धर्माचरण

या लेखातून आपण धर्माचरणाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेऊ, तसेच धर्माचरण न केल्यास होणारे परिणाम, धर्माचरण करणे हे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे, खरे धर्माचरण कोणते, इत्यादींविषयीही पाहू.

 

१. स्वधर्मपालनाचे महत्त्व

१. धर्माचरण म्हणजे चातुर्वर्णियांचे वर्णाश्रमोचित आचरण. भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे –

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३५

अर्थ : आचरण्यास सोप्या अशा परधर्मापेक्षा सदोष असला, तरीही स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले, तरी श्रेयस्कर; (कारण) परधर्माचा स्वीकार करण्यात मोठे भय आहे.

भावार्थ : भगवान श्रीकृष्णाने द्वापरयुगात जेव्हा हे अर्जुनाला सांगितले, तेव्हा सर्वत्र हिंदु धर्मच होता. सध्याच्या अर्थाने `धर्मांतर करू नका’, असा त्याचा अर्थ नव्हता. त्याचा अर्थ होता वर्णाश्रमावर आधारित ज्याचा जो धर्म असेल, त्याचेच त्याने पालन करावे.

२. समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात सांगितले आहे, ‘धर्मामध्ये धर्म । स्वरूपी रहाणे हा स्वधर्म ।।’

३. वेदोक्त स्वधर्मस्थितीं । होय विषयांची विरक्ती । प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पैं माझी ।। – एकनाथी भागवत, अध्याय २१, ओवी २१०

अर्थ : वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वधर्मस्थितीने राहिले असता विषयांविषयी विरक्ती उत्पन्न होते आणि प्राणी मोक्षाला जातात, हीच माझी वेदोक्ती आहे.

एकूण काय, तर स्वधर्मानुष्ठान हा आत्मप्राप्तीकरता निश्चित आणि जवळचा मार्ग आहे.

४. शरीरस्य विनाशेन धर्म एव विशिष्यते । – महाभारत, आदिपर्व, अध्याय २१३, श्लोक २०

अर्थ : आपला प्राण खर्ची घालूनही धर्म पाळणे, हेच अधिक श्रेयस्कर आहे.

 

२. धर्माचरण करणे, हे कोणत्या घटकांवर अवलंबून असते ?

२ अ. सामाजिक वातावरण

‘मोक्ष हे मानवाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, हे महाभारतकारांनाही मान्य आहे; पण मोक्ष ही अत्यंत उन्नत अशी अवस्था असल्यामुळे ती समाजाच्या प्रगत आणि प्रगल्भ अवस्थेतच शक्य असते. ज्या समाजातील लोकांचे आचार शुचिर्भूत आणि विचार प्रगल्भ अन् पवित्र आहेत, जिथे राज्यव्यवस्था उत्तम आहे, जिथे लोकव्यवहार सुरळीत चालतात, जो समाज विद्यासंपन्न आणि पराक्रमी असून परकीय आक्रमणांपासून संरक्षण करण्यास समर्थ असतो, अशाच समाजात मोक्षसाधनेचे प्रयत्न आणि परिणती या गोष्टी शक्य आहेत, असा भारतीय तत्त्ववेत्यांचा सिद्धान्त आहे.

२ आ. व्यक्ती

१. क्षुधा निर्णुदति प्रज्ञां धर्मबुदि्धं व्यपोहति ।
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजति चैव हि ।। – महाभारत, अश्वमेधपर्व, अध्याय ९०, श्लोक ९१

अर्थ : भुकेकंगालपणामुळे माणसाचा बुद्धीभ्रंश होतो आणि त्याच्या धर्मनिष्ठेचाही लोप होतो. क्षुधा माणसाचे ज्ञान नष्ट करून त्याचे धैर्यही हिरावून घेते.’

यासाठीच म्हटले आहे की, अज्ञानात खितपत पडलेल्या हीनदीन आणि भुकेकंगाल असलेल्या समाजाचा आणि मोक्षाचा काडीइतकाही संबंध नाही.

२. यथा यथैव जीवेदि्ध तत्कर्तव्यमहेलया ।
जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन् धर्ममवाप्नुयात् ।। – महाभारत, शान्तिपर्व, अध्याय १४१, श्लोक ६५

अर्थ : ज्या ज्या प्रकारे जीविताचे संरक्षण होईल, ते ते निःशंक करावे. मरण्यापेक्षा जगणे, हेच श्रेयस्कर आहे; कारण जिवंत राहिल्यासच पुढे धर्माचरण करता येईल.

३. यस्यैव बलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः । – महाभारत, शान्तिपर्व, अध्याय १५२, श्लोक १८

अर्थ : ज्याच्या अंगी सामर्थ्य आणि तेज असते, तोच मनुष्य धर्माचरणास समर्थ होतो.

४. धर्मार्थकाममोक्षाख्यं य इच्छेच्छ्रेय आत्मनः ।
एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनम् ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ४, अध्याय ८, श्लोक ४१

अर्थ : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ साधल्याने कल्याण प्राप्त होते. हे कल्याणकारक पुरुषार्थ साधण्यास श्रीहरीच्या चरणांची सेवा करणे, हेच एक साधन आहे.

२ ई. धर्मप्रमुख

धर्मप्रमुखाचे महत्त्व पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

१. प्रत्येकाने आपापले दायित्व पाळावयाचे असते; पण प्रत्येक जण आपले दायित्व टाळायचा प्रयत्न करतो.

२. सर्वांनी एकाच ठिकाणी यावे; म्हणून एक उपासनापद्धत निर्माण केली गेली; पण देशभेद आणि कालभेद याप्रमाणे संघातील व्यक्ती उपासना सोडतात. यामुळे संघाचे सांघिक अस्तित्व धोक्यात येते.

३. नियन्ता चेन्न विद्येत न कश्चिद्धर्ममाचरेत् । – महाभारत, विराटपर्व, अध्याय ६३, श्लोक ४३

अर्थ : (संघाचे) नियमन करणारा कोणी नसेल, तर कोणीही धर्माप्रमाणे वागणार नाही.

संघ हा समूहप्रिय असतो; पण शिस्तप्रिय नसतो. त्याला शिस्त लावण्यासाठी अनुशासनाची आवश्यकता असते. अनु म्हणजे अनुकरण करणे, पाळणे आणि शासन म्हणजे नियंत्रण. वरील अडचणींवर मात करून संघ एकत्रित ठेवण्याचे कार्य संघनायकाचे, म्हणजे धर्मप्रमुखाचे असते. त्यालाच अग्रेसर असे म्हणतात. अग्र म्हणजे पुढे आणि ‘सृ सर’ म्हणजे जाणारा.

 

३. धर्माचरण न होणे – क्षम्य आणि अक्षम्य

धर्माचरण न होण्याची कारणे दोन आहेत – एक अंतस्थ आणि दुसरे बाह्य. अंतस्थ म्हणजे योगाचरण करतांना देहाला विसरल्यामुळे राहिलेला धर्माचार. बाह्य म्हणजे प्रवास, व्याधी किंवा एखाद्या प्रकारचा आपत्काल होय. या दोन्ही प्रसंगी धर्माचरण करावयाचे राहिले, तर सामान्यांना वेद क्षमा करतो. इतर कारणे असतील, तर ती अक्षम्य होत.

 

४. धर्माचरण न होण्याचा परिणाम

अ. दर्पो नाम श्रियः पुत्रो जज्ञेऽधर्मादिति श्रुतिः । – महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ९१, श्लोक २४

अर्थ : दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे, तो तिला अधर्मापासून झाला, असे ऐकण्यात येते.

आ. धर्म एव हतो हनि्त धर्मो रक्षति रक्षित:। – महाभारत, वनपर्व, अध्याय ३१४, श्लोक १२८

अर्थ : धर्माचे पालन न करणार्‍याचा विनाश होतो आणि जो धर्माचे काटेकोर पालन करतो, त्याचे रक्षण धर्म (म्हणजे ईश्वर) करतो.

इ. ‘हिंदु धर्माप्रमाणे आचरण न केल्यामुळे सध्या सर्वत्र वादळे, भूकंप, अपघात, अतीवृष्टी, स्वचक्र, परचक्र इत्यादी उत्पात घडत आहेत.’ – प. पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र

 

५. धर्माचरण करायला लावणे

‘केवळ उपदेशाने माणूस वळत नाही. त्याला वळवण्यासाठी पारितोषिकाच्या लोभाची किंवा दंडाच्या भयाची जोड द्यावी लागते. धर्मशास्त्रात किंवा पुराणांत निरनिराळ्या धार्मिक कृत्यांची फलश्रुती सांगितलेली असते. त्या फलश्रुतीतील त्या त्या गोष्टींच्या लोभाने माणसे धर्माचरण करतांना दिसतात. अपप्रवृत्तीच्या लोकांवर उपदेशाची किंवा फलश्रुतीची मात्रा चालत नाही. अशांना दंडाचाच अवलंब करून धर्ममार्गावर आणावे लागते. धर्माचरण करवून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी धर्माची अंगे पुढीलप्रमाणे –

५ अ. दंड्य-पारितोष्यनिर्णय

यालाच न्याय असेही म्हणता येईल. यात अमक्या मनुष्याने अमके-तमके कृत्य धर्म किंवा अधर्म केले आहे, म्हणून त्याला अमकातमका दंड करावा किंवा अमके-तमके पारितोषिक द्यावे, असे ठरवले जाते.

५ आ. शासन

अधार्मिकाला पकडणे, त्याला दंड करणे आणि धार्मिकाला पारितोषिक देणे, या गोष्टी राजसंस्थेकरवी (सरकारकडून) केल्या जातात.

वरील अंगे एका व्यक्तीकडे न रहाता ती भिन्न व्यक्ती किंवा भिन्न संस्था यांच्याकडे असावी. ती जर एक व्यक्ती, संस्था किंवा वर्ग यांच्याकडे एकवटली, तर त्यापासूनही महान भय निर्माण होईल. भागवतातील वेन राजाची कथा हे याचे उदाहरण आहे. वेनाने दंड्य-पारितोष्यनिर्णय आणि शासन ही दोन्ही कार्ये स्वतःकडे घेतली आणि त्यामुळे सर्वत्र भय आणि अस्वास्थ्य निर्माण झाले. या आपत्तीतून मुक्त होण्यासाठी ऋषींनी एकत्र मिळून वेन राजालाच ठार केले आणि त्याच्या स्थानी त्याचा पुत्र पृथु याची स्थापना केली.’

 

६. धर्माचा अर्थ समजून धर्माचरण करणे, हे खरे धर्माचरण !

यस्य धर्मो हि धर्मार्थं क्लेशभाङ्न स पणि्डतः ।
न स धर्मस्य वेदार्थं सूर्यस्यान्धः प्रभामिव ।। – महाभारत, वनपर्व, अध्याय ३४, श्लोक २३

अर्थ : (तत्त्व न जाणता) केवळ धर्मासाठी जो धर्माचरण करतो, तो शहाणा नसून दुःखाचा वाटेकरी होणारा असतो. आंधळ्याला ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा समजत नाही, त्याप्रमाणे त्याला धर्माचा अर्थ समजत नाही.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment