नामजप : व्याधींवरील उपाय

प्रस्तूत लेखात आपण नामजपाचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ काय आहेत हे पाहूया. मनुष्याच्या इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास त्यावर उपाय म्हणून नामजप करू शकतो.

पुढे दिलेल्या सारणीत (तक्त्यात) निरनिराळ्या इंद्रियांचा कोणत्या देवतेशी संबंध आहे, तसेच एखाद्या इंद्रियाचे कार्य सुधारण्यासाठी कोणत्या देवतेचा जप कसा करावा, ते दिले आहे. येथे लक्षात ठेवण्यासारखे सूत्र असे की, इंद्रियाचे कार्य आध्यात्मिक कारणांपैकी प्राणशक्ती अल्प असल्यामुळे बिघडले असले, तरच त्या जपाचा उपयोग होतो; शारीरिक किंवा मानसिक कारण असल्यास नाही.

इंद्रिय देवतेचा मंत्र
अ. ‘ज्ञानेंद्रिये
१. कान ॐ दिक् देवताभ्यो नमः ।
२. त्वचा ॐ समीरणाय नमः ।
३. डोळा ॐ अर्काय नमः ।
४. जिह्वा ॐ वरुणाय नमः ।
५. नाक ॐ अश्विनीकुमाराभ्यां नमः ।
आ. कर्मेंद्रिये
१. वाणी ॐ अग्नये नमः ।
२. हात ॐ इंद्राय नमः ।
३. पाय ॐ उपेंद्राय नमः । (ॐ विष्णवे नमः ।)
४. गुद ॐ यमाय नमः ।
५. लिंग ॐ प्रजापतये नमः । (ॐ ब्रह्मदेवाय नमः ।)
इ. अंतःकरण
१. मन ॐ चंद्राय नमः ।
२. चित्त ॐ अच्युताय नमः ।
३. बुद्धी ॐ चतुर्मुखाय नमः ।
४. अहं ॐ शंकराय नमः ।’(१९)

प्रत्येक देवतेचे म्हणजे देव किंवा देवी यांचे विशिष्ट कंपन असते. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने निर्माण होतात, त्यांनी व्याधीद्वारे निर्माण झालेले विचित्र / अनैसर्गिक / प्रमाणबाह्य कंपन सुधारण्यास साहाय्य होऊ शकते. कोणत्या विशिष्ट देवतेच्या नावाचा जप केल्याने कोणत्या रोगावर त्याचा इष्ट परिणाम होऊ शकतो, ते पुढे दिले आहे.

 

१. सूर्यदेव

शरिराला आलेली सूज, खोकला, संधीवात, दमा, मज्जातंतूविकार, डोळ्यांचे व्याधी इत्यादींवर उपाय म्हणून सूर्यदेवाचा जप उपयुक्त ठरू शकतो. सूर्यदेव सूर्यापासून निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग करण्यास वेगवेगळ्या इंद्रियांना साहाय्य करतो, तसेच शरिरातील साठलेले द्रव्य आणि टाकाऊ पदार्थ यांचा निचरा करण्यास साहाय्य करतो.

 

२. अग्नीदेवता

अशक्त पचनशक्ती आणि त्यासंबंधित अतिसारासारख्या रोगाची लागण असलेल्या रुग्णांना अग्नीदेवतेचा जप उपयुक्त ठरू शकतो. पचनक्रियेतील अन्नाचे पचन करणारे रस शरिरातील अग्नीतत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात.

 

३. श्रीविष्णु

श्रीविष्णु ही देवता सबंध विश्वाचा संरक्षक आणि आधार असून ती देवता व्याधीग्रस्त इंद्रियांचे संवर्धन करण्यासाठी अन् आरोग्य पूर्वस्थितीत आणण्यासाठी शारीरिक शक्तीला पूरक शक्ती प्रदान करत असतो; म्हणूनच ज्वर, खोकला, मज्जातंतूविकार, बहिरेपणा, दमा, कुपोषण इत्यादींच्या निवारणार्थ श्रीविष्णु या देवतेच्या जपाचा उपयोग होऊ शकतो.

 

४. रुद्र

रुद्र शिवाचे क्रोधित रूप दर्शवितो आणि ज्वरासारख्या रोगांना कारणीभूत असतो; म्हणूनच लघुरुद्र आणि महारुद्र करतांना रुद्रस्तवनाने शिवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी ठिबकत ठेवतात. जपाने पाण्यात शक्ती निर्माण होते आणि या शक्तीच्या लहरी शीतल असल्यामुळे ज्वरनिवारणार्थ परिणामकारक असतात. कर्करोग आणि वेगवेगळे अर्बुद (ट्यूमर) यांच्या उपचारार्थही रुद्रजप उपयुक्त ठरू शकतो. शिव हा पावित्र्य आणि तप यांचे मूर्तीमंत स्वरूप असल्याने शिवाकडून येणार्‍या लहरींमुळे व्याधीग्रस्त इंद्रिय निरोगी बनू शकते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

Leave a Comment