हिंदु धर्म

लोकशाही असलेल्या आपल्या भारतात ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द वरचेवर आपल्या कानावर पडतो; परंतु ‘हिंदु धर्मच खर्‍या अर्थाने सर्वधर्म (पंथ) समभाव मानणारा धर्म आहे’, हे आपणास ठाऊक नाही. प्रस्तूत लेखात हिंदु धर्म म्हणजे नेमके काय, त्याचे महत्त्व, त्याची अद्वितीय वैशिष्ट्ये यांविषयी या पहाणार आहोत. याबरोबरच ‘हिंदुत्ववाद’, ‘राजकीय हिंदु’, ‘हिंदु कोणाला म्हणावे’, ‘आस्तिक आणि नास्तिक’ यांसारख्या अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांचाही या लेखातून वेध घेण्यात आला आहे.

 

सर्वधर्मसमभाव म्हणजे एक निरर्थक शब्द !

सर्वधर्मसमभाव या शब्दाला काहीच अर्थ नाही; कारण जगात धर्म एकच आहे आणि तो म्हणजे हिंदु धर्म. इतर सर्व पंथ, नाहीतर संप्रदाय आहेत. याचे कारण हे की, फक्त धर्मातच व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग हा सिद्धांत सांगितला आहे. प्रत्येकाला आजाराप्रमाणे निरनिराळे औषध असते, तसेच हे आहे. याउलट सर्व पंथ आणि संप्रदाय यांत सर्वांना एकच साधना सांगितली आहे. सर्व रुग्णांना एकच औषध द्यावे, तसेच हे आहे. यामुळेच हिंदु धर्मातील साधकांची आध्यात्मिक उन्नती जलद होते, तर इतर पंथ आणि संप्रदाय यांची शिकवण अतिशय मर्यादित असल्याने त्या मार्गांनी जाणार्‍यांची फारच थोडी प्रगती होते किंवा अधोगतीही होते.

– प. पू. डॉ. आठवले

 

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

१ अ. हिंदु शब्दाची विस्तारित व्युत्पत्ती

‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।’ अशी ‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती `मेरुतंत्र’ नामक ग्रंथात दिली आहे. ‘हीनान् गुणान्’ म्हणजे हीन, कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा. रज-तमात्मक हीन गुणांचा आणि त्यामुळे होणार्‍या कायिक, वाचिक आणि मानसिक अशा हीन कर्मांचा जो तिरस्कार करतो, त्याला आणि अखंड सत्त्वप्रधान वृत्तीत रममाण झाल्यामुळे ईशभजन हेच जो आपल्या जीवनाचे सार मानून ईश्वरप्राप्ती करून घेतो आणि समाजाला मार्गदर्शन होण्यासाठी अजोड कर्मयोगाचे आमरण आचरण करतो, त्याला ‘हिंदु’ म्हणावे, अशी हिंदु शब्दाची विस्तारित व्युत्पत्ती आहे. म्हणजेच हिंदु ही एक वृत्ती (सत्त्वप्रधान) आहे. तिचा अर्थ ‘साधक’ असा आहे. बाह्यांगाने कोणी मुसलमान, खिस्ती, यहुदी, पारशी इत्यादी असला, तरी जर तो रज-तम प्रवृत्तींचा नाश करणारा सत्त्वप्रधान साधक असला, तर तो हिंदुच होय; म्हणून हिंदु धर्मच खर्‍या अर्थाने सर्वधर्म (पंथ) समभाव मानणारा धर्म आहे.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

२. वैशिष्ट्ये

 

२ अ. हिंदु अध्यात्माचे एकमेव शाश्वत ध्येय काय ?

‘मानवातील ईश्वराचे दर्शन घडविणे,हे हिंदु अध्यात्माचे एकमेव शाश्वत ध्येय आहे, मानवातील ईश्वर प्रकट करणे,भारतीय जनतेच्या आर्थिक जीवनाची पुनर्रचना करावयाची खटपट असो किंवा पारतंत्र्यातील भारतीय जनतेच्या मुक्तीसाठी करावे लागणारे महान झगडे असोत, दोन्ही धडपडीत वर उल्लेखिलेले आपले शाश्वत ध्येय सिद्ध करण्यासाठी हिंदु अध्यात्म झटत आहे.’

– श्री अरविंद (वंदेमातरम्, २४ जून १९०८)

२ आ. सर्वांवर प्रेम करण्याचे शिक्षण आणि आत्यंतिक विचारस्वातंत्र्य देणारा धर्म

सर्वांवर प्रेम करण्याचे शिक्षण आणि आत्यंतिक विचारस्वातंत्र्य देणारा धर्म ‘दुसर्‍यावर प्रेम करण्याच्या कलेचे शिक्षण आपला धर्म देत असतो. ‘दुसर्‍यावर प्रेम करणे कठीण किंबहुना अशक्यच आहे’, असे पुष्कळांचे म्हणणे असते. त्यांना आपल्या धर्मशिक्षणाची ओळख झाली नाही, असे खेदाने म्हणावे लागते; कारण दुसर्‍यावर प्रेम करतांना तो असंतुष्ट झाला, तर प्रेम करणारा मनुष्य दुःखी होत असतो; कारण दुसर्‍याच्या असंतुष्टतेचे कारण ‘माझा त्याच्यावर प्रेम करण्यातला न्यूनपणा (कमीपणा)’ हे आहे, असे त्याला वाटत असते. याचे उत्तम उदाहरण रामराज्यातील रजकाच्या प्रसंगाने सांगता येईल.

रामराज्यात एका रजकाला भूमंडलाच्या एका लोकमान्य, राजमान्य आणि धर्ममान्य असलेल्या, तसेच एकपत्नी, एकवाणी आणि एकवचनाचे अखंड व्रत आमरण चालविणार्‍या राजाच्या परमसाध्वी धर्मपत्नीच्या विरुद्ध विचार आणि भाषण करायला प्रतिबंध केला गेला नाही. लौकिक मनुष्य, वानरे, भालू, राक्षस त्याचप्रमाणे अलौकिक महर्षी, देवता यांच्या साक्षात सीतेची अग्नीपरीक्षा झाली होती. असे असतांनाही एक रजक राजाविरुद्ध आपले विचार मांडू शकला. रामाला त्या रजकाचे वर्तन अयोग्य असल्याचे समजत असतांनासुद्धा त्याने असा विचार केला, ‘त्या रजकाला दंड देऊन एकाचे तोंड बंद करता येईल; पण सहस्रो मुखांतून त्याचे विचार बाहेर पडतील आणि त्यानंतर त्या सर्वांचा प्रतिकार करतांना राज्यात अराजक माजेल. तेव्हा व्यवहाराद्वारेच आपण जनतेचे विचार पालटू शकू, दंडाद्वारे नाही.’

विचार आणि भाषण यांचे स्वातंत्र्य हे परमावश्यकच आहे. वास्तविक स्वतंत्र राष्ट्राचे ते भूषणच आहे आणि भारतीय संस्कृतीने त्याचा नेहमी आदरच केलेला आहे. या देशात चार्वाक, शून्यवादी, द्वैती, अद्वैती असे अनेक प्रकारचे दार्शनिक होऊन गेले. त्यांची मते परस्परविरोधी होती आणि त्यांच्यात नेहमी विचारसंघर्ष चालू राहिला. त्यांच्यात कधीही एकवाक्यता झाली नाही; पण या राष्ट्राने केव्हाही त्यांचे भाषण किंवा विचार यांवर बंदी आणली नाही. विचारप्रणालीच्या भेदामुळे परदेशांप्रमाणे त्यांना केव्हाही फासावर लटकविले गेले नाही.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

२ इ. विरोधकांनाही ऋषीपद आणि अवतारत्व देणे

विरोधकांनाही ऋषीपद आणि अवतारत्व देणे.पुनर्जन्म आणि ईश्वर या दोन्हींवर विश्वास न ठेवणार्‍या चार्वाकाचा छळ तर झाला नाहीच, उलट त्याला ऋषीपद दिले गेले ! ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या आणि प्रचलित यज्ञयागांवर कडक टीका करणार्‍या सिद्धार्थ गौतमाला तर देवपद देण्यात आले आणि तो श्रीविष्णूचा अवतार मानला गेला ! निरीश्वरवादी महावीरालाही देवपद मिळाले.

२ ई. ‘हिंदु धर्म इतका लवचिक आसणे

‘हिंदु धर्म इतका लवचिक आहे की, लवचिकपणाची ही सीमा इतर कोणत्याही धर्मात आढळणार नाही; म्हणूनच बाकीचे सर्व पंथ आपल्या धर्माची अंगप्रत्यंगे आहेत.’ – स्वामी विवेकानंद

 

३. महत्त्व

३ अ. इतर ‘वाद’ आणि ‘हिंदुत्ववाद’

‘भगवंताच्या चरणी निःस्सीम प्रेम असणे आणि ते सारखे अर्पण होत असणे, हेच हिंदूंच्या हिंदुत्वाचे लक्षण आहे. ‘तुमचा ‘वाद’ (समाजवाद, साम्यवाद इत्यादी) कोणता ?’, असे विचारल्यावर, ‘आमचा यथार्थवाद आहे’, असे पं. दिनदयाळ उपाध्याय म्हणत. वास्तविक कोणताही वाद पृथ्वीवर नसतांना हिंदुत्व होतेच. सर्व वाद उत्पन्न झाले असले, तरी ते आहेच आणि पृथ्वीवरील सर्व वाद नष्ट होण्यासाठीही ते आहेच; म्हणून तो कोणताच ‘वाद’ नाही. मी तर त्याला, म्हणायचेच असेल, तर ‘सुखसंवाद’ म्हणेन. ते एक सद्विद्य संभाषण (ज्ञाननिष्ठ किंवा ज्ञानपूर्वक केलेले संभाषण) आहे. सद्विद्य संभाषणाची परिणती सुखात होते. इतर वाद हे विवादीय संभाषणात मोडतात. त्यांत शब्दच्छल आहे. त्यामुळे त्यांची परिणती दुःखात होते.

३ आ. हिंदु धर्माचे आंतरराष्ट्रीयत्व

मानवाच्या मनाचा स्थायीभाव हिंदुत्व (साधकत्व) असल्यामुळे तसे झाल्याविना मानवाच्या जन्माची जी इतिश्री ईश्वरप्राप्ती, ती होणेच शक्य नाही आणि हीच मानवाच्या मनाची अवस्था आपल्या धर्मशिक्षणातून होऊ शकते. मनुस्मृतीत असे सांगितले आहे की, जगातील सर्व मानवाला सुखी व्हायचे असेल, तर त्याने हिंदु धर्मनिष्ठांच्या पादपद्मी बसून शिक्षण घेऊन कायमचे सुखी होऊन जावे. ज्या ज्या लोकांनी जीवनाची इतिश्री, म्हणजे ईश्वरप्राप्ती करून घेतलेली दिसते, त्यांत कोणी इंग्रज होते, कोणी अमेरिकन होते, तर कोणी जर्मन होते. ते कोणत्याही पंथाचे (धर्माचे) असले, तरी त्यांनी भारतियत्वाची (साधकत्वाची), म्हणजे आपल्या मनाच्या मूळ स्थायीभावाची प्राप्ती करून घेतल्यामुळे ते कल्याण करून घेऊ शकले. मॅक्सम्युलर (जर्मन), थोरो (अमेरिकन) इत्यादींनी हिंदु धर्म न स्वीकारता ते मनाने हिंदु, म्हणजे भारतीय झाल्यामुळे आपले कल्याण करून घेऊ शकले. अशी पुष्कळ नावे आहेत. थोरो तर भगवद्गीता वाचून कृष्णप्रेमाने वेडा झाला होता. गीतेला तो आई मानत होता. डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि भगिनी निवेदिता या सि्त्रया इंग्रज होत्या. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी तर ‘मानवाला त्याचे कल्याण शिकविणारे उपनिषदांसारखे श्रेष्ठ वाङ्मय जगात दुसरे नाही’, असे सांगितले होते.

तेव्हा केवळ जन्माने हिंदु धर्मीयच नव्हे, तर सर्व मानव सुखी होण्यासाठी हिंदु (साधक) राष्ट्राची अत्यंत आवश्यकता आहे. मानवी हक्कांचे संरक्षण केवळ हिंदुराष्ट्रच करू शकते. सर्वांचे प्रयत्न विश्वशांतीसाठी चालले आहेत; पण हिंदुराष्ट्रनिर्मितीविना विश्वशांती नांदणेच शक्य नाही.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

४. हिंदु कोणाला म्हणावे ?

अ. ‘वेद, वेदांगे, पुराणे आणि तदनुकूल संप्रदाय हे ज्यास मान्य आहेत आणि जो परंपरागत हिंदूच्याच पोटी जन्माला आला आहे, त्यास.

आ. वरील ज्यास मनापासून प्रमाणच वाटतात, त्यालाही ‘दीक्षाहिंदु’ म्हणतात.

इ. ज्याला वेद, वेदांगे, पुराणे आणि तदनुकूल संप्रदाय, हे दोन्ही मान्य नाहीत आणि केवळ हिंदूच्या पोटी जन्माला आला आहे, तो ‘जन्मार्थ’ म्हणजे जन्महिंदु होय. वेद, वेदांगे, पुराणे आणि तदनुकूल संप्रदाय दोन्ही सर्वथा श्रेष्ठ आहेत; पण उभयार्थ नसेल, तर पूज्यतेच्या दृष्टीने दीक्षार्थच मी श्रेष्ठ मानतो. तथापी लग्नाच्या संदर्भात जन्मार्थ्याचीच योजना करावी.’

 

५. राजकीय हिंदु

‘काही हिंदूंच्या संदर्भात सांगायचे झाले, तर त्यांनी हिंदुराष्ट्रवादासाठी फार मोठा त्याग केलेला आढळतो. त्यांच्या त्यागाविषयी सर्व हिंदूंनाच परमादर आहे; परंतु हिंदवेतर जनांनी भूतकाळात हिंदूंवर जे अननि्वत अत्याचार केले, त्यांच्याविषयी त्यांच्या मनात असीम द्वेष आढळतो; पण हे खर्‍याखुर्‍या हिंदूचे लक्षण नव्हे. याला मी ‘राजकीय हिंदु’ मानतो. ते इतके अष्टपैलु बुद्धीमान असतांनाही सम्यक उपासनेच्या अभावी धर्मगुह्य जाणण्याच्या संदर्भात अज्ञानी राहिले. हे त्यांच्या द्वेषाचे एकमेव कारण सांगता येईल. त्यामुळे असे लोक त्यांच्या मृत्यूनंतर लगेच मनुष्याच्या जन्माला न आले, तरी ज्या वेळी येतील, त्या वेळी हिंदु धर्माच्या सेवेसाठीच त्यांचा जन्म असेल. गोळवलकर गुरुजी, शिवाजी महाराज आणि तत्सम व्यक्तींचे तसे होत नसते. ईश्वरप्राप्तीची त्यांची साधना अपुरी राहिली असल्यास ते लगेच पुन्हा मनुष्याच्या जन्माला येऊन, त्या ठिकाणी ती पूर्ण होऊ शकते; कारण त्यांनी हिंदुराष्ट्रनिर्मितीचे कार्य ईश्वरप्राप्तीची साधना म्हणून केलेले असते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

६. आस्तिक आणि नास्तिक

‘समस्त विश्वव्यापारांमागे त्यांचा कोणीतरी नियंता असला पाहिजे. हा जो कोणी असेल, तोच ईश्वर होय. तोच या विश्वाचा कर्ता, धर्ता आणि संहर्ता असून चैतन्य किंवा ज्ञान हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हिंदु धर्माप्रमाणे अशा ईश्वराचे अस्तित्व आणि वेदांचे प्रामाण्य मानणार्‍याला आस्तिक आणि ते न मानणार्‍याला नास्तिक अशी संज्ञा आहे.’

‘वेदान्ती ज्याप्रमाणे भगवंताला अनादी मानतात, त्याप्रमाणे वेदांनासुद्धा. तरीही वेद मानून त्याप्रमाणे साचार असणार्‍यांनाच आस्तिक ही उपाधी लावली जाते. ‘नास्तिको वेदनिन्दकः ।’ असे म्हणतात. वेदान्ती भगवंतापेक्षा वेदांचा सन्मान अधिक करीत असतात. वेद ईश्वरनिर्मित आहेत, या कारणास्तव त्यांचे प्रामाण्य मानण्यापेक्षा वेदांची सिद्धी होत असल्यामुळे, म्हणजे वेद सिद्ध ठरत असल्यामुळे वेदान्ती ईश्वराचे अस्तित्व मानतात. सामान्यांना ईश्वर अनुमानगम्य आहे. अर्थात त्यांचे आस्तिक्य सामान्य असते, विशेष नसते. धूर दिसल्यावर अग्नीची सिद्धी सामान्यपणे होत असते, विशेषपणे नव्हे. तसे हे आहे. वेदांमुळे ईश्वराची विशेष सिद्धी होत असते. विशेष सिद्धी म्हणजे निःसंशय सिद्धी, म्हणजेच अनुभूती.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

६ अ. आस्तिक आणि नास्तिक यांतील भेद

आस्तिक नास्तिक
१. वेदप्रामाण्य मान्य
शास्त्रे स्वीकारिलिया मार्गास, आदरे जे का मानणे ।
ते आस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुण जेणे ।। (टीप)
अमान्य
२. ईश्वर आहे. सर्व विश्व हा ईश्वराचा परिवार आहे. नाही
३. जगन्नियंता आहे नाही
४. योजनाबद्धता आहे. जग ही एक व्यवस्था आहे. जगात जे आहे ते
प्रयोजनपूर्वक आहे. त्यामागे कार्यकारणभाव आहे.
विनाकारण काहीही उत्पन्न होत नाही. वृक्षाचा
आराखडा जसा त्याच्या बिजात असतो, तसाच जगाचा
आराखडा परमेश्वरात अदृश्य स्वरूपात असतो.
विकासवाद हेच तत्त्व नवीन कल्पांत वापरले जाते.
नाही. येथे सर्व
अराजक आहे.
५. सत्य आहे सत्य नाही आणि असत्यही नाही.
६. काळ वर्तुळाकार आहे. विश्व हे उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांतून गेल्यानंतर पुन्हा तेच वर्तुळ चालू होते. रेषेप्रमाणे आहे. भूतकाळातील घटना पुन्हा कधीही घडत नाहीत.

टीप – शम, दम, तप, शौच, क्षमा, आर्जव, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिकता हे नऊ गुण होत.

 

एखाद्या विषयाच्या संदर्भात पाश्‍चात्त्य विचारसरणी
आणि भारतीय (हिंदु) विचारसरणी यांत भेद असला, तर हिंदु विचारसरणी सत्य समजा !


प.पू. डॉ. आठवले

याचे कारण हे की, हिंदु विचारसरणी लाखो वर्षांची आहे, उदा. सूर्यस्नान कधी करावे ?, याची वेळ पाश्‍चात्त्य सकाळी १० नंतर अशी सांगतात, तर हिंदु धर्मात कोवळ्या उन्हाची, म्हणजे सकाळी ९ च्या आधीची वेळ सांगितली आहे.

तसेच हिंदु विचारसरणीत कधीही पालट होत नाहीत, तर पाश्‍चात्त्य विचारसरणीत काही वर्षांतच पालट होतात, उदा. वैज्ञानिक नवीन सिद्धांत सांगतात.

– (प.पू.) डॉ. आठवले (१५.१२.२०१४)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment