‘पितांबरी’ आस्थापनात ‘साधनेतून नेतृत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन !

‘साधनेतून नेतृत्व विकास’ हा विषय समजावून सांगतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
मार्गदर्शन ऐकतांना आस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी

ठाणे – ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’च्या ठाणे कार्यालयात व्यवस्थापन आणि नेतृत्व विकासाच्या दृष्टीकोनातून विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘साधनेतून नेतृत्व विकास’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी आस्थापनाचे ‘व्हाईस प्रेसिडंट’ (उपाध्यक्ष) परीक्षित प्रभुदेसाई, ‘डायरेक्टर’ (संचालक) प्रियांका प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई, ‘सीईओ’ (आस्थापनाचे प्रमुख) महेश जोशी, ‘सीओओ’ (दैनंदिन कामकाजाचा प्रमुख) माधव पुजारी, तसेच आस्थापनाच्या विविध विभागांचे व्यवस्थापक अन् वरिष्ठ कर्मचारी, तसेच सनातनच्या साधिका सौ. भक्ती गैलाड उपस्थित होत्या.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार आध्यात्मिक साधना आणि व्यवस्थापन यांचा समन्वय साधत प्रभावी नेतृत्व कसे विकसित करावे ? यावर डॉ. प्रभुदेसाई यांनी ‘पीपीटी’च्या (संगणकीय प्रणालीच्या) माध्यमातून मार्गदर्शन केले. स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांतून ‘अपयश, साधना, यश’ हा प्रवास उलगडत गुरुकृपायोगानुसार साधनेमुळे अडचणींना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक वृत्ती आणि मानसिक शक्ती कशी विकसित होते ? याचे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून विवेचन केले. ‘साधनेमुळे वैयक्तिक, तसेच व्यावसायिक प्रगतीला नवी दिशा मिळू शकते’, असेही त्यांनी सांगितले. प्रारब्ध आणि संचित कर्म यांचा जीवनावर होणारा परिणाम, तसेच प्रारब्धावर मात करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेची भूमिका याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. ‘अनेकातून एकात’ हा साधनेचा नियम समजावून सांगतांना व्यवस्थापन आणि विक्री यांच्यात कामाचा विस्तार करण्यापेक्षा योग्य प्राधान्यक्रम ठरवून नफादायी कार्यपद्धत स्वीकारण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ या संकल्पनेतून वैयक्तिक प्रगतीसह संस्था, समाज आणि देश हितासाठी योगदान देण्याचा दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला. कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामस्मरणाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

आस्थापनात कर्मचार्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी सत्संग, प्रार्थना, गुरुपौर्णिमा दान आदी उपक्रम राबवले जातात. ‘आजपासूनच गुरुकृपायोगानुसार आध्यात्मिक साधनेला प्रारंभ करा आणि स्वतःची ऐहिक अन् आध्यात्मिक प्रगती घडवा’, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रभुदेसाई यांनी उपस्थित सहकार्‍यांशी संवाद साधला. सौ. भक्ती गैलाड यांनी लावलेल्या प्रदर्शनकक्षावर उपस्थितांनी सनातनचे ग्रंथ खरेदी केले.