कृष्णभक्तीचा आनंद देणारी साधिकेची ‘बालकभावा’तील चित्रे : दृष्टीकोन आणि अद्वितीय वैशिष्ट्ये !

सनातन संस्थेच्या चेन्नई (तामिळनाडू) येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी स्वतःला बालकभावात दर्शवून श्रीकृष्णभक्तीची उत्कटता दर्शवणारी चित्रे रेखाटली आहेत. त्या साधिकेचा भाव आणि चित्रांची वैशिष्ट्ये या लेखात पाहू.

१. भाव

दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची सतत जाणीव असते; कारण ती आपल्या वृत्तीत मुरलेली असते. या जाणिवेच्या अनुषंगानेच आपल्याकडून सर्व गोष्टी घडत असतात वा अनुभवल्या जात असतात. ‘ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी जीवनातील कृत्ये करणे आणि त्या जाणिवेच्या पार्श्वभूमीवर जीवन अनुभवणे’, याला ‘ईश्वर किंवा गुरु यांच्याप्रती भाव असणे’ किंवा ‘त्यांच्याशी अनुसंधान असणे’, असे म्हणतात.

२. भावाचे प्रकार

देवाप्रती ठेवायच्या भावाचे निरनिराळे प्रकार असतात, उदा. यशोदामातेचा वात्सल्यभाव, हनुमानाचा दास्यभाव, अर्जुनाचा सख्यभाव इत्यादी. ‘बालकभाव’ हाही त्यांपैकीच एक प्रकार आहे.

चांगली साधना असलेल्या साधकाकडूनही त्याची भावावस्था विविध कलांच्या माध्यमातून व्यक्त होते आणि ही कलानिर्मिती निर्दोष अन् आनंददायी असते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सनातन संस्थेच्या चेन्नई (तामिळनाडू) येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांची ‘बालकभावा’तील चित्रे. यामध्ये साधकाच्या मनात एखाद्या बालकासारखी निरागसता, निर्मळता आणि ‘मी देवाचे लहान मूल आहे. देवच माझी माता, पिता, बंधू, सखा अन् सर्वस्व आहे. तोच माझे रक्षण करणारा आहे’, असा भाव निर्माण होतो. उमाक्का यांच्या मनात श्रीकृष्णाप्रती असाच बालकभाव उत्पन्न झाला. त्या भावस्थितीत ‘मी ३ वर्षांची बालिका आहे’, असे त्यांना वाटू लागले. या भावावस्थेत त्यांनी अनेकविध चित्रे रेखाटली. ही चित्रे पाहून वाचकांना ‘बालकभाव कसा असतो’, हे अनुभवता येईल.

३. कला आणि भाव यांचा संबंध !

३ अ. आध्यात्मिक कलासंपदेचा संचय म्हणजेच पुण्यसंचय

‘देवाच्या अनुसंधानातून जिवातील कलागुणांचा चैतन्याच्या साहाय्याने विकास होऊ लागतो आणि यातूनच एखादे सुंंदर चित्र, शिल्प, कविता, विवरण इत्यादी साकारले जाते. यालाच ‘आध्यात्मिक कलासंपदा’ असे म्हणतात. आध्यात्मिक कलासंपदेचा संचय म्हणजेच पुण्यसंचय !

३ आ. आध्यात्मिक कलासंपदेतून साकारलेली कलाकृती
सर्वांनाच देवाच्या भावविश्वात रमवण्याचे कार्य करत असणे

एखादा कलाकार जीव भावविश्वात रमू लागला की, तो आध्यात्मिक कलासंपदेचा अधिकारी बनतो. यातून साकारलेली कलाकृती सर्वांनाच देवाच्या भावविश्वात अतिशय तरलतेने घेऊन जाते. या तरलतेत कोणत्याच प्रकारचा अडथळा नसतो, म्हणजेच या प्रवासात जीव विनासंघर्ष सहजपणे, अगदी अलगद रितीने कलाकृतीत ओढला जातो.

या लेखमालिकेतही नेमकी हीच प्रक्रिया घडली आहे. साधिकेने श्रीकृष्णाप्रतीच्या निरागस भावातून साकारलेली ही चित्रे म्हणजे ‘कृष्णभक्तीचा आनंद देणारे एक भांडार’च झाले आहे.

४. कृष्णभक्तीचा आनंद देणार्‍या ‘बालकभावा’तील चित्रांची अद्वितीय वैशिष्ट्ये

४ अ. सौ. उमा यांनी काढलेल्या बालकभावाच्या चित्रांची
त्यांतून सेवाभाव व्यक्त होणे, चित्रे पहाणार्‍याचा कृतज्ञताभाव जागृत होणे

सौ. उमा यांनी काढलेल्या बालकभावाच्या चित्रांची त्यांतून सेवाभाव व्यक्त होणे, चित्रे पहाणार्‍याचा कृतज्ञताभाव जागृत होणे इत्यादी अनेक आध्यात्मिक वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या चित्रांकडे कलेच्या दृष्टीने पाहिल्यासही ती अत्यंत सुरेख असून त्यांत चांगल्या चित्रांमध्ये आढळणारे अनेक पैलू दिसून येतात,

४ आ. लेखमालिकेतील चित्रांचे आध्यात्मिक विश्वाशी
संलग्नता दर्शवण्यातील महत्त्व आणि चित्रांचे त्या दृष्टीने असलेले कार्य

४ आ १. श्रीकृष्णरूपी भक्तीमय वातावरणात नेणे

या लेखमालिकेतील प्रत्येक चित्र प्रत्येकाला श्रीकृष्णरूपी भक्तीमय वातावरणात घेऊन जाते, तसेच ते दुसर्‍याचे मन आणि बुद्धी यांना त्या त्या भावविश्वात रममाण करते.

४ आ २. एक जीव चित्राच्या भावविश्वात अडकला की, त्याच्या संयोगाने त्याच्या भोवतीचे विश्वही चैतन्यमय आणि पवित्र बनू लागणे

एकदा का चित्र बघणारा जीव चित्राच्या आकृतीबंधात भक्तीने बांधला गेला की, त्याच्या मनाचे स्फुरण ईश्वरी विचारांच्या साहाय्याने स्पंदन पावू लागते. ही स्पंदने तरंगांच्या रूपात त्याच्या देहातून अवतीभवती पसरू लागतात. अशा प्रकारे एक जीव चित्राच्या भावविश्वात अडकला की, त्याच्या संयोगाने त्याच्या भोवतीचे विश्वही चैतन्यमय आणि पवित्र बनू लागते.

४ इ. साधक-कलाकाराचा चित्र रेखाटण्यातील भाव आणि
त्याचा परिणाम म्हणून लेखमालिकेचे चैतन्य प्रसारणातील महत्त्व

४ इ १. चित्रांतील सजीवता (चित्र रेखाटनकत्र्याचे अखंड अनुसंधान)

या लेखमालिकेतील चित्रांत अतिशय जिवंतपणा आहे, म्हणजेच ‘चित्रे जणूकाही काहीतरी सांगत आहेत आणि ती प्रत्यक्षात सजीव झाली आहेत’, असे वाटते. असे वाटणे, म्हणजे ‘कलाकार-जिवाने श्रीकृष्णाच्या अखंड अनुसंधानात राहून जीव ओतून ती कलाकृती निर्मिली आहे’, असे समजावे.

४ इ २. चैतन्याच्या स्पर्शाने चित्रातील जडत्व हरपून चित्र पावन होणे

ज्या वेळी प्रत्येक चित्रातील प्रत्येक रेषा, बिंदू, आकृती, अलंकारांचे नमुने, वस्त्रांचे प्रकार, तोंडवळ्यावरील भाव आणि डोळ्यांतील तेज ईश्वरी चैतन्याशी जोडले जाते, त्या वेळी चित्रातील आकृतीबंधाचे जडत्व हरपते अन् चैतन्याच्या स्पर्शाने ते चित्र पावन होते.

४ इ ३. चित्राचा मायिक बंध तुटल्याने चित्र तेजासहित जिवंत होणे आणि चित्रातील जिवंतपणा दर्शवणारे पैलू
अ. तेजाच्या संधानाचा परिणाम (चित्रातील डोळे हलणे)

यात तेजाच्या संधानाने सजीवपणा आल्याने चित्रातील डोळे हलतांना, आपल्याकडे पहातांना, तसेच आपल्याशी हितगुज करतांना जाणवतात. (डोळे बोलके असल्याचे जाणवतात.)

आ . वायूतत्त्वरूपी चैतन्यामुळे चित्रातील हालचाल वाढणे

चित्रातील वायूतत्त्वाचे चैतन्यरूपी प्रमाण वाढले की, ओठ बोलतांना, तसेच हात-पाय हलतांना जाणवतात. ‘देव चित्रातून आपल्यापर्यंत चालत येत आहे’, असे वाटते. अशा प्रकारे चित्रात सामावलेला, कोंडटलेला भक्तीभाव सर्वांनाच देवविश्वाची अनुभूती देतो आणि देवाला आपल्यातीलच एक बनवून टाकतो.

४ इ . लेखमालिका साकारण्यातील आध्यात्मिक फलनिष्पत्तीचे स्वरूप

४ ई १. सर्वांनाच देवाच्या विश्वाची ओढ लागेल !

साधिकेने स्वतःतील भावभक्तीने ही चित्रे जिवंत केली आहेत. या चित्रांतून सर्वांनाच देवाच्या विश्वाची ओढ लागल्यावाचून रहाणार नाही आणि तीच या लेखमालिकेची फलनिष्पत्ती असणार आहे.

४ ई २. श्रीकृष्णाच्या भक्तीरसात सर्व जण न्हाऊन जातील !

या लेखमालिकेतून सर्व जण श्रीकृष्णाच्या भक्तीरसात न्हाऊन निघावेत आणि त्याच्या चरणी लीन होण्यासाठी उद्युक्त व्हावेत, असा उदात्त हेतू या लेखमालिकेत दडलेला आहे.

४ ई ३. देवभक्तीचे वेड लावणारी लेखमालिका !

श्रीकृष्णभक्तीने वेडे झाल्याविना परिपूर्णत्व नाही. श्रीकृष्णतत्त्वाने भारलेल्या विश्वात रममाण करणारी साधिकेची ही चित्रे लहानथोर, बुद्धीप्रामाण्यवादी, नासि्तक आणि कलाकार अशा सर्वांनाच भावणारी असल्याने या लेखमालिकेतून प्रत्येक जण साधनेसाठी उद्युक्त व्हावा, अशा समष्टी उद्देशातून साकारलेली ही लेखमालिका आहे. ही लेखमालिका प्रत्येकालाच देवाचे वेड लावेल, यात शंका नाही.’

– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १५.८.२०१३, सकाळी १०.५१)

भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वंदन !

Shrikrushna
 

 

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ।।

अर्थ : वसुदेवपुत्र कृष्णाला, सर्व दुःखे हरण करणार्‍या परमात्म्याला आणि शरणागतांचे क्लेश दूर करणार्‍या गोविंदाला माझा नमस्कार असो.

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।

अर्थ : वसुदेवाचा पुत्र; तसेच कंस, चाणूर इत्यादींचा निःपात करणार्‍या, देवकीला परमानंद देणार्‍या आणि संपूर्ण जगताला
गुरुस्थानी असणार्‍या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.

वन्दे वृन्दावनचरं वल्लवीजनवल्लभम् ।
जयन्तीसम्भवं धाम वैजयन्तीविभूषणम् ।।

अर्थ : वृंदावनामध्ये विहार करणार्‍या, गोपीजनांना आनंद देणार्‍या, जयन्ती योगावर (म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्र असतांना) जन्मलेल्या, भक्तांचे आश्रयस्थान असलेल्या आणि वैजयंती माळेने सुशोभित झालेल्या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.

आध्यात्मिक गोडवा असलेली आणि बालकांत असलेली निर्मळता अनुभवायला देणारी उमाक्कांची चित्रे आबालवृद्धांना आवडतील. त्यांना कृष्णभक्तीच्या भावविश्वाचे दर्शनही घडेल यांतून कृष्णभक्तीची ओढ वाचकांना लागोे, ही भगवान श्रीकृष्णा’च्या चरणी प्रार्थना !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment