धर्म आणि भारताचे महत्त्व

पाश्चात्त्य राष्ट्रांत मार्गदर्शनासाठी संत वा उन्नत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना धर्म-अध्यात्म यांची फारशी ओळख नाही. भारत मात्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि म्हणून तो जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ आहे. या लेखात आपण भारताचे अद्वितीय महत्त्व जाणून घेणार आहोत. यांतून भारतीय असल्याचा आणि प्रामुख्याने हिंदु धर्मात आपला जन्म झाल्याचा अभिमान आपल्याला निश्चितच वाटेल !

 

१. युगानुसार धर्माचे अधिष्ठान असलेला भाग अल्प
होत जाऊन आता केवळ भारतातच धर्म शिल्लक रहाणे

आपल्या पूर्वजांचा इतिहास रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, पुराणे इत्यादी धर्मग्रंथांत दिला आहे. त्यावरून आपल्या असे लक्षात येईल की, समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य करण्याचा अधिकार केवळ साधकांनाच आहे. सत्ययुगाच्या शेवटी ‘सोऽहं’ भावाचा र्‍हास झाल्यामुळे धर्माच्या चार पादांपैकी एक पाद नष्ट झाला आणि त्या प्रमाणात पृथ्वीवरील एकचतुर्थांश भागातील धर्माचरण लुप्त होऊन तीन चतुर्थांश भागातच धर्म राहिला. त्याच ठिकाणी त्रेतायुग आले. पुन्हा एक पाद क्षीण झाल्यामुळे द्वापरयुग आले. तेव्हा अर्ध्या पृथ्वीवरच काय ते थोडेफार लोक धर्माचरणी राहिले. नंतर द्वापराच्या शेवटी तीन पाद क्षीण झाल्यामुळे एक चतुर्थांश पृथ्वीवरच काय ते धर्माचरणी राहिले. तेव्हा कलियुगाला प्रारंभ झाला. पांडवांच्या वंशातील अर्जुनाचा नातू परीक्षित हा कलियुगातील पहिला राजा झाला. त्या कलियुगाच्या काळातसुद्धा सर्पयज्ञ करण्याएवढे ब्राह्मणांचे सामर्थ्य होते. पुढे पुढे इतरत्रच्या सत्त्वप्रधान वृत्तीचा र्‍हास होऊन केवळ भारतच साधनाभूमी राहिल्यामुळे तेवढीच पुण्यभूमी राहिली; म्हणून ‘पंचखंडभूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत’, असे श्री गुरुचरित्रात म्हटले आहे.

 

२. ‘भारत’ देशाच्या नावांचा इतिहास

‘सांप्रत काळी आपल्या देशासाठी भारत आणि हिंदुस्थान हे दोन्ही शब्द एकार्थवाचक असले, तरीसुद्धा काळाची निकड म्हणून ‘हिंदुस्थान’ हे नावच आपल्या देशासाठी इष्ट आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी सत्ययुग होते. त्या वेळी देशाचे नाव ‘धर्म’ असे होते. पुढे मानवाची वृत्ती अवनत झाल्यामुळे त्रेतायुगात समाज आणि राष्ट्र यांत सत्त्वप्रधान वृत्ती जागृत रहाण्याच्या दृष्टीने देशाचे नाव ‘वेदधर्म’ असे पडले. पुढे द्वापरयुगात ‘भारत’ हे नाव पडले.

कलियुगात प्रारंभी ‘आर्यावर्त’ हे नाव पडून पुढे काळाची निकड म्हणून त्याच भूमीला ‘हिंदुस्थान’ असे नाव आपल्या धर्मवेत्त्यांनी ठेवले. हे नाव मात्र कलियुगाच्या अंतापर्यंत असावे, असा त्यांचा मनोदय होता. पूर्वीचा धर्म, नंतरचा वेदधर्म, त्यानंतरचा भारत, त्यानंतरचा आर्यधर्म आणि त्यानंतरचा हिंदु धर्म हे सर्व एकार्थवाचक शब्द आहेत.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

३. धर्मग्रंथ आणि संत यांनी गायिलेली भारताची महती

अ. अष्टादश पुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः ।
वेदाः साङ्गास्तथैकत्र भारतं चैकतः स्थितम् ।। – महाभारत, स्वर्गारोहणपर्व, अध्याय ५, श्लोक ४६

अर्थ : अठरा पुराणे, सर्व धर्मशास्त्रे (स्मृती) आणि सर्व अंगांसह वेद एकीकडे आणि एकटा भारत एकीकडे (एवढी भारताची योग्यता आहे).

आ. ‘आपले पूर्वज राजे सर्व पृथ्वीचे राज्य करत असले, तरी त्यांची राजधानी सध्याच्या भारतातच होती. ती म्हणजे इंद्रप्रस्थ. जगात सुखशांती नांदायची असेल, तर त्याचा प्रारंभ भारतापासूनच झाला पाहिजे; कारण आता केवळ भारतच धर्मक्षेत्र राहिला आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘ज्या ज्या वेळी भारताचे नैतिक पतन पराकोटीत जाईल, त्या त्या वेळी जगाचा विनाश होईल.’

शरिराचे सगळे भाग व्याधीमुळे सुकून गेले; तरी हृदयात जोपर्यंत धुगधुगी असते, तोपर्यंत आपण वाचू शकतो. अशा व्याधीग्रस्त शरिराची अवस्था असते, तशी आता सर्व विश्वाची झाली आहे. यालाच ‘धर्मग्लानी’ म्हणतात. आताचा भारत या विश्वदेहाच्या हृदयाच्या ठिकाणी विराजमान आहे आणि किंचित धुगधुगी म्हणजे संत अन् त्यांचे अंतरंग शिष्य होत. त्यामुळे या विश्वरूपी शरिरातील हा हृद्रोग त्या धर्मनिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपली वृत्ती जास्तीतजास्त सत्त्वप्रधान केल्यानेच बरा होऊन या विश्वरूपी देहाचे आरोग्य सुधारेल. भारत हा शब्द भा+रत असा बनला आहे. भा म्हणजे आत्मा आणि रत म्हणजे मग्न; म्हणून भारत म्हणजे आत्मभावात जेथे रत आहेत तो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

४. पाश्चात्त्यांनी वर्णिलेली भारताची महती

‘हिंदुराष्ट्राला स्वतःचे असे जागतिक मिशन आहे. विनाशाच्या कडेवर उभ्या असलेल्या मानवजातीला सुरक्षितता, सुख आणि समृद्धी यांचा मार्ग दाखविणे, हे ऐतिहासिक दायित्व नियतीने हिंदुराष्ट्रावरच सोपविले आहे आणि त्या दृष्टीने हिंदुराष्ट्रात वैचारिक सामर्थ्य निर्माण करणे, हे येथील ऋषीसंस्थेचे दायित्व आहे, असे ते (पं. दिनदयाळ उपाध्याय) मानीत. हिंदुराष्ट्राच्या या जागतिक मिशनचे स्वरूप स्वामी विवेकानंद, योगी अरविंद आणि पू. गोळवलकर गुरुजी यांनी निःसंदिग्ध शब्दांत घोषित केले आहे. इतकेच नव्हे, तर भविष्याचा वेध घेणार्‍या काही पाश्चात्त्य विचारवंतांनीही या राष्ट्राच्या जीवनकार्याविषयी आपल्या कल्पना आणि अपेक्षा जवळजवळ अशाच शब्दांत प्रकट केल्या आहेत. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. ‘इथे (भारतात) आपणाला अशी मनोधारणा आणि चेतना दिसते की, जिच्या आधारे मानवजातीला एक कुटुंब या नात्याने आपला विकास करून घेणे शक्य होईल. सध्याच्या अणूयुगात आपला सर्वनाश ओढवून घ्यावयाचा नसेल, तर इतर कोणताही पर्याय नाही.

आज आपण अद्याप मानवी इतिहासातील एका संक्रमणयुगात आहोत. या युगाचा प्रारंभ जरी पश्चिमेकडे झाला असला, तरी त्याची समाप्ती मात्र भारतातून व्हावी लागेल. अर्थात मानवजातीच्या आत्मविनाशात होणारा या युगाचा शेवट टाळावयाचा असेल, तर ! सध्याच्या युगात पाश्चात्त्य तंत्रज्ञानाने जग भौतिक पातळीवर एकत्र आणले आहे. या पाश्चात्त्य तंत्राने ‘अंतर’ ही चीज केवळ नष्ट झाली एवढेच नव्हे, तर जगातील देश एकमेकांच्या अगदी निकट आले असता त्यांना अत्यंत विध्वंसक शस्त्रांनी याच तंत्राने सुसज्ज केले आहे. एकमेकांना जाणण्यास आणि एकमेकांवर प्रेम करण्यास मात्र अद्याप ते शिकलेले नाहीत ! मानवी इतिहासातील या अतिशय धोक्याच्या क्षणी मानवतेचा बचाव व्हावयाचा असेल, तर तो केवळ भारतीय मार्गानेच होऊ शकेल. मला तीन गोष्टींकडे लक्ष वेधावयाचे आहे. पहिली गोष्ट ही की, जगात भारताचे स्थान फार महत्त्वाचे आहे आणि ते सदैव तसेच राहिले आहे. माझे दुसरे सूत्र असे की, भारत म्हणजे सध्याच्या जगाचे सारभूत स्वरूपच आहे. संपूर्ण जगाला भेडसावणारे अनेक प्रमुख प्रश्न आज भारतात ठळकपणे पुढे आले आहेत आणि त्यांचा उलगडा भारताचे राष्ट्रीय प्रश्न या नात्याने करण्याचा प्रयत्न चालू आहे. भारतातील जनता आणि भारत सरकार तो प्रयत्न करत आहेत. तिसरी गोष्ट ही की, भारतात जीवनाकडे पहाण्याची अशी एक दृष्टी आहे आणि मानवी व्यवहार सांभाळण्याची अशी एक भूमिका आहे की, सध्याच्या परिस्थितीत जी अत्यंत उपकारक ठरेल आणि तेही केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात !

अतीसुंदर आणि म्हणूनच अत्यंत परिश्रमसाध्य अशा या आदर्शानुसार, जो आदर्श म्हणजे तुमच्या भारतीय परंपरेचा वारसा आहे, तद्नुसार जीवन उभे करण्यात जर भारताला कधी काळी अपयश आलेच, तर संपूर्ण मानवजातीच्या भावी कल्याणाला बाधा आल्याप्रमाणे होईल. भारतावर एवढे थोर आध्यात्मिक दायित्व आहे.’ – सुप्रसिद्ध इतिहासशास्त्रज्ञ अर्नाल्ड टॉयन्बी

आ. ‘संपत्ती, शक्ती आणि प्राकृतिक सौंदर्य या सर्वांनी परिपूर्ण असलेला देश कोणता, हे मला सांगायचे असल्यास मी भारताचे नाव घेईन. कोणत्या देशातील माणसांनी आपल्याला मिळालेल्या काही उत्कृष्ट ईश्वरी देणग्यांचा पूर्णपणे विकास केला आहे, जीवनातील जटील समस्यांवर सखोल चिंतन करून काही समस्यांवर असे उपाय शोधून काढले आहेत की जे प्लेटो आणि कान्ट यांची शिकवण अभ्यासणार्‍यांचेही लक्ष वेधून घेतील, असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी त्याचे उत्तर सांगेन ‘भारत’. आम्ही युरोपियन लोक जवळजवळ ग्रीक, रोमन आणि ज्यू यांच्याच विचारधारांचे जीवनात अनुकरण करतो. हे जीवन अधिक सफल, परिपूर्ण, खरे मानवतावादी आणि शाश्वत करायचे असेल, तर त्यासाठी कोणत्या साहित्याचा आधार घ्यावा, असा प्रश्न कोणी विचारल्यास त्या प्रश्नाचे उत्तरही मी ‘भारतीय’ हेच देईन.’ – एक प्रकांड विद्वान प्राध्यापक मॅक्सम्युलर (१८५८ मध्ये मॅक्सम्युलर यांनी महाराणी व्हिक्टोरिया यांना पाठविलेल्या पत्रातील लिखाण)

 

५. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य

अ. ‘अध्यात्माच्या संदर्भात पृथ्वीवर भारताचे जसे महत्त्व आहे, तसे भारतात महाराष्ट्राचे. महाराष्ट्रात होऊन गेले इतके संत आणि संतलिखाण भारतात कुठेच झाले नाही.’ – गुरुदेव रानडे

आ. ‘उत्तरेकडे धार्मिक आचार पाळण्याचे निर्बंध अगदी सैल आहेत, तर दक्षिणेकडे आचारांचा कर्मठपणा अतिशयोक्तीच्या दुसर्‍या टोकाला गेलेला आढळतो; पण महाराष्ट्रात मात्र आचारांचा सुवर्णमध्य सांभाळला जातो, समतोल राखला जातो.

– श्री लोकनाथतीर्थ (उत्तर भारतातील एक उन्नत)’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment