणे

‘काही हिंदु विचारवंतांच्या मते ‘वर्णाश्रमधर्म तसेच जातीधर्म यांमुळे आपल्या राष्ट्राचे वाटोळे झाले आहे’; परंतु ते खरे नाही. केवळ आपापसांतील वैरभाव आणि चारित्र्यसंपन्नतेचा अभाव यांमुळेच आपल्या देशाची सर्वथा हानी झाली आहे. चातुर्वर्ण्य आणि जातीभेद असतांनासुद्धा आपले राष्ट्र शेकडो वर्षे वैभवाच्या शिखरावर असलेले आढळते.

आपल्याकडील ब्राह्मणांनी समाजाच्या गुरुस्थानी विराजमान होण्याचे सोडून स्वतःला श्रेष्ठ आणि दुसर्‍या वर्णांना कनिष्ठ मानले. आपल्या ऐहिक सुखासाठी ब्राह्मणवर्ग दुसर्‍यांवर अन्याय करत राहिला. त्यामुळे इतर वर्णही तसेच वागू लागले. अशा प्रकारे हिंदूंनीच आपल्या धर्मनिष्ठतेची हानी करून घेतली. धर्माचा नाश होणे, हेच हिंदूंच्या अवनतीचे खरे कारण आहे.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

२. धर्म आणि रिलिजन (उपासनापद्धती) हे शब्द एकार्थवाचक आहेत, असे समजणे

धर्म आणि रिलिजन (Religion) हे शब्द एकार्थवाचक मानल्यामुळे आपल्या राष्ट्रात सर्व गोंधळ माजला आहे. या दोन्हींमधे पुढील भेद आहेत.

१. रिलिजनचा संकुचित अर्थ अशा पद्धतीने सांगता येईल की, मानवाच्या कल्याणाच्या दृष्टीने त्या त्या मानवसमूहाने एकेक मानलेली विशिष्ट उपासनापद्धती. धर्म या शब्दाची व्यापकता अशी की, मानवाला आपल्या मूळ स्वरूपाची दृष्टी देऊन ते प्राप्त करून देण्याचे सामर्थ्यशाली साधन प्राप्त करून देतो तो.

२. रिलिजन या शब्दाचा अर्थ फार संकुचित आहे. याउलट धर्म या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे, त्यातसुद्धा सापेक्षता नाही. धर्म निरपेक्ष, व्यापक आहे. आता व्यापक हा शब्द म्हटला, तर व्याप्य या शब्दाच्या दृष्टीने तो सापेक्ष होतो; म्हणून धर्माची व्यापकता व्याप्य आणि व्यापक या दोघांनाही वगळून आहे.

३. धर्म या शब्दाचा अर्थ `स्वभाव’ असा आहे. रिलिजन याचा अर्थ स्वभाव असा कोठे आहे ? स्वभाव याला इंग्रजीत ‘नेचर’ (Nature) असा शब्द आहे. त्या ‘नेचर’ शब्दाचा अर्थसुद्धा आपल्या स्वभाव या शब्दाच्या अर्थाशी जुळत नाही. ‘नेचर’ हा शब्द त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या गुणसंगाप्रमाणे केला जातो. तसा आपल्या ‘स्वभाव’ या शब्दाचा अर्थ नाही. स्वभाव या शब्दाचा अर्थ `आत्मा’ असा आहे आणि तो गुणसंगरहित आहे.

आपल्या देशातील राजकारणी हिंदु धर्मीय असतांनाही धर्म आणि रिलिजन हे दोन शब्द एकार्थवाचक आहेत, या अपसमजुतीत राहिले. रिलीजनमुळे पाश्चात्त्य देशांत पोपची सत्ता असतांना जसा सज्जनांचा छळ (जाळून मारणे, देहान्त प्रायश्चित्त अशा शिक्षांतून) झाला तसा आपल्याकडे होईल, अशी भीती आपल्या राजकारण्यांना वाटली. तसेच आपल्याकडे इंग्रजांच्या शिक्षणव्यवस्थेमुळे रिलिजनची उत्पत्ती झाली. या गोष्टींचा परिणाम म्हणजे `धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावे’, अशी भारतीय राजकारण्यांची धारणा झाली.

रिलिजनमुळे होणारा अनर्थ आपल्याला युरोप अन् अमेरिका यांच्या इतिहासाच्या अभ्यासावरून आढळून येतो. वास्तविक रिलिजन आणि धर्म हे एकार्थवाचक शब्द मानल्यामुळे आपल्याकडील सज्जनांचाच छळ झालेला दिसतो, सत्तालोलुपतेमुळे राजकारण्यांत भ्रष्टाचार माजलेला आढळतो अन् देशाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आढळते.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

३. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे स्वसंस्कृतीचा पडलेला विसर

परमात्मा जसा आत आहे, तसाच बाहेरही आहे. भारतीय भक्तीपंथाला लागल्यामुळे त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली. त्यामुळे त्यांचे बाहेरील संसाराकडे दुर्लक्ष झाले. त्यांनी बाहेरच्या जगाचा शोध घेतला नाही, विज्ञानाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची व्यावहारिक अवनती झाली. देशातील जनता आळशी, दरिद्री, रोगांनी पीडित आणि दुर्बल बनली. भुकेलेली माणसे अध्यात्माचा विचारही करू शकत नाहीत. नीतीमूल्ये रसातळाला गेली. याचा परिणाम म्हणजे लोक भ्रष्टाचारी, लाचलुचपतखोर, चोर आणि दरोडेखोर बनले. या पार्श्वभूमीवर भारतातील तरुण पिढीला पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. तरुण पिढी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी शिक्षण यांसाठी परदेशात धाव घेऊ लागली. पाश्चात्त्य संस्कृती बहिर्मुख आहे. तिने विज्ञानाच्या साहाय्याने बाह्य जगाचा शोध घेतला आणि मानवी जीवनमान उंचाविण्यामध्ये प्रचंड प्रगती केली. दूरध्वनी, दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट, भ्रमणभाष (मोबाईल) इत्यादी मानवाकरिता निर्माण झालेल्या सोयीसुविधा हा त्याचाच आविष्कार आहे. अशा प्रकारे पाश्चात्त्य आणि त्यांच्या अनुकरणाने भारतीयही निवळ सुखप्राप्तीची लालसा मनात धरून सुखोपभोगांच्या पाठी लागले. त्यासाठीच ते आपल्या जीवनाचा बहुमूल्य वेळ कारणी लावू लागले; पण जितके भोगांतील सुख जास्त तितकेच त्यांचे दुःख आणि चिंताही वाढली. याचे मुख्य कारण म्हणजे जीवनात आनंद प्रदान करून देणार्‍या धर्माचा त्यांना विसर पडला. धर्म, संस्कृती आणि नीतीमूल्ये यांची पायमल्ली झाल्याने लोक स्वार्थपरायण बनले. स्वार्थापोटी राष्ट्राचे हित जपण्याच्या कामीही ते दिरंगाई करू लागले. अशा प्रकारे राष्ट्राचा सर्वांगीण अभ्युदय न होता राष्ट्र हळूहळू अधःपतनाकडे झुकू लागले. आता पश्चिमेकडील लोक अध्यात्माकडे वळत आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment