प्राणीमात्रांच्या जीवनाचा उद्देश काय ?

कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती, ही त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’चे वैशिष्ट्य म्हणजे सर्व  साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग आहे.

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात अनेक वर्षे वाया न घालवता,  गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची, ते गुरुकृपायोग शिकवतो.

गुरुकृपा होण्यासाठी गुरुप्राप्ती होणे आवश्यक आहे. ही गुरुकृपा आणि गुरुप्राप्ती होण्यासाठी करावयाची साधना म्हणजेच ‘गुरुकृपायोगानुसार साधना’. गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी सर्वांगाने आणि व्यापक दिशादर्शन प्रस्तूत लेखमालेत केले आहे. या पहिल्या लेखात आपण प्राणीमात्रांच्या जीवनाचा उद्देश, विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्माचे महत्त्व, गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा सिद्धांत यांविषयीचे विवेचन पाहू.

 

१. प्राणीमात्रांच्या जीवनाचा उद्देश – आनंदप्राप्ती

मनुष्याचीच नव्हे, तर प्रत्येक प्राणीमात्राची जन्मल्यापासून जीवात प्राण असेपर्यंतची धडपड सातत्याने सुख मिळावे, यासाठीच असते. सर्वोच्च आणि सातत्याने टिकणाऱ्या सुखालाच ‘आनंद’ असे म्हणतात. थोडक्यात आनंदप्राप्ती हा प्राणीमात्रांच्या जीवनाचा एकमात्र हेतू असतो. आपण जीवनात अनेक गोष्टी शिकतो; पण आनंद कसा मिळवायचा, हे कोणी शिकवत नाही. या जगात आनंदमय असे केवळ ईश्वरीतत्त्वच आहे. म्हणजेच आनंदप्राप्तीसाठी आपल्याला ईश्वरप्राप्ती करायला हवी.

 

२. प्रत्यक्ष जीवन, विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्माचे महत्त्व

प्रत्येकाच्या जीवनात सुख-दुःखाच्या काही प्रासंगिक घटना घडत असतात, उदा. कोणाचे लग्नच जमत नाही, कुणाला मुलेच होत नाहीत, कुणाला केवळ मुलीच होतात, कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाचा धंदाच चालत नाही, जवळच्याचा अपमृत्यू होतो इत्यादी. ‘हे असे का होते ?’, याची कारणे विज्ञान सांगू शकत नाही, तर याचे उत्तर किंवा या घटनांची तीव्रता कशी न्यून (कमी) करायची, हे अध्यात्मशास्त्रच शिकवते.

 

३. साधना म्हणजे काय ?

अध्यात्मशास्त्राची तात्त्विक आणि प्रायोगिक अशी दोन अंगे आहेत. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करणे, हे अध्यात्माचे तात्त्विक अंग होय. प्रायोगिक अंगात ईश्वरप्राप्तीसाठी शरीर, मन आणि बुद्धी यांनी काहीतरी कृती करायची असते. या प्रायोगिक अंगाला ‘साधना’ असे म्हणतात.

 

४. गुरु

४ अ. गुरूंची आवश्यकता

१. एकट्याने साधना करून स्वबळावर ईश्वरप्राप्ती करून घेणे कठीण असते. यापेक्षा अध्यात्मातील एखाद्या अधिकारी व्यक्तीची, म्हणजेच गुरु किंवा संत यांची कृपा संपादन केली, तर ईश्वरप्राप्तीचे ध्येय लवकर साध्य होते; म्हणूनच ‘सद्गुरु वाचोनि सापडेना सोय । धरावे ते पाय आधी त्याचे ।।’, असे म्हटले आहे. यासाठी गुरुप्राप्ती होणे आवश्यक असते.

२. गुरु शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी त्याला साधना सांगतात, ती त्याच्याकडून करवून घेतात आणि त्याला अनुभूतीही देतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते (कारण ते प्रारब्धानुसार असते), तर केवळ आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.

४ आ. गुरुतत्त्व एकच

गुरु म्हणजे स्थूलदेह नव्हे. गुरूंना सूक्ष्मदेह (मन) आणि कारणदेह (बुद्धी) नसल्याने ते विश्वमन अन् विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप झालेले असतात; म्हणजेच सर्व गुरूंचे मन आणि बुद्धी हे विश्वमन अन् विश्वबुद्धी असल्याने ते एकच असतात. यासाठी सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात.

 

५. गुरुकृपायोग

५ अ. अर्थ

कृपा हा शब्द ‘कृप्’ या धातूपासून निर्माण होतो. ‘कृप्’ म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी (ईश्वराशी) जोडला जाणे, म्हणजेच जिवाला ईश्वरप्राप्ती होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.

५ आ. महत्त्व

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात अनेक वर्षे वाया न घालाविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची, ते गुरुकृपायोग शिकवतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने आध्यात्मिक उन्नती शीघ्रगतीने होते.

५ इ. वैशिष्ट्य

१. गुरुकृपायोगानुसार साधना करत असतांना प्रतिभाशक्ती लवकर जागृत होणे, म्हणजेच योग्य आणि अयोग्य यांविषयी ईश्वराने मार्गदर्शन करणे

गुरुकृपायोगानुसार साधना करतांना योग्य मार्गानुसार साधना चालू झाल्यामुळे साधकाला नवनवीन गोष्टी सुचू लागतात, म्हणजेच त्याची प्रतिभाशक्ती जागृत होण्यास आरंभ होतो. याद्वारे ईश्वर त्याला योग्य आणि अयोग्य काय, यांविषयी मार्गदर्शन करतो. कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांसारख्या अन्य साधनामार्गांमध्ये पुष्कळ साधना झाल्यावर प्रतिभा जागृत होण्याचा टप्पा येतो. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना जागृत झालेली प्रतिभा नित्यासाठी (कायमस्वरूपी) टिकवणे, हे गुरुकृपा आणि स्वतःचे साधनेतील प्रयत्न यांवर अवलंबून असते.

५ ई. गुरुकृपा कार्य कशी करते ?

एखादे कार्य होत असते, तेव्हा त्यात कार्यरत असलेल्या विविध घटकांवरून ते कार्य किती प्रमाणात यशस्वी होईल ते ठरते. स्थुलापेक्षा सूक्ष्म जास्त सामर्थ्यवान असते, जसे अणुध्वम् पेक्षा (अणुबाँबपेक्षा) परमाणुध्वम् (परमाणुबाँब) अधिक प्रभावशाली असतो.

गुरुकृपा स्थूल, स्थूल आणि सूक्ष्म, सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम अन् अस्तित्व (अती सूक्ष्मतम) या विविध टप्प्यांनुसार कार्य करते. ‘एखादी गोष्ट घडो’ एवढाच विचार एखाद्या आध्यात्मिकदृष्ट्या उन्नताच्या मनात आला, तर ती गोष्ट घडते. याहून त्यांना दुसरे काहीएक करावे लागत नाही. ‘शिष्याची आध्यात्मिक उन्नती होवो’, असा संकल्प गुरूंच्या मनात आला की, मगच शिष्याची खरी उन्नती होते. यालाच ‘गुरुकृपा’ म्हणतात. त्याविना शिष्याची उन्नती होत नाही. अंतिम टप्प्यात गुरूंच्या नुसत्या अस्तित्वाने, सान्निध्याने किंवा सत्संगाने शिष्याची साधना आणि उन्नती आपोआप होत असते.

 

६. गुरुकृपा सातत्याने होण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ आवश्यक

कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जर बढती मिळवायची असेल, तर त्याला वरिष्ठाला अपेक्षित असेल, असे करावे लागते. त्याचप्रमाणे गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी गुरूंचे मन जिंकणे आवश्यक असते. गुरुकृपा सातत्याने व्हावी यासाठी गुरूंचे मन सातत्याने जिंकावे लागते. गुरु किंवा संत यांना आवडणारी गोष्ट म्हणजे साधना करणे, म्हणजेच गुरुप्राप्तीसाठी आणि सततच्या गुरुकृपेसाठी तीव्र साधना सातत्याने करत रहाणे आवश्यक आहे. हीच ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ होय.

साधकांना सांप्रदायिक साधनेनुसार गुरुमंत्र न देता गुरुकृपायोगानुसार साधना करण्याची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. १०.१०.२०१७, रात्री ११.१५)