पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय

Article also available in :

१. पितृदोष

पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो. मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात. मुले नीट वागत नाहीत, आई-वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात. त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. श्राद्ध करायला जमत नसेल, तर नदीच्या पाण्यात दहीभात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी.

आपल्या हिंदु संस्कृतीत मातृ-पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात रहातात, त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पहात तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश-अपयश पहात असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात, त्यांचे कल्याण होते. आई-आजी-पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी-चोळी दान द्यावी अन् गाईला घास द्यावा. काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेले असते. त्यांचे घर, मालमत्ता किंवा पैसा हडप करणे, स्त्रीवर अत्याचार करणेे, एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न-पाणी आणि औषधांवाचून तडफडून मरण येणे, अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झाला असेल, अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येत रहातात आणि प्रगतीला खिळ बसते. प्रामाणिक माणसांचे अंतरंग पितरांना दिसते. त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते.

 

२. जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे

खालील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे, असे समजावे.

२ अ. शारीरिक

१. शरिराला असाध्य रोग, आजार उद्भवणे, घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे

२. विषारी सर्पदंश होणे

२ आ. मानसिक

१. मन अन् शरीर अस्वस्थ रहाणे

२. मन अशांत असणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे

३. नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे

४. वाईट स्वप्ने पडणे, निद्रानाश होणे, रात्री घाबरणे

५. पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार यांत अडथळा येणे, त्यांत मन न लागणे, त्यावर विश्‍वास न बसणे

२ इ. कौटुंबिक

१. घराला पाणीपुरवठा न्यून होणे

२. दांपत्य सुख-समाधानी न वाटणे

३. घरात शुभकार्य न ठरणे किंवा लग्नकार्यात अडथळा येत रहाणे

४. वारसा हक्क जाणे

५. लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे

६. कोर्ट-कचेरीचा त्रास चालू होणे

७. परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूत-प्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे

२ ई. आर्थिक

१. नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न लाभता वारंवार पालट होणेे

२. कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धन-धान्य न्यून होणे

३. कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे

 

३. पितृ उपासना कशी करावी ?

३ अ. श्राद्ध करणे

Mahalay_shradhha_600

श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् । म्हणजे श्रद्धेने पितरांना उद्देशून विधीवत् हविर्युक्त पिंडप्रदान आदी कर्म करणे, यालाच श्राद्ध असे म्हणतात. श्राद्धामध्ये समंत्र पिंडदान आणि सज्जनास भोजन ही कर्मे मुख्यतः असतात.

३ आ. नारायण नागबली, त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध

अखंड ५ वर्षे घरात पूर्वजांची श्राद्धे होत नसल्यास नारायण नागबली, त्रिपिंडी (तीन पिढ्यांचे श्राद्ध विधी) आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगणांचे शुभ-आशीर्वाद आणि पुण्य लाभते.

३ इ. नियमित श्राद्धादी कर्मे करण्याने होणारे लाभ

जे नियमित श्राद्धादी कर्मे करतात, त्यांना पितरांच्या संतुष्टतेने आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, संतान, संसारसुख, आरोग्य सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. आधिभौतिक स्थूल राज्याचे संचालक आणि कुलाचे नित्यरक्षक पितर हेच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने ऐहिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्ट देवतांच्या कृपाप्राप्तीतही अडथळे निर्माण होतात; म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी-देवता, त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे पारलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात.

३ ई. ऋणे

देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण.

३ ई १. पंच महायज्ञ : प्रत्येक व्यक्ती (जीवात्मा) जन्माला आल्यानंतर ती ५ ऋणे (कर्ज) घेऊनच जन्म घेते. घेतलेल्या जन्मातून या ५ ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते. या पाच ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंच महायज्ञ करायचा असतो. पंच महायज्ञ खालीलप्रमाणे करायचे असतात. कुटुंबातील कोणी स्त्री, पुरुष किंवा मुलगा यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो.

३ ई १ अ. देवयज्ञ : प्रतिदिन सकाळी एक चमचा शुद्ध गाईचे तूप घालून निरांजन किंवा समईचा दिवा देवापुढे लावावा, तसेच गाईच्या शेणाची गोवरी तूप-कापूर-धूप-ऊद, थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा.

३ ई १ आ. ऋषीगण : नित्यनेमाने मंत्रजप, नामस्मरण, भजन, हरिपाठाप्रमाणे पठण, श्‍लोकपठण, ग्रंथपारायण करावे. प्रतिदिन गाईला गवत आणि अन्नघास द्यावा.

३ ई १ इ. पितृयज्ञ : एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी, दुपारी १२ वाजण्याअगोदर कावळा किंवा गाय यांना एक घास अन्नदान करावे. भुकेलेल्यांना अन्नदान करावे.

३ ई १ ई. मनुष्ययज्ञ : घरी येणार्‍या पाहुण्यांना पाणी, पेय किंवा अन्न द्यावे.

३ ई १ उ. भूतयज्ञ : पशू-पक्षी, मुंग्या, चिमण्या, कबुतर इत्यादींना अन्न-धान्य द्यावे.

हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात. प्रतिदिन पितृ उपासना होते. जन्मलग्न अगर राशीकुंडलीत पंचमात किंवा नवमात केतू, अष्टमात किंवा द्वादशात गुरु किंवा  पीडित रवी अथवा चंद्र हे प्रकाशित ग्रह, कुंडलीत रवी-केतूने, गुरु-राहूने पीडित इत्यादी लक्षणे पितृदोष जन्मकुंडलीत दाखवतात. प्रखर पितृदोषामुळे तोंडवळा अनाकर्षक होतो. डोळ्यांखाली काळे येते आणि ओठ निस्तेज किंवा काळपट दिसतात. अमावास्येच्या जवळपास १-२ दिवस पुढेे-मागे रहात्या घरी एक प्रकारची हुरहूर, उदासीनता किंवा अस्वस्थता जाणवते. दुपारी १२ ते १ या कालावधीत घराजवळ कावळे अती कावकाव करून दारासमोर येतात. अशा वेळी पितृदोषांसाठी उपासना करावी.

 

४. पितृदोषांसाठी उपासना करण्याने होणारे लाभ

पितृदोषांमुळे होणारे त्रास दूर होतात. एखाद्या सालस, सुंदर, सुशिक्षित मुलीच्या माता-पित्यांच्या आर्थिक सुविधा असूनही आटोकाट प्रयत्नांनीही लग्न अडून रहाते, कुलदेवीची सेवा करूनही मार्ग सापडत नाही, अशा वेळी मुख्यतः पितृदोष कारणीभूत असतो. या पितृदोषाचे नारायण नागबळीने निरसन करताच अपेक्षेपेक्षा उत्तम स्थळ लाभून न्यून खर्चात विवाह होतो.

प्रतिदिन रामरक्षा, मारुति स्तोत्र, श्‍लोक, प्रार्थना, हरिपाठ करावे. त्यामुळे मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते.

– ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी) (संदर्भ : श्रीधर संदेश)