गोव्यातील खासदार, मंत्री आणि आमदार यांची रामनाथी (फोंडा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

खासदार सदानंद शेट तानावडे, पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दाजी साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांची उपस्थिती

सनातन आश्रमातील कलेशी संबंधित सेवेविषयी जाणून घेतांना मान्यवर

फोंडा (गोवा) : रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला गोव्यातील भाजपचे खासदार सदानंद शेट तानावडे, पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, वास्कोचे आमदार दाजी उपाख्य कृष्णा साळकर आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ९ जून या दिवशी सदिच्छा भेट दिली. सनातनच्या आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली. याप्रसंगी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे आणि संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशीही त्यांनी राष्ट्र, धर्म, संस्कृती यांविषयी चर्चा केली. याप्रसंगी गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते.

खासदार, मंत्री आणि आमदार यांनी सनातन संस्थेच्या आश्रमातून चालणारे कार्य आणि सूक्ष्म प्रदर्शन यांविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘आश्रमात पुष्कळ सकारात्मक स्पंदने जाणवतात.’’ आश्रमातील व्यवस्थापन आणि् स्वच्छता यांविषयी खासदार तानावडे म्हणाले, ‘‘मोठमोठ्या व्यवस्थापकीय आस्थापनांना लाजवेल, असे उत्तम व्यवस्थापन आश्रमात आहे.’’ आश्रमात साधकांनी लिहिलेल्या चुकांचा फलक पाहून मंत्री फळदेसाई यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया आम्हा मंत्र्यांनाही शिकवली पाहिजे’, अशी इच्छा व्यक्त केली. आमदार साळकर आणि आमदार आमोणकर यांनी ‘आमच्या मतदारसंघांत सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आम्ही कायम सेवा देत राहू’, असे आश्‍वासन दिले.

डावीकडून श्री. जयेश थळी, आमदार प्रेमेंद्र शेट, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आणि आमदार दाजी साळकर यांना ‘सनातन प्रभात’च्या कार्याविषयी माहिती देतांना समूह संपादक श्री. योगेश जलतारे


आश्रमातील ‘सनातन प्रभात’च्या मुख्य कार्यालयालाही सर्वांनी भेट दिली. याप्रसंगी ‘सनातन प्रभात प्रसारमाध्यम समुहा’चे संपादक श्री. योगेश जलतारे, उपसंपादक श्री. उमेश नाईक, तसेच कार्यालयात सेवारत साधकांशी ओळख करून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Leave a Comment