धर्मसिद्धान्त (भाग २)

धर्मसिद्धांचे पुढील सिद्धांत या लेखात पाहू.

लेखाचा प्रथम भाग वाचण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा.

 

६. पुरुषार्थकल्पना

‘पुरुष’ हा शब्द ‘पुरस्’ (म्हणजे पुढे पुढे जाणारा) यावरून व्युत्पादिला आहे. ‘पुरुषार्थाची कुवत असलेला’, असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच पुरुष हा शब्द लिंगवाचक नसून गुणवाचक आहे. वैदिक व्याकरणात पुरुष हा शब्द प्रथम, द्वितीय आणि उभय पद या तिन्ही पदांत चालतो. ‘धर्माचे साध्य सिद्ध करण्यासाठी झटणे’, यालाच पुरुषार्थ म्हटले जाते. हे पुरुषार्थ चार असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. शुद्ध आचरण अर्थात धर्म, अर्थ (चांगल्या मार्गाने द्रव्य संपादन करणे), काम अर्थात शारीरिक आणि मानसिक सुखप्राप्ती आणि भवसागरातून जिवाची मुक्ती अर्थात मोक्ष, हे ते चार पुरुषार्थ होत. आरंभी पहिले तीनच पुरुषार्थ मानत आणि त्यांना त्रिवर्ग म्हणत. उपनिषद्काळात मोक्षाला पुरुषार्थाचे स्थान मिळून चतुर्विध पुरुषार्थ ही कल्पना रूढ झाली.

६ अ. धर्माएवढेच अर्थ आणि काम यांचेही महत्त्व

कामामुळे स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणात परस्परांविषयी आकर्षण निर्माण होते आणि त्यातूनच प्रजोत्पत्ती होते. ‘संभोगक्रिया म्हणजे यज्ञातील एक विधीच असून, स्त्रीरूपी अग्नीत पुरुष आपले बीज अर्पण करतो आणि त्यातूनच मानव जन्माला येतो’, असे म्हटले आहे. ‘कामप्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास उन्मादादी दोष उत्पन्न होतात आणि शरिराचे आरोग्य टिकत नाही’, असे कामसूत्राचा टीकाकार यशोधर सांगतो.

‘अन्य तीन पुरुषार्थांत काम म्हणजे सुखोपभोग हे ध्येय सर्वांत न्यून प्रतीचे मानण्यात येते. आमच्या धर्मशास्त्रकारांनी काम या पुरुषार्थाचा सर्वस्वी निषेध केलेला नाही. मनुस्मृतीत (५-५६) असे म्हटले आहे की, सर्व प्राण्यांची स्वाभाविक प्रवृत्ती भूक, तहान, विषयभोग यांसारख्या सामान्य आणि क्षुद्र वासनांची तृप्ती करून घेण्याकडे असते. मनुष्य हा इतर प्राण्यांहून अधिक उच्च प्रतीचा असल्यामुळे त्याने अशा वासनांवर विशेष भर न देता त्यांच्यापासून निवृत्त होण्याचा अथवा त्या वासनांचे नियमन करण्याचा प्रयत्न करावा.’

‘महाभारतात धर्म, अर्थ आणि काम यांची महती अनेक ठिकाणी गायिली आहे आणि ती वाचतांना एक गोष्ट ध्यानात येते ती ही की, भारतीय तत्त्ववेत्ते त्रिविध पुरुषार्थाचे सारखेच महत्त्व मानतात. ‘धर्माचे महत्त्व फार याविषयी वादच नाही; पण केवळ त्याकडे जास्त लक्ष देऊन जर कोणी अर्थ आणि काम यांची हानी करू लागला, तर त्याचा नाश झाल्यावाचून रहाणार नाही’, असे महाभारतात अनेक वेळा अनेक विचारवंतांनी सांगितले आहे.’

६ आ. धर्म आणि मोक्ष यांच्या कैचीत ‘अर्थ’ अन् ‘काम’

नीतीशास्त्राच्या दृष्टीने पुरुषार्थकल्पना फार मौलिक आहे. धर्म आणि मोक्ष यांच्या कैचीत ‘अर्थ’ अन् ‘काम’ आहेत. धर्मापासून प्रारंभ करून शेवटी मोक्ष हा पुरुषार्थ साध्य करायचा आहे. केवळ धर्म किंवा मोक्ष हे जीवनाचे साध्य होऊ शकत नाहीत. धर्म-मोक्षांना अर्थ-कामांचाही आधार लागतो; मात्र ते दोन्ही धर्माला अनुसरूनच असले पाहिजेत. धर्माने वागून अर्थ म्हणजे धनप्राप्ती (धर्मेण अर्थः ।) आणि कामनापूर्ती (धर्मेण कामः ।) करावी. ‘धर्माला अविरोधी असे काम ही माझी विभूती आहे’, असे भगवंताने गीतेत (अध्याय ७, श्लोक ११) म्हटले आहे. आपस्तंबधर्मसूत्रही (प्रश्न ११, पटल ८, काणि्डका ७, सूत्र २२-२३) तसेच सांगतो. भारतीय शास्त्रकारांनी अर्थ आणि काम यांना पुरुषार्थांत समाविष्ट करून मानवाच्या लौकिक जीवनाला नैतिक अन् धार्मिक अधिष्ठान मिळवून दिले.

त्याचप्रमाणे स्वार्थ आणि परार्थ यांत संवादित्व स्थापून व्यक्ती आणि समाज यांचा परस्परसंबंध दृढ केला. पुरुषार्थांतील मोक्ष हा सर्वांत श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणजे मानवी आयुष्याचे ध्येय मानले जाते. मोक्ष हा धर्मापेक्षा श्रेष्ठ नक्कीच; पण धर्मकर्तव्य हे आधी पूर्ण केले पाहिजे. ज्याला एक पाऊलभर उडी मारता येत नाही, त्याला विशाल समुद्र कसा पार करता येणार ? येथेच धर्मकर्तव्याची महती स्पष्ट होते. पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याकरिता सत्य, अहिंसा इत्यादी नैतिक गुण आचरणात आणण्याचा प्रत्येकाने शक्य तितका प्रयत्न करावयाचा असतो.

मोक्ष आणि निर्वाण हे समानार्थक आहेत. सांख्य, योग, वेदान्त इत्यादी दर्शनांनी मोक्ष शब्द स्वीकारला आणि जैन-बौद्धांनी निर्वाण शब्द स्वीकारला. ‘निर् + वान (इच्छा, वासना) = सर्व प्रकारच्या इच्छा किंवा वासना दूर होणे, नष्ट होणे’, अशी निर्वाण या शब्दाची एक व्युत्पत्ती आढळते.

६ इ. युग आणि पुरुषार्थ

पुढील सारणीत कोणत्या युगात कोणता पुरुषार्थ प्रभावशाली होता / आहे ते दिले आहे.

१. धर्म त्रेता
२. अर्थ द्वापर
३. काम कलि
४. मोक्ष सत्य

 

७. अधर्माचरणींना प्रतिबंध (दंड) आणि अहिंसा

७ अ. अधर्माचरणाचा प्रतिबंध न केल्यास
अधर्माचरणी व्यक्तीच्या अधर्माचरणाचे पाप आपल्याला लागणे

‘धर्माचरण करणार्‍या लोकांनी अधर्माचरण करणार्‍या लोकांना प्रतिबंध करावा कि नाही, या प्रश्नाच्या उत्तराविषयी हा खुलासा आहे. इतरांच्या अधर्माचरणाने आपल्याला तर दुःख होईलच; पण परिणामी त्या अधर्माचरणी मनुष्यालाही दुःखच भोगावे लागेल. यासाठी त्याच्या अधर्माचरणाचा प्रतिबंध करणेच भाग आहे. तसा तो न केल्यास त्याच्या अधर्माचरणाचे पाप अंशतः आपल्याही डोक्यावर येईल.

७ आ. अधार्मिक व्यक्तीला दंड करणे, ही हिंसा नव्हे !

अधर्माचरणाचा प्रतिबंध शक्य तर सामाने करावा हे ठीक; पण साम निरुपयोगी ठरत असल्यास दंडही करावा, असे सांगितले आहे. अधार्मिक माणसाला असा दंड करणे म्हणजे हिंसा नव्हे. हिंसा याचा अर्थ दुःख असा न घेता अहित टाळणे असा घेतला पाहिजे. अधार्मिकाला दंड करण्यात त्याला दुःख देणे हा हेतु नसतो, तर त्याचे अहित टळावे, त्याला धर्माचरणाचे उच्च सुख प्राप्त व्हावे, हाच असतो. अहिंसेचा हा अर्थ नीट लक्षात घेतल्यास हिंसा-अहिंसेचा गोंधळ होणार नाही.

७ इ. जगात अहिंसक असा कोणीही नाही !

के न हिंसन्ति जीवान्वै लोकेऽसि्मन्द्विजसत्तम ।
बहु संचिन्त्य इह वै नास्ति कशि्चदहिंसकः ।।
अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम ।
कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ।।
– महाभारत, वनपर्व, अध्याय १९९, श्लोक २८, २९

अर्थ : हे द्विजश्रेष्ठा, या लोकात जिवांची हिंसा कोण करत नाही ? पुष्कळ विचार केला असता असे दिसते की, (या जगात) अहिंसक असा कोणीही नाही. अहिंसेकरता झटणार्‍या यतींच्या हातूनही हिंसा घडतेच; मात्र ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने फार थोडी घडते.

अहिंसा हे धर्मतत्त्व नसून ‘अल्प, अत्यल्प हिंसा’, हे धर्मतत्त्व आहे. शासकीय कामकाजात हिंसेकडे ज्याची नेमणूक झालेली असेल, त्याला ‘हिंसा करणे’, हेही कर्तव्य होऊन बसते. शेतीमध्येही हिंसा होतेच आणि मानवी जीवन चालण्याच्या दृष्टीने ती हिंसा अपरिहार्य ठरते.’

 

८. पुनर्जन्म

मनुष्याचा जीव त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या योनींत जन्म घेतो. ‘या जन्मात केलेल्या काही पाप-पुण्याचे फळ पुढील जन्मात मिळते’, असा कर्मसिद्धान्त आहे. मनुष्य पूर्वसंचिताप्रमाणे म्हणजे पूर्वजन्मातील कर्माला अनुसरून या जन्मात सुखदुःख भोगतो. कर्माचे फळ भोगावेच लागते. जिवाचे संसरण (फेरा) हिंदु धर्मातील सर्व पंथांनी मान्य केले आहे. या ‘संसरणातून मुक्त होणे, जन्ममरणाच्या आणि पुनर्जन्माच्या फेर्‍यांतून सुटणे’, यालाच मोक्ष म्हणतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग किंवा गुरुकृपायोग यांमुळे मनुष्य मुक्त होऊ शकतो.’

 

९. स्वर्ग आणि नरक

कर्मफलन्यायानुसार मनुष्याने वर्तमान जन्मात केलेल्या कर्मांची फळे त्याला वर्तमान किंवा पुढच्या जन्मात भोगावीच लागतात. मोठे पाप आणि पुण्य यांचे फळ वर्तमान जन्मातच मिळते. मनुष्य एका जन्मात पाप आणि पुण्य निर्माण करणारी इतकी कृत्ये करतो की, त्यांची फळे त्याला त्याच जन्मात भोगणे शक्य होत नाही.

एखादी व्यक्ती मृत झाल्यावर समजा त्या व्यक्तीची इतर जिवांशी देवाण-घेवाण शिल्लक राहिली असल्यास आणि त्या इतर जिवांची भूलोकी जन्म घेण्याची वेळ आली असेल, तर देवाण-घेवाण हिशोब पूर्ण होण्यासाठी त्या व्यक्तीचाही भूलोकी जन्म होतो आणि भूलोकी ती पाप-पुण्याची फळे भोगते. समजा अन्य जिवांची भूलोकी जन्म घेण्याची वेळ आली नसेल, म्हणजेच काही कालावधी शिल्लक असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या कर्मांनुसार स्वर्ग किंवा नरक यांची प्राप्ती होते. पापांची फळे भोगण्यासाठी ती व्यक्ती नरकात जाते, तर पुण्याची फळे भोगण्यासाठी ती व्यक्ती स्वर्गात जाते. तेथे ही फळे भोगून झाल्यानंतर मग ती व्यक्ती भूलोकी जन्म घेते.

 

१०. सदेह मुक्ती

देहात असतांनाही एखादी व्यक्ती परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकते, याची प्रचीती देणारे अत्युच्च पातळीचे कित्येक ऋषीमुनी, साधु, संत, महात्मे होऊन गेले आहेत आणि आजही आहेत.

येथे लक्षात घेण्यासारखे एक महत्त्वाचे सूत्र हे की अन्य कोणत्याही पंथाचे सिद्धांत एवढे श्रेष्ठ आणि पूर्णत्वाला नेणारे नाहीत. यामुळे हिंदूंनो, आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगा ! साधना करून मनुष्य जीवनाचे सार्थक करून घ्या !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment