धर्माचे प्रकार (भाग २)

Article also available in :

धर्माचे उर्वरित प्रकार या लेखात पाहू.

 

९. श्रौत, स्मार्त आणि शिष्ट यांचा धर्म

‘यांतील श्रौतधर्म सर्वांत महत्त्वाचा आणि शिष्टधर्म सर्वांत कनिष्ठ होय.

९ अ. श्रौतधर्म (श्रौताचार)

श्रुति म्हणजे वेद. यात ज्यांचे विवेचन केलेले असते, जसे अग्नीची उपासना, दर्शपूर्णमास आणि सोमयाग यांच्यासारखे यज्ञ, यांचा समावेश श्रौतधर्मात करण्यात आला आहे.

९ आ. स्मार्तधर्म (स्मार्ताचार)

स्मृतींमध्ये वर्णन केलेले वर्णांचे आणि आश्रमांचे नियम अन् आचार यांचा समावेश स्मार्तधर्मात करण्यात आला.

९ इ. शिष्टधर्म (शिष्टाचार)

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या आचारावरून ज्यांचे ज्ञान होते, अशा नियमांचा समावेश शिष्टाचारात करण्यात आला.’

 

१०. स्त्रीधर्म

अ. भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तम् ।
अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ।। – वाल्मीकिरामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग २४, श्लोक २६

अर्थ : (राम कौसल्येला म्हणतो,) ‘‘जी स्त्री देवादिकांस नमस्कार करत नाही किंवा त्यांचे पूजन करत नाही, केवळ भर्त्याची (पतीची) शुश्रूषा करते, त्या स्त्रीला उत्कृष्ट स्वर्ग प्राप्त होतो.’’

आ. पतिर्हि देवो नारीणां पतिर्बन्धुः पतिर्गतिः ।
पत्या समा गतिर्नास्ति दैवतं वा यथा पतिः ।। – महाभारत, अनुशासनपर्व, अध्याय १४३, श्लोक ५५

अर्थ : पती हाच स्त्रियांचा देव, पती हाच बांधव आणि पती हेच आश्रयस्थान. ‘स्त्रियांना पतीविना गती नाही.’ पती हा खरोखर देवासमान होय.

इ. विष्णु आणि तुळस : पुराणात जालंधर या दैत्याची कथा आहे. जालंधराची पत्नी वृंदा मोठी पतीव्रता होती. जालंधराने देवांवर अनेक वेळा आक्रमण केले; पण प्रत्येक वेळी वृंदेच्या पातिव्रत्यामुळे त्याचे देवांपासून रक्षण झाले. त्यामुळे तो उन्मत्त झाला होता. याकरता एकदा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य खंडित केले. ही गोष्ट कळल्यावर वृंदेने विष्णूला ‘तू दगड होशील’, असा शाप दिला. विष्णूनेही तिला ‘तू वनस्पती होशील’, असा शाप दिला. परिणामस्वरूप भगवान विष्णु शाळिग्राम झाले आणि वृंदा तुळस झाली. आपण शाळिग्रामाला तुळस वहातो आणि प्रबोधिनी एकादशीला तुळशीचे भगवंताशी लग्नही लावतो.

ई. ‘वाचस्पती मिश्र हा इ.स. च्या ९ व्या शतकातील एक प्रकांड पंडित आणि टीकाकार. वैशेषिक दर्शन सोडून इतर सर्व दर्शनांवर याने टीका लिहिल्या आहेत. प्रत्येक दर्शनावर याने आपले स्वतंत्र विचार प्रकट केले आहेत; म्हणून याला ‘सर्वतंत्रस्वतंत्र’ अशी गौरवपूर्ण उपाधी मिळाली होती. त्याच्या काळातील हा अद्वैतमताचा सर्वश्रेष्ठ आचार्य होता. त्याच्यानंतरच्या सर्व आचार्यांनी त्याची मते प्रमाण मानली आहेत. शांकरभाष्यावर याने ‘भामती’ नामक टीका लिहिली आहे. शांकरमत समजून घेण्यासाठी या टीकेचे अध्ययन आवश्यक मानलेले आहे. ग्रंथलेखनात हा किती तन्मय होत असे आणि त्या वेळी बाह्य जगताचा त्याला किती विसर पडत असे, यासंबंधी एक आख्यायिका सांगतात, ती अशी – एकदा शारीरक भाष्यावर टीका लिहीत असता रात्री त्याच्या खोलीतील दिवा विझला. त्याच्या पत्नीने घरातून येऊन पुन्हा दिवा लावला आणि काही वेळ ती तिथे तशीच उभी राहिली. तिला उभी राहिलेली पाहून वाचस्पती मिश्राने तिला विचारले, ‘‘तू कोण आहेस ?’’ पत्नीने उत्तर दिले, ‘‘मी आपली दासी आहे.’’ त्यावर त्याने पुन्हा विचारले, ‘‘तुला माझ्याकडे काही मागायचे आहे का ?’’ तिने उत्तर दिले, ‘‘पतीसेवा हा हिंदु स्त्रीचा परम धर्म आहे. आपल्या चरणांची सेवा करायला मिळाल्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. मला दुसरी कोणतीच इच्छा नाही. आपल्या चरणांवर मस्तक ठेवून आपल्या आधीच या जगाचा निरोप घ्यावा, एवढीच माझी इच्छा आहे.’’ ते बोलणे ऐकून ‘ही आपली पत्नी आहे’, हे वाचस्पतीच्या ध्यानात आले आणि तो प्रसन्न झाला. तो तिला म्हणाला, ‘‘हिंदु स्त्रियांमध्ये तू आदर्श आहेस. हा देह क्षणभंगुर आहे. त्याचा नाश होणारच आहे; पण मी तुला अमर करीन. माझी ही टीका तुझ्या ‘भामती’ या नावानेच प्रसिद्ध होईल.’’ अशा प्रकारे त्याने आपल्या शांकरभाष्यावरील टीकेचे नाव ‘भामती’ असे ठेवले आणि पत्नीचे नाव अमर केले. लोकही त्याला भामतीकार म्हणूनच ओळखू लागले.’

उ. ‘प्रश्न : पतीचे केव्हा ऐकू नये ?
श्री गुलाबराव महाराज : वैदिक धर्म सोडला असेल, तेव्हा आणि रोगी असून अपथ्य मागेल, तर पतीचेच काय, पण कोणाही वडिलांचे (वडीलधार्‍यांचे) ऐकू नये.’

 

११. सतीधर्म

पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासह आत्मदहन करणार्‍या स्त्रीला `सती’ म्हटले जाते. ‘जेव्हा एखादी विधवा पतीच्या चितेवर चढून त्याच्या प्रेतासह जळून जाते, तेव्हा त्या कृत्याला सहमरण अथवा सहगमन अथवा अन्वारोहण असे म्हणतात. जेव्हा पतीचे अन्य ठिकाणी दहन केलेले असते आणि त्याची विधवा पतीच्या अस्थींसह अथवा पादुकांसमवेत अथवा दुसरे काही स्मारक नसेल तर नुसतीच जाळून घेते, त्या क्रियेला अनुमरण म्हणतात.’

`मूल लहान असेल, स्त्री गरोदर असेल किंवा त्या वेळी ती रजस्वला असेल, तर तिने सहगमन करू नये.’

११ अ. सती जाण्यामागील तत्त्व

प्रश्न : ‘पतीसह ज्या स्त्रिया सती जातात, त्या प्रेमावाचून कशा जातात ?
श्री गुलाबराव महाराज : प्रेमाने ज्या सती जातात, त्या सर्व नरकात जातात. केवळ ‘सहगमन करावे’ या शास्त्रामुळे ज्या सती जातात, त्या मात्र मुक्त होतात.

प्रश्न : मग प्रेमाने केलेला धर्म काहीच उपयोगाचा नाही ?
श्री गुलाबराव महाराज : अर्थात नाही. धर्मशास्त्र सांगेल, तेथेच प्रेम ठेवले पाहिजे.’

खरा शिष्य गुरु नरकात जरी गेले, तरी त्यांच्यासह नरकातही जाण्यास सिद्ध असतो. त्याचप्रमाणे खरी पतीव्रता पतीच्या निधनानंतर ‘आता आपल्या जीवनात काही अर्थ नाही’ या विचाराने सती जात असते. तिलाच मुक्ती मिळत असते. केवळ पतीवर असलेल्या प्रेमापोटी, म्हणजे त्याच्या विरहाचे दुःख सहन न झाल्यामुळे, म्हणजे भावनेपोटी सती जाणार्‍या स्त्रीला मुक्ती मिळत नाही, असे वरील विवेचनातून श्री गुलाबराव महाराजांना सुचवावयाचे आहे.

 

१२. व्यष्टी आणि समष्टी धर्म

‘धर्म दोन लक्षणात्मक आहे – प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती धर्म हा राष्ट्राचा असू शकतो. अर्थात त्यात समष्टीगतता आणि व्यष्टीगतता यांचा विचार येतोच. या विचारालाच सापेक्षता म्हणू शकतो. निवृत्ती धर्म हा केवळ व्यष्टीगतच असू शकतो. त्यामुळे व्यष्टीचा धर्म अहिंसा असू शकतो; कारण त्या ठिकाणी व्यवहार वर्ज करणे, हा साधनेचा मोठा भाग असतो. तसे राष्ट्राचे नाही़ त्या ठिकाणी व्यवहाराशी नित्य संबंध येतो. तेव्हा त्या ठिकाणी अहिंसा जे ब्राह्मतेज आहे, त्याच्या जोडीला क्षात्रतेज, असावे लागते. त्यामुळे त्या व्यवहारात अहिंसेमुळे सत्याचा नाश होतो, ती अहिंसा टाळली जाते, म्हणजे त्या ठिकाणी हिंसाच अहिंसा (धर्म) होते आणि ज्या सत्यामुळे अहिंसेचा नाश होत असेल, असे व्यवहार टाळावे लागतात. असे व्यवहार टाळतांना त्या ठिकाणी असत्यच सत्य होते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

१३. राष्ट्रधर्म (समष्टी धर्म)

राष्ट्राच्या हितासाठी आपली साधना म्हणून प्रयत्न करणे, हा राष्ट्रधर्म झाला.

 

१४. इतर

कुळधर्म, स्वभावधर्म, नेमधर्म आदी विशिष्ट अर्थवाचक अनेक धर्म सांगितलेले आहेत.

हे वाचून हिंदूंमध्ये धर्माभिमान वृद्धींगत व्हावा हीच अपेक्षा !

धर्माचे प्रकार जाणून घेण्यासाठी या लेखाचा प्रथम भाग ‘धर्माचे प्रकार (भाग १)’ वाचा ! त्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment