धर्माचे भविष्य

‘हिंदु धर्म हा आदी-अनंत आहे’ हे आता विज्ञानही मान्य करत आहे. आज दिसत असलेले धर्माचे विदारक स्वरूप हे धर्माचरणात झालेल्या पालटामुळे आहे. धर्मसिद्धांत तेच आहेत. या लेखात आपण धर्माचरणाचे पालटणारे रूप तसेच धर्माचे भविष्य यांविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेऊ.

 

१. धर्माचरणाचे पालटणारे रूप

१ अ. धर्माच्या सिद्धान्तांमध्ये नाही, तर धर्माचरणाच्या तपशिलात पालट होतात !

धर्माचा, म्हणजे ईश्वरप्राप्तीचा सिद्धान्त अनादी काळापासून तोच असल्याने त्याच्यात पालट होत नाही; म्हणून धर्मात पालट होत नाही. ‘२ + २ = ४’ यात जसा काळानुसार कधीही पालट होत नाही, तसेच हे आहे. धर्माच्या सिद्धान्ताचा भाग नित्य आणि शाश्वत असतो अन् धर्माचरणाचा भाग स्थळ-काळ सापेक्ष असतो. तो भाग पालटतो. हा पालट योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी धर्मशास्त्र मार्गदर्शन करते.

१ आ. धर्माचरणाच्या तपशिलाचा परिवर्तनशीलपणा धर्मसिद्धान्ताला गाठ घालणारा असावा !

‘काही लोक `धर्म परिवर्तनशील आहे’, असे म्हणतात; पण ते योग्य नाही; कारण धर्म सिद्धान्तरूप आहे. ‘धर्म म्हणजे प्रत्यक्ष आत्मानुभूती होय’, अशी धर्माची व्याख्या स्वामी विवेकानंद करतात. आत्मानुभूती ही कधी परिवर्तनशील असू शकेल काय ? `धर्माचरणाचा तपशील परिवर्तनशील असू शकतो’, असे आपला धर्मच सांगतो, नाहीतर `संपत्कालीन धर्म आणि आपत्कालीन धर्म’, अशा धर्माच्या दोन व्याख्या धर्माने दिल्याच नसत्या. परिवर्तनशीलपणा सिद्धान्ताला गाठ घालण्याच्या दृष्टीनेच असावा लागतो. तो परिवर्तनशीलपणा स्मृतिकारांच्या आज्ञेतच असावा लागतो; म्हणजे त्यातून स्वैराचाराची उत्पत्ती होत नाही, उदा. आपला देह हा सिद्धान्तरूप आहे, असे गृहित धरू. त्यावर आपण जी वस्त्रे धारण करतो, त्याला तपशील म्हणू. तो तपशील ऋतूमानाप्रमाणे पालटत असतो. थंडीत आपण ऊन (गरम) कपडे घालतो, उन्हाळ्यात सैल आणि पातळ कपडे घालतो, तर पावसाळ्यात या दोन्ही अवस्थांच्या मध्यमात येतो. हा कपड्यांचा तपशील पालटला, तरी आपला देहरूपी सिद्धान्त पालटत नाही. हा नियम जसा जन्मापासून मरणापर्यंत चालतो, तसा प्रलयकाळापर्यंत धर्म हा सिद्धान्तरूपच असणार. प्रलयकाळातसुद्धा धर्म सुप्तरूपाने सिद्धान्तरूप असतोच.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

या संदर्भात पुढील सूत्र महत्त्वाचे आहे – ‘शब्दो नित्यः ।’, म्हणजे ‘शब्द स्थिर असतो; पण त्याचे ‘अर्थ’ पालटत रहातात. हे सत्य आपण ध्यानात ठेवले, तर जुन्या शब्दांना, स्वतःला आणि आजच्या युगाला उपयुक्त आणि समुचित असे अर्थ देणे क्रमप्राप्त आहे; मात्र शब्दाच्या मूळ धातूशी, स्वरूपार्थाशी हे अर्थ विसंगत असता कामा नयेत.’

– महर्षि विनोद

 

२. धर्माचे स्वरूप कोणाला समजते ?

धर्माचे एक अंग पालटणारे असल्याने हा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

अ. अधर्मरूपो धर्मो हि कश्चिदस्ति नराधिप ।
धर्मश्चाधर्मरूपोऽस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता ।। – महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ३३, श्लोक ३२

अर्थ : (महर्षि व्यास युधिष्ठिराला सांगतात,) हे राजा, केव्हा केव्हा धर्माला अधर्माचे रूप येते आणि अधर्माला धर्माचे स्वरूप येत असते. हे समजून घेणे शहाण्या पुरुषाचे काम आहे.

आ. नाकृतात्मा वेदयति धर्माधर्मविनिश्चयम् । – महाभारत, वनपर्व, अध्याय २१५, श्लोक १८

अर्थ : मनोनिग्रह केल्याविना धर्म कोणता आणि अधर्म कोणता, याचे निश्चित ज्ञान होत नाही.

इ. सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य दुर्ज्ञया ह्यकृतात्मभिः । – महाभारत, अनुशासनपर्व, अध्याय १०, श्लोक ६८

अर्थ : धर्माचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून ज्यांनी मनोजय केलेला नाही, त्यास ते समजणे कठीण आहे.

 

३. धर्माचे भविष्य

जगताच्या पाठीवर अनेक संस्कृती आणि पंथ नष्ट झाले असले, तरी अनंत प्रकारची संकटे धर्मावर येऊनही अजून धर्म सुरक्षित राहिला आहे. लाखो वर्षांच्या काळाच्या परीक्षेत धर्म अजूनही टिकून आहे. तो मृत्यूंजय आहे; कारण तो सत्य आहे. काळ केवळ असत्यालाच नष्ट करू शकतो. अनादी असा धर्मच अनंत काळपर्यंत टिकून राहू शकतो. धर्म हा ईश्वराचाच गुणधर्म असल्याने ईश्वराप्रमाणेच तोही नित्य आहे. हिंदूंच्या नाकर्तेपणामुळे एखाद्या वेळी पृथ्वीवर हिंदू नसतील; पण हिंदु धर्म हा ग्रंथरूपात तरी असेलच !

३ अ. इतर पंथांची आक्रमणे होऊनही धर्म टिकणे

‘बौद्ध, महम्मदी आणि ऐश (खिस्ती) या धर्मांनी (पंथांनी) देशचे देश आपल्याकडे ओढले असताही हा आर्यदेश कसा टिकला ?

१. हे तिन्ही धर्म (काही अंशी) आपल्या धर्माचीच अधिकारानुसार स्वरूपे आहेत, हे भविष्यपुराणावरून आर्यांस ठाऊक आहे.

२. इतर धर्मांत (पंथांत) नाही, ते आर्य धर्मात आहे. इतर धर्मांत (पंथांत) आहे, ते आर्य धर्मात आहे आणि आर्य धर्मात नाही, ते इतर धर्मांत (पंथांत) कोठेही नाही, हे आर्यांच्या सहवासामुळे इतर धर्मियांना (पंथियांना) कळू लागले आहे.

३. इतर धर्मांनी (पंथांनी) जरी आर्य धर्म मोडण्याची खटपट केली, तरी आर्यांच्या धर्मभेद सहिष्णुतेमुळे आर्यांचा नायनाट करणे विचारी पुरुषांना बरे वाटले नाही.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment