श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग ४)

८. श्रीकृष्णाशी लपंडाव खेळणे

balak_bhav_1_C8_b

८ अ. चित्राचे विवरण

१. श्रीकृष्णाशी लपंडाव खेळतांना प.पू. डॉक्टरांच्या पटलाखाली लपून बसणे आणि लपण्याचे ठिकाण श्रीकृष्णाला न सांगण्याविषयी प.पू. डॉक्टररूपी श्रीकृष्णालाच गयावया करणे

‘या चित्रात भगवान श्रीकृष्णासमवेत खेळायला आवडणारी एक लहान निरागस मुलगी (मी) आहे. लपंडाव खेळतांना मी प.पू. डॉक्टरांच्या पटलाखाली लपून बसले आहे आणि ‘मी कुठे लपले आहे’, ते श्रीकृष्णाला न सांगण्याविषयी प.पू. डॉक्टरांना विश्वासाने गयावया करत आहे. (वास्तविक मी निरागसपणे श्रीकृष्णालाच, म्हणजे प.पू. डॉक्टरांनाच सांगत आहे की, श्रीकृष्णासमोर माझे गुपित उघड करू नकोस.) भगवान श्रीकृष्णाने मला सहजपणे शोधून काढले; परंतु तो प.पू. डॉक्टरांशी एकरूप झाला असल्यामुळे मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतांना शोधू शकले नाही.

श्रीकृष्णाची चित्रे काढणारी चेन्नई येथील बालसाधिका कु. रंजनी प्रेमनाथ (वय १६ वर्षे) हिला श्रीकृष्ण एखाद्या मित्राप्रमाणे वाटत असल्याने ती त्याला सर्व सांगते. मी काढलेली चित्रे पाहून श्रीकृष्ण तिच्याशी लपंडाव खेळत असल्याचे चित्र तिने काढले. तिने श्रीकृष्णाविषयीच्या सख्यभावाने काढलेले ते चित्र पाहूनच मला हे चित्र काढण्याची प्रेरणा मिळाली.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२३.१०.२०१२)

८ अ. चित्राचे वैशिष्ट्य

‘साधना करत असतांना भगवंत योगमायेच्या साहाय्याने साधक-जिवावर सात्त्विक मायेचा पडदा टाकून लपंडावाचा खेळ खेळत असतो. गुरूंच्या मायेमुळे योगमायेचा सात्त्विक पडदा दूर सारला जाऊन भगवंताचे दर्शन होते. गुरु जेव्हा स्वतःहून गुरुमायेचा पडदा दूर करतात, तेव्हा ‘गुरु तोची देव’ अशी अनुभूती साधकाला येते. ही अनुभूती येईपर्यंत देव आणि गुरु यांच्यामध्ये भेद वाटत असतो. ‘गुरुच देव आहेत’, ही अनुभूती आल्यावर खर्‍या अर्थाने जीव आणि शिव यांचा लपंडाव संपून देवाचे संपूर्ण दर्शन होते.

उत्तम साधना करूनही गुरुकृपेविना कोणताही साधक-जीव देवाच्या योगमायेच्या पाशातून मुक्त होऊन देवाचे संपूर्ण दर्शन करू शकत नाही. यासाठी प्रत्येक संत आणि भक्त यांनी सद्गुरूंचे मार्गदर्शन घेऊन साधना करून ईश्वरप्राप्ती केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्याला ‘गुरुविना तरणोपाय नाही’, हा संदेश देत आहेत.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

९. श्रीकृष्णाने स्वतःकडे लक्ष द्यावे, यासाठी बालसाधिकेने
रुसल्याचे नाटक करणे आणि श्रीकृष्णाने लाडीगोडी करत
स्वतःचे ‘सुदर्शनचक्र’ अन् ‘पांचजन्य शंख’ देऊन तिची समजूत घालणे

balak_bhav_1_C9_b

९ अ. हे चित्र काढत असतांना साधिकेने स्वतः अनुभवलेली भावावस्था

‘६.८.२०१२ या दिवशी मी पुढील गोष्टी अनुभवल्या.

१. मी (३ वर्षांची बालिका) ‘श्रीकृष्णाने माझ्याकडे लक्ष द्यावे’, यासाठी श्रीकृष्णावर रागावल्याचे नाटक करत आहे. ‘श्रीकृष्ण संपूण विश्वाचा स्वामी आहे’, हे मला ठाऊक आहे, तरीही ‘त्याने दिवसभर माझ्याशीच खेळावे’, असे मला वाटत आहे.

२. भगवान श्रीकृष्ण माझे मन ओळखून माझ्याशी लाडीगोडी करत आहे, तसेच मला खेळण्यासाठी स्वतःचे ‘सुदर्शनचक्र’ आणि ‘पांचजन्य शंख’ देत आहे.

३. मी श्रीकृष्णाच्या हातातून त्या दोन्ही वस्तू हिसकावून घेऊन माझ्या छातीजवळ घट्ट पकडून पळू लागते. तो माझा पाठलाग करत आहे.

४. ईश्वर माझ्याशी ‘पकडापकडीचा खेळ’ खेळत आहे; म्हणून मी अत्यानंदात आहे.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment